पोरका अंगारमळा…

शेतकरी असंतोषाचा जनक, योद्धा शेतकरी गेला…
त्यांचं ‘अंगारमळा’ ज्यांनी अजून वाचलं नसेल त्यांनी जरुर वाचा.
माहिती नाही का पण त्यातला,
त्यांच्या आयुष्यातली त्यांना आठवणारी पहिली घटना; माईंची आणि त्यांची भेट; हा छोटासा प्रसंग मला सर्वात जास्त आवडतो..
इतकं साधं, सोपं लिहिता यायला हवं.
शेतकऱ्यांसाठी जे शरद जोशींनी केलं ते प्रत्येकाला जमेलच असं नाही,
शेतकऱ्यांसाठी यथाशक्ती/ जमेल तसं, जमेल तिथनं आणि जमेल तितकं काम करत राहणं हिच त्यांना आदरांजली असेल…

या वर्षाच्या सुरुवातीला एबीपी माझा शेती सन्मान जीवन गौरव पुरस्कार त्यांना दिला गेला, त्यावेळी त्यांची प्रोफाईल पॅकेज तिथं दाखवलं होतं ते त्यांना आवडलंही.

त्यांचा संकलित अंश…

शेतकरी असंतोषाचे जनक

शेतकरी असंतोषाचे जनक

देशातला संख्येने सर्वात मोठा समाज म्हणजे शेतकरी, पण जितका मोठा तितकाच विखुरलेल्या या समाजाला -शेतकरी तितुका एक एक- असं म्हणत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला शरद जोशींनी… शेतात काम करणं, राबणं, शेती यशस्वी करणं म्हणजे काय याची बांधावरुन कल्पनाही येणं कठीण..

हे काम म्हणजे एक यज्ञकुंड…अंगारमळाच हे केवळ एका शेतकऱ्यालाच कळू शकतं.

ही जाणीव जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या शरद जोशींच्या याच कार्याप्रती कृतज्ञता म्हणून जीवनगौरव शेती सन्मान पुरस्कार.

ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली,

त्यांना घामाचे दाम मागायला, लढायला शिकवलं.. संघटीत केलं…

त्यांच्या संतापाला, दु:खाला आवाज मिळवून दिला…

आधुनिक शेतीचा इतिहास ज्या नावाशिवाय पूर्ण होणं शक्य नाही ते नाव म्हणजे

योद्धा शेतकरी

शरद जोशी…

संयुक्त राष्ट्र संघटनेची आरामदायी नोकरी सोडून एक तरुण महाराष्ट्रात परत येतो काय, स्वत: कोरडवाहू शेती कसतो काय, शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी झपाटला जातो काय, देशभरातील शेतकऱ्य़ांना संघटीत करतो काय. सारं काही अचंबित करणारं… आजच्या काळात अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट शरद जोशींच्या रुपानं ऐंशीच्या दशकात सत्यात उतरली..

योद्धा शेतकरी

योद्धा शेतकरी

35 वर्षांपूर्वी नाशकात कांदा आणि ऊस दर आंदोलन झालं आणि शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेचं नाव गावागावात पोहोचलं.

शेतकरी तितुका एक-एक, भीक नको हवे घामाचे दाम या घोषणांनी शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनात अंगार चेतवला.

जातपात, धर्म, भाषेच्या भिंती तोडून शरद जोशी शेतकऱ्यांचे पंचप्राण बनले.

फक्त कांदा किंवा ऊस दराचाच प्रश्न नाही तर मजुरांच्या, महिलांच्या समस्यांनाही त्यांनी आंदोलनातून आणि लिखाणातून वाचा फोडली..

लक्ष्मी मुक्तीचा, शेती अर्थ स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आणला,

इंडिया आणि भारतातला फरक शेतकऱ्याच्या चुलीशेजारील गाडग्यातील दाण्यापर्यंत पोहोचवला…

शरद जोशींची ही नि:स्वार्थ शेतीसेवा आपल्याला प्रेरणा देत राहिल

हा योद्धा शेतकरी आज विसावलाय, पण शेतकऱ्याचा लढा सुरुच आहे, त्यानं फुलवलेला अंगारमळा शेतकरी आंदोलनाला धग देत राहिल…

वाल-मार्टची दुकानदारी

देशात सगळीकडे थेट विदेशी गुंतवणुक अर्थात FDI ची चर्चा रंगलीय आणि त्या निमित्तानं सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे वाल-मार्ट.

गेली 20 वर्ष बंगळुरुमध्ये वालमार्टचं मोठ्ठं जागतिक पुरवठा कार्यालय (GP hub) आहे हे फार कमी लोकांना माहितीय. भारत आणि श्रीलंकेतल्या उत्पादक/पुरवठादारांकडून टॉवेल-टेबलटॉपपासून दागिण्यांपर्यंत विविध उत्पादनं खरेदी करायची आणि जगभरातल्या वालमार्टच्या दुकानात पोचवायची हे काम या हबमधूनच अनेक वर्ष सुरु आहे.

भारतात वालमार्टनं मित्तल यांच्या भारती एन्टरप्रायजेससोबत यापूर्वीच हातपाय पसरले आहेत. भारती-वालमार्ट प्रायवेट लिमिटेड या जॉईंट व्हेंचरची ‘बेस्ट प्राईस’ या नावानं मोठे 9 मॉल्स सुरु आहेत. 6 हजार उत्पादनं किंवा विविध वस्तूमधून निवडण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला मिळतो. अमृतसर, झिराकपूर, जालंधर, कोटा, भोपाळ, लुधियाना, रायपूर, इंदोरमध्ये 3 हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतोय. हा आकडा आणखी वाढणार आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ मिळतेय, ग्राहकांना चांगला दर्जा आणि जास्त पर्याय.

मध्यप्रदेशात त्यांनी ७० कोटी गुंतवलेत, पंजाबमधल्या जवळपास 1 हजार शेतकऱ्यांना उच्च लागवड तंत्र दिलं जातं, कमी पाण्यात, कमी खतं- किटकनाशकं वापरुन उत्पादनवाढीला मदत केली जाते आणि उत्तम व्यवस्थापनातून मिळालेला दर्जेदार शेतमाल थेट शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो. २०१५ साला पर्यंत म्हणजे पुढच्या ३-४ वर्षात किमान ३५ हजार शेतकऱ्याकडून थेट खरेदी करण्याचं कंपनीचं ध्येय होतं. हा आकडा FDIचा निर्णय येण्यापूर्वीचा होता म्हणजे त्यात आणखी मोठी भर पडण्याचीच शक्यता आहे. हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आणि चांगला भाव मिळाला तर हजारो शेतकऱ्यांचं किमान 20 ते 25 टक्के उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे.

Continue reading