बोलतो जे अर्णव

एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब.

इतना क्यूं सोचते हो तुम?

Continue reading

रोजचंच मढं त्याला…

‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.

कोई आतंकवादी, कोई बम ब्लास्ट मुंबई की स्पीड इस्लो नही कर सकता,वो काम सिर्फ एकही चीज कर सकती है… पाऊस. आज पावसाचा जोर प्रचंड होता, लोकलंचं वेळापत्रक बिघडलं होतं तेवढ्या एकाच कारणानं बऱ्याच लोकांनी सक्तीची रजा घेतली असावी किंवा बाहेर पडायला उशीर केला असावा.

मुंबई स्पिरिट की?

कालच्या बाँबस्फोटांचं लोकांना काही वाटत नसेल असं नाही पण परदु:ख शीतल असतं असं म्हणतात ते एक कारण असेल, रोजचंच मढं त्याला कोण रडं? हे ही असेल किंवा आपलं ते प्रसिद्ध ‘मुंबई स्पिरिट’ हे सुद्धा एक कारण असेल.

रिक्षांना रांगा होत्या, बसमध्ये-स्टेशनवर गर्दी होती, पेपरविक्रेत्यांचा धंदा तेजीत होता, गाड्या रोजच्यासारख्याच तुडूंब भरलेल्या होत्या. इतकी गर्दी आज सकाळी होती की या शहराच्या मध्यवर्ती भागात कालच तीन-तीन बाँब स्फोट झालेत त्यात २०-२५ लोकांनी जीव गमावलाय; शे-सव्वाशे जखमी आहेत असं सांगूनही खरं वाटलं नसतं.

असंख्य लोक यासाठी त्या मस्त ‘मुंबई स्पिरिट’ या शब्दाचा आधार घेतील.

हा शब्द वापरला की काहींचा अहं सुखावतो…

काहींचं दु:ख लपून राहतं, काहींची भिती…

काहींची अगतिकता लपते, काहींची अपरिहार्यता…

काहींचं अपयश तर बऱ्याच जणांची अकार्यक्षमताही लपून राहते.

या शब्दात जबरदस्त शक्ती आहे यात वाद नाही.

माणसांचे जिथे 'आकडे' होतात

 

बाँबस्फोट झाले की अनेक निष्पाप लोक मरतात. त्यांच्या आप्तस्वकियांकडे आठवणी शिल्लक राहतात, सरकार दफ्तरी त्यांच्या ऐवजी आकडे/Numbers शिल्लक राहतात. जगाचा कारभार पुढे चालूच राहतो.

 मुंबई स्पिरिट हे शब्द वापरले की मुंबईकर दरवाढीच्या स्फोटापासून ते RDX च्या स्फोटापर्यंत अक्षरश: काहीही आणि कितीही दिवस सहन करु शकतो असं गृहीत धरणारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागलीय.

आमच्या स्पिरिटला गृहीत धरु नका असं सांगणार कोण? कधी? आणि सांगायचं ठरवलं तरी ते सांगायचं कोणाला?  त्यापेक्षा आपण बरं आणि आपलं काम बरं, जोपर्यंत आपल्याला थेट झळ बसत नाही तोवर स्पिरिटचा अनोखा नमुना दाखवायला काय हरकत आहे.

‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.

तो कोणी राजकारणी तर नव्हता ना याचा शोध घ्यायला हवा.

जाऊ द्या ना भाऊ, भांडता कशाला ?

घरी निघताना  पारावर एक चहाची मैफल ठरलेलीच. आज शैलू परांजपेंची कंपनी लाभली, गप्पांचा ओघ सुरु झाला, आम्ही घडाळ्याकडं पाहायचं सोडून दिलं. म्हटलं नेहेमीप्रमाणेच मिळेल ती गाडी पकडायची. तसंही वेळेचं आणि आपलं गणित फार कमी वेळा जमलंय. 

अपेक्षेप्रमाणे  उशीर झाला, स्टेशनवर पोचलो, गर्दी वगैरे होतीच. आवडीच्या प्लेलिस्टमधली गाणी सुरु झाली होती. गाडी आली, नेहेमीप्रमाणेच शेवटच्या अर्ध्या डब्यात मी कोंबला गेलो. आजुबाजू-मागेपुढे जिथे जागा मिळेल तिथे कोणीतरी कोणालातरी आपुलकीनं भिडलेले होते. या मुंबापुरीत कोणाला एकटं – मोकळं वगैरे वाटू नये; म्हणून काळजी घ्यायची सुरुवात बहुदा लोकलमध्येच होत असावी.   Continue reading

युद्ध आमुचे सुरुच…

मुंबईच्या रस्त्यावर गोळीबार-रक्तपात तसा नवा राहिला नाहीय, पण यावेळी त्यानं बळी घेतलाय एका वरिष्ठ पत्रकाराचा, मिड डे चे क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय अर्थात जे.डे यांचा. पवईत चार हल्लेखोरांनी गोळ्या घालून जे.डेंची दिवसाढवळ्या हत्या केली आणि पसार झाले.  ही भयानक घटना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला एक मोठी चपराक होती, पण अशा चपराकींची एव्हाना गृहखात्याला सवय झाली असावी.

