मला (जसं अनेक गोष्टीतलं फार कळत नाही तसं) गाण्यातलं किंवा संगीतातलंही फार काही कळत नाही. लहानपणी बाबांसोबत कधी गुरुवारी किंवा एखाद्या एकादशीला रात्री पेठेत त्यांच्या एखाद्या मित्राच्या वाड्यासमोरच्या झाडाखाली जमलेल्या महफिलीला जायला मिळायचं.
भजनं, भारुडं वगैरे सुरु व्हायची, डोळ्यात झोप अनावर झालेली असताना आणि गरम दूधाचे ग्लास कधी येतायत याकडे लक्ष लागलेलं असताना पेटी, तबला, टाळ- मृदंगाचा तो गजर, ते गाणं, कानातून आत शिरायचा प्रयत्न करायचं,तो थोडाफार यशस्वी झाला असावा.
मला चांगलं गाणं, कोणत्याही फॉर्ममधलं चांगलं संगीत ऐकायला आवडू लागायची सुरुवात तिथं झाली असावी.