शेतकरी नवराच हवा गं बाई!

 एक गाव असतं, त्या गावात औंदा कर्तव्य असलेला एक तरुण शेतकरी असतो, सर्व अविवाहित मुलांप्रमाणेच तो सुद्धा एका सुंदर, सुशील, सर्वगुणसंपन्न वगैरे मुलीच्या शोधात असतो. अट एकच असते की आपल्या होणाऱ्या कारभारणीला शेतीतली सगळी कामं आली पायजेल.

कोण म्हणतंय, शेतकरी नवरा नको गं बाई?

शहराच्या झगमगाटाला कंटाळलेल्या १० तरुणी नेमक्या याच गावात येतात आणि मग या दहाजणींमध्ये सुरु होते त्या शेतकऱ्याचं मन जिंकण्यासाठी चढाओढ. शेतीकामात आपण दुसरीपेक्षा कशा चांगल्या आहोत हे त्या शेतकऱ्याला पटवण्यासाठी या दहा ललना भरपूर मेहनत घेतात. ट्रॅक्टर चालवतात, कोंबड्यांना खायला घालतात, गाईम्हशीचं दूध काढतात,  पार तबेल्यात गवतावर रात्र झोपून/जागून काढतात, थोडक्यात, काही करायचं बाकी ठेवत नाहीत. (थोडा अंदाज फोटोवरुन येईलच) शेवटी यातली जी शेतावर प्रेम करते असं त्याला वाटतं तिला तो शेतकरी आपली बायको म्हणून निवडतो आणि (बहुदा) ते सुखाने संसारही करत असावेत.

हे गाव, हा किस्सा अर्थातच आपल्या देशातला नाहीय.

ऑस्ट्रेलियातला हिट्ट रियॅलिटी शो

हे सगळं घडतंय युरोपात एका रियॅलिटी शो मध्ये…

ऑस्ट्रेलियातल्या चॅनेल नाईनवर  FARMER WANTS A WIFE हा रियॅलिटी शो गेली १० वर्ष सुरु आहे. अमेरिकेसह, युरोपातल्या अनेक देशातही हा शो सुरु आहे.

अमेरिकेत १ शेतकरी दहा ललना आहेत, तर ऑस्ट्रेलियात शेतकरी आणि मुलींच्या सहा जोड्या आहेत. प्रत्येक देशानं आपल्या प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत फॉरमॅट मध्ये बदल केलाय. शेतकऱ्याचा तो तरुण पोऱ्या, त्या सुंदऱ्यांपैकी एखादीला ट्रॅक्टरवर आपल्या मिठीत घेतं असतो तेव्हा गाव आणि शहरातलं अंतर लुप्त होतंय अशी कल्पना करत तिथले आबालवृद्ध सुखावले नसते तरच नवल. प्रेक्षकांना या शो नं अक्षरश: खिळवून ठेवलंय.

अमेरिकेत या शो साठी शेतकरी निवडताना कृषी विभागाकडून म्हणजेच USDA कडून त्या शेतकऱ्याच्या शेतीकामाची कुंडलीच मागवली जाते, मॅट न्यूस्टॅट ला तुम्ही पाहिलंत तर तो शेतकरी आहे यावर विश्वास बसणार नाही, त्याच्याकडे १६०० एकर शेती आहे, त्याच्या परिवाराला १९९५ ते २००६ या काळात अनुदान, नुकसान भरपाई, मदत वगैरे मिळून ७ लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे साडे तीन कोटी रुपये मिळाल्याचं कळलं आणि मला आपला शेतकरी, अनुदान, पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे गोष्टी आठवल्या, असो.

असं भारतातही होईल?

 खरं तर, शेतकरी नवराच हवा गं बाई असा कार्यक्रम तथाकथित शेतीप्रधान भारत देशात सुरु करायला भरपूर स्कोप होता. चॅनल्सना मसाला, टिआरपी मिळाला असता, प्रेक्षकांना आयतं मनोरंजन आणि कुणी सांगावं शेतकऱ्याच्या पोरायल्ना जीवनसाथीही मिळाली असती.

 या शो ची नक्कल भारतीय टेलिव्हिजनवर दिसली खरी पण त्यात शेतकरी दिसला नाही तर राहुल महाजन, राखी सावंत अशी पात्र दिसली.

रियॅलिटी शो असला म्हणून काय झालं, शेतावरची मेहनतीची काम करायला कोण शहरातली पोरगी तयार होईल? आपल्या शेतकऱ्याची-समाजाची अवस्था चॅनेलवाल्यांनाही चांगली माहिती आहे, काय विकलं जातं हेही त्यांना बरोब्बर समजलंय. जगभरात शेतकऱ्याच्या नावानं गाजत असलेल्या या रियॅलिटी शोची आपल्याकडे कॉपी करताना त्यातून शेतकरी गायब होतो तो त्यामुळेच.

या कन्सेप्टमध्ये बदल करुन शेतकऱ्याच्या जीवनाची रियॅलिटी कधी तरी पडद्यावर आणायला वाव आहेच. बाकी आपल्याला पचतील-रुचतील असे बदल करुन, भविष्यात- २०-२५ वर्षात कधीतरी FARMER WANTS A WIFE किंवा शेतकरी नवराच हवा गं बाई असं वाक्य भारतातल्या टिव्ही शोमध्ये जरी ऐकायला मिळालं तरी भरुन पावलं म्हणायचं.