The Man who knows too much?

जे डेंच्या हत्येमागचं खरं कारण मुंबई पोलिस शोधून काढतीलही पण यामुळं पत्रकारांवरील हल्ल्याचा- त्यांच्या संरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. या हत्येनंतर पत्रकारांची प्रतिक्रिया तीही तीव्र; आली नसती तरच नवल. अजित पवार माफी प्रकरणात लागलेली ठेच ताजी असताना यावेळी पत्रकार संघटना शहाणपणानं पावलं टाकतील अशी मला अपेक्षा होती, पण गृहमंत्री राजीनामा द्या, पोलिस आयुक्त राजीनामा द्या, सीबीआय चौकशी करा अशा टिपिकल राजकीय पक्षासारख्या मागण्या करत ज्येष्ठांनी माझ्या अपेक्षांवर पाणी ओतलं. असो

पत्रकार संरक्षण हा महत्वाचा विषय आहेच. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात पत्रकारांवर हल्ल्याच्या १८५ घटना घडल्या आहेत यावरुनच त्याचं गांभीर्य लक्षात येतं.

पत्रकारांचं रामदेवबाबासन?

(आपल्याला फार काय कळत नाय) पण एखादा वेगळा कायदा केल्यानं असे हल्ले रोखता येतील किंवा जे लोक अशा पद्धतीनं हत्येचा कट रचतात- खून पाडतात ते कायद्याला वगैरे जुमानतील-घाबरतील, त्यानं पत्रकारांना मारहाणीचे प्रकार कमी होतील असं (आपल्याला तरी बुवा) वाटत नाही.

खरं तर Don’t Kill The Messenger हे तत्व कधीकाळी जगभरात पाळलं जायचं. हा ट्रेंड बदलत चाललाय, कसा ते आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाची आकडेवारी पाहीली तर लक्षात येईल.

१९९० पासून २०१० पर्यंत, २१ वर्षात जगभरात २२७१ पत्रकार (आणि मिडिया स्टाफ) आपलं कर्तव्य पार पाडत असताना म्हणजेच (in the line of duty) जगापर्यंत एखादी बातमी पोचवत असताना मरण पावले आहे.

यात TARGETED KILLING  म्हणजेच हत्या, बाँबस्फोट, यादवी- युद्धातील क्रॉस फायर आणि अपघात अशी वेगवेगळी कारणं आहेत. यातल्या प्रत्येक पत्रकाराचे डिटेल्स महासंघाच्या साईटवर उपलब्ध आहेत.

२००५  ते २०१० या काळात मारल्या गेलेल्या पत्रकारांची आकडेवारी पाहा.

 वर्ष बातमीसाठी प्राणाची आहुती बातमीच्या मागावर अपघाती मृत्यू
जगात भारतात जगात भारतात
२००५ १५४ NA ४८ NA
२००६ १५४ ०३ २२ ०२
२००७ १३५ ०३ ३७ ०२
२००८ ८५ ०६ २४ ०४
२००९ १३९ ०१ २५ ०३*
२०१० ९४ ०३ ०४ ०२

*(व्यंकटेश चपळगावकर- पुणे ब्युरो चीफ, स्टार माझा, ३०/ ०३/२००९ रोजी अपघाती मृत्यू)

ये राह नही आसान

सर्वसामान्य लोकांच्या, समाजाच्या भल्याची एखादी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी  आपल्या प्राणाची पर्वा न करणारे अनेक पत्रकार आपल्या आजुबाजूला आहेत. हे काम किती जोखमीचं आहे, यात किती धोके आहेत ते जे डेंच्या हत्येवरुन लक्षात येईल. त्यांच्या मारेकऱ्यांना मुंबई पोलिस आज ना उद्या शोधतीलच, त्यांना मारणाऱ्यामागचा हात-खरे सुत्रधार  कधी जगासमोर येतील का? आपल्या वरिष्ठ पत्रकाराची निर्घृण हत्या mid-day विसरणार नाही, प्रशासनाला विसरु देणार नाही अशी आशा.

जे.डेंसारखे फार कमी पत्रकार शिल्लक राहिले असतील, ही दुर्मिळ प्रजाती वाचवण्यासाठी शक्य ते सारे पर्याय वापरायलाच हवेत.  पत्रकारांसाठी वेगळा कायदा बनेल की नाही माहीत नाही, त्यासाठी लढणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आहेतच, पण तोवर आहेत त्या कायद्यांचा योग्य वापर करायची धमक दाखवेल का सरकार?