रोजचंच मढं त्याला…

‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.

कोई आतंकवादी, कोई बम ब्लास्ट मुंबई की स्पीड इस्लो नही कर सकता,वो काम सिर्फ एकही चीज कर सकती है… पाऊस. आज पावसाचा जोर प्रचंड होता, लोकलंचं वेळापत्रक बिघडलं होतं तेवढ्या एकाच कारणानं बऱ्याच लोकांनी सक्तीची रजा घेतली असावी किंवा बाहेर पडायला उशीर केला असावा.

मुंबई स्पिरिट की?

कालच्या बाँबस्फोटांचं लोकांना काही वाटत नसेल असं नाही पण परदु:ख शीतल असतं असं म्हणतात ते एक कारण असेल, रोजचंच मढं त्याला कोण रडं? हे ही असेल किंवा आपलं ते प्रसिद्ध ‘मुंबई स्पिरिट’ हे सुद्धा एक कारण असेल.

रिक्षांना रांगा होत्या, बसमध्ये-स्टेशनवर गर्दी होती, पेपरविक्रेत्यांचा धंदा तेजीत होता, गाड्या रोजच्यासारख्याच तुडूंब भरलेल्या होत्या. इतकी गर्दी आज सकाळी होती की या शहराच्या मध्यवर्ती भागात कालच तीन-तीन बाँब स्फोट झालेत त्यात २०-२५ लोकांनी जीव गमावलाय; शे-सव्वाशे जखमी आहेत असं सांगूनही खरं वाटलं नसतं.

असंख्य लोक यासाठी त्या मस्त ‘मुंबई स्पिरिट’ या शब्दाचा आधार घेतील.

हा शब्द वापरला की काहींचा अहं सुखावतो…

काहींचं दु:ख लपून राहतं, काहींची भिती…

काहींची अगतिकता लपते, काहींची अपरिहार्यता…

काहींचं अपयश तर बऱ्याच जणांची अकार्यक्षमताही लपून राहते.

या शब्दात जबरदस्त शक्ती आहे यात वाद नाही.

माणसांचे जिथे 'आकडे' होतात

 

बाँबस्फोट झाले की अनेक निष्पाप लोक मरतात. त्यांच्या आप्तस्वकियांकडे आठवणी शिल्लक राहतात, सरकार दफ्तरी त्यांच्या ऐवजी आकडे/Numbers शिल्लक राहतात. जगाचा कारभार पुढे चालूच राहतो.

 मुंबई स्पिरिट हे शब्द वापरले की मुंबईकर दरवाढीच्या स्फोटापासून ते RDX च्या स्फोटापर्यंत अक्षरश: काहीही आणि कितीही दिवस सहन करु शकतो असं गृहीत धरणारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागलीय.

आमच्या स्पिरिटला गृहीत धरु नका असं सांगणार कोण? कधी? आणि सांगायचं ठरवलं तरी ते सांगायचं कोणाला?  त्यापेक्षा आपण बरं आणि आपलं काम बरं, जोपर्यंत आपल्याला थेट झळ बसत नाही तोवर स्पिरिटचा अनोखा नमुना दाखवायला काय हरकत आहे.

‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.

तो कोणी राजकारणी तर नव्हता ना याचा शोध घ्यायला हवा.