मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे

मुंबईचं वर्णन करताना भले भले थकत नाहीत. कुणाला ती सोने की नगरीया वाटली, कुणाला ती भूलभुलैया वाटली, कुणी तिला मायानगरी म्हणतं तर कुणी हादसे का शहर… मुंबई मेरी जान असं वाटणारांची संख्या माझ्या अंदाजापेक्षा जास्त आहे हे मला फार कमी काळात लक्षात आलं. आता हे आठवायचं कारण म्हणजे कविवर्य नामदेव ढसाळांशी आलेला भेटीचा योग.  

इतर लाखो लोकांसारखाचं मी मुंबईत आलो… पूर्वग्रह सोबत घेऊन…

माझं आणि मुंबईचं नेमकं नातं सांगणं अवघड असलं तरी मी जमेल तसे त्या गुढ नात्याचे पैलू आधी स्वत: समजून घेऊन मग जेवढे जमतील ते मांडायचा कधीतरी/अधनंमधनं प्रयत्न करणार आहेच, पण सध्यातरी ती पाण्यात बसलेली म्हैस आहे आणि सोबतीला माझा आवडता लॉ ऑफ पार्किन्सन्स… असो.

मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे

कॉलेजमध्ये असताना जे चुकून थोडफार वाचन व्हायचं त्यात ‘खेळ’ मधली ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे’ होती, मुंबईला शिव्या देणारी, गुणगाण करणारी भेटली होतीच पण कुणीतरी ‘प्रिय रांडे’ म्हणेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं. त्यानंतर काही काळ लोटला आणि मग थेट मुंबईत आल्यावर, नवमुंबईकरांसारखी किरकिर करताना मुंबई मुंबई…चा विषयमेघराज पाटलांसोबत चर्चेला आला, तो अधनंमधनं येतंच राहिला.

इथेही शेती कसणं सुरु होतंच पण नाक खुपसण्याची सवय न गेल्यामुळे बाकी उद्योग कमी नसतात. त्यातूनच गेल्या आठवड्यात नामदेव ढसाळांशी बोलणं झालं तेव्हा फोनवरच मी त्यांना माझं आणि ‘मुंबई मुंबई’ चं नातं सांगितलं आणि ती ऐकणारच असा हट्टच केला होता म्हणाना… ते फक्त जोरात हसले, त्या दिवशी मूड चांगला होता हे लक्षात आलं, जयभीम जय महाराष्ट्र झालं, फोन ठेवला आणि त्यांच्या घरी जाऊन धडकलो. Continue reading