वदनी कवळ घेता remixed

जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक लहानपणी कानावर पडायचाच, बहुतेक शाळांमध्ये म्हणावा लागायचा…

माझ्या thank you शेतकरी दादा ब्लॉगच्या निमित्ताने बोलताना प्रसन्न जोशीने,

वदनी कवळ घेताच्या या दुसऱ्या/ improvised version ची  पुन्हा भेट घडवून आणली. 

यात शेतकरी कामगाराप्रती ऋण व्यक्त करण्याची भावना ठळकपणे जाणवते.

तुम्हालाही आवडेल…

वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी, राबती दिन रात

श्रमीक श्रम करोनी, वस्तू त्या निर्मितात

स्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल

उदर भरण व्हावे, चित्त होण्या विशाल!!

 

जेवणाच्या आधी हे म्हणायला, किमान आठवायला काय हरकत आहे.

THANK YOU शेतकरी दादा!

काही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना  Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं होतं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना तिथं पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today? असं तिथं विचारलं जातं. आता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी दूर करण्यासाठी  KNOW YOUR FARMER, KNOW YOUR FOOD (KYF2) ही योजना सुरु केलीय.

आपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरीग्राहकांना ठामपणे वाटत असतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो.

आपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं  बऱ्याच शहरी  मुलांना आजही वाटतं. मॉलच्या चकाचक रॅकवर दिसणारा गहू-तांदूळ-दूध-भाजीपाला आपोआप येत नाही, यासाठी ऊन-वारा-पावसाची तमा न करता, अनंत अडचणींशी सामना करत, शेतकरी नावाचा उपेक्षित जीव कुठेतरी दोन-चारशे किलोमीटरवर शेतात राबत असतो हे त्यांना कळणार कसं? इथेच आपण प्रत्येकजण महत्वाचा रोल निभावू शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून ती नव्या पिढीपर्यंत पोचेल याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी.

बियाणं वेळेवर मिळत नाही, खतं वेळेवर मिळत नाही, मजूरांची समस्या वेगळीच, कुठुन तरी कर्ज मिळवायचं शेतात काहीतरी पेरायचं,  पाऊस त्याच्या लहरीप्रमाणेच पडतो, निसर्ग साथ देईल अशी प्रार्थना करायची, दिवस रात्र मेहनत करायची, शेवटपर्यंत पीकाची काळजी घ्यायची, चांगलं उत्पादन मिळालं तर बाजारभाव चांगला मिळेल- व्यापाऱ्यांची मेहेरनजर राहिल अशी अपेक्षा करायची. अशा आणि आणखी अनंत अडचणींवर मात करत शेतकरी जगत असतो.  त्याच्या आत्महत्येच्या-मरणाच्या बातम्या आपल्यापर्यंत अधनंमधनं पोचतात पण तो जगतो कसा ते पोचतंच नाही, आपणही कधी ते जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत नाही. अशा प्रतिकुल परिस्थितीत जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का?

ज्याच्यामुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं त्या शेतकऱ्याचे आभार मानायचे… ही कल्पना मला त्यामुळेच खूप आवडली.

तशी  Thank a farmer (TAF) ही संकल्पना आपल्यासाठी नवी नाहीय, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणत आपल्या पूर्वजांनी शेतकऱ्यांचे आभारच मानले आहेत, फक्त आपल्याला त्याचा थोडासा विसर पडत गेला इतकंच. पाश्चात्यांचं अनुकरण करायची आपल्याला सवय आहेच, आता तिकडे TAF सुरु आहे म्हटल्यावर आपल्यालाही ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणजेच ASB चं महत्व कळेल अशी आशा करायला काय हरकत आहे.

शहरीकरणाच्या-आधुनिकतेच्या झगमगाटात आपण ग्रामीणभागापासून- शेतकऱ्यापासून मनानं दूर गेलो आहोत. TAF म्हणा, ASB म्हणा यानं किती फरक पडेल किंवा शेतकरी-ग्राहकामधली दरी किती मिटेल माहित नाही, पण शेतकऱ्याच्या कामाबाबत थोडी माहिती, थोडा आदर जरी तरुण पिढीच्या मनात निर्माण झाला तरी एका मोठ्या बदलाची ती सुरुवात असेल.

मग आज माननार शेतकऱयाचे आभार? म्हणणार THANK YOU शेतकरी दादा?