कर्जमाफी कोणासाठी ?

ऊसानंतर कापूस दरासाठी आंदोलन सुरु झालं. त्याचवेळी म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीला सरकारनं वाढीव हमी भाव फक्त जाहीर जरी केला असता तरी व्यापारी 4 हजार 300 रुपयाच्या खाली आले नसते आणि शेतकऱ्याच्या घरातला कापूस व्यवस्थित पैसा मिळवून गेला असता. ते करायचं नव्हतं तर तुमच्या मागण्या अव्यवहार्य आहेत असं चांगल्या शब्दात त्याचवेळी म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांना समजून सांगणं गरजेचं होतं, थोडा गोंधळ झाला असता पण शेतकऱ्यांचं भरुन न येणारं नुकसान टळलं असतं, पण…

ऊसाला एक न्याय कापसाला एक, पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप, विदर्भावर अन्याय अशी टीका होईल, त्याचा फटका पक्षाला बसेल ही भिती, त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी अशा राजकारणाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांची किनार या सगळ्यांचा परिणाम म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी आचार संहितेचं कारण सांगत निर्णय अधिवेशनापर्यंत पुढं ढकलला आणि कापूस उत्पादक शेतकरी मधे लटकला.

आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी संघटनांनी जास्त भाव मिळेल अशी आशा दाखवली त्यामुळे विकायला बाहेर काढलेला कापूस हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा घरात भरला, मधल्या काळात व्यापाऱ्यांनी वाऱ्याची दिशा ओळखली आणि दर आणखी घसरत गेले. माझा सहकारी गजानन नोव्हेंबरच्या शेवटी गावाकडेवर्ध्याला जाऊन आला तेव्हा कापूस चार हजाराच्या खाली येणं सुरु झालं होतं. शेतकरी द्विधा मनस्थितीत होता. शेवटी अधिवेशनात विदर्भ, मराठवाडा, खानदेशातल्या कापूस, सोयाबीन, धान उत्पादकांसाठी 2 हजार कोटींचं पॅकेज मोघम जाहीर केलं, त्याचवेळी कापूस उत्पादकाला फार फार तर हेक्टरी 4-5 हजार रुपये मिळतील असा अंदाज आला होता. झालंही तसंच… Continue reading

हवामान बदलाचे वारे

डर्बनची वारी :-

साऊथ आफ्रिकेच्या डर्बनमध्ये हवामान बदल परिषदेसाठी म्हणजेच COP-17साठी जगभरातील देश एकत्र जमले आहेत. 9 डिसेंबरपर्यंत जवळपास 200 देशांचे हे प्रतिनिधी CLIMATE CHANGE वर चर्चा करणार आहेत. UNFCCC (United Nation Framework Convention on Climate Change) अंतर्गत अशाप्रकारची ही 17 वी परिषद असल्यामुळे याला COP-17 (Conference Of the Parties) म्हणतात. कोणता देश जास्त प्रदुषण करतोय, कोणत्या देशांनी आधीच पर्यावरणाची वाट लावलीय वगैरे आरोपप्रत्यारोप होतात आणि चर्चेचं वातावरण कधी तापतं तर कधी शांत होतं असं गेली 20 वर्ष सुरु आहे.

क्योटो प्रोटोकॉल काय आहे?  :-

सावध ऐका...

Continue reading

वाल-मार्टची दुकानदारी

देशात सगळीकडे थेट विदेशी गुंतवणुक अर्थात FDI ची चर्चा रंगलीय आणि त्या निमित्तानं सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे वाल-मार्ट.

गेली 20 वर्ष बंगळुरुमध्ये वालमार्टचं मोठ्ठं जागतिक पुरवठा कार्यालय (GP hub) आहे हे फार कमी लोकांना माहितीय. भारत आणि श्रीलंकेतल्या उत्पादक/पुरवठादारांकडून टॉवेल-टेबलटॉपपासून दागिण्यांपर्यंत विविध उत्पादनं खरेदी करायची आणि जगभरातल्या वालमार्टच्या दुकानात पोचवायची हे काम या हबमधूनच अनेक वर्ष सुरु आहे.

भारतात वालमार्टनं मित्तल यांच्या भारती एन्टरप्रायजेससोबत यापूर्वीच हातपाय पसरले आहेत. भारती-वालमार्ट प्रायवेट लिमिटेड या जॉईंट व्हेंचरची ‘बेस्ट प्राईस’ या नावानं मोठे 9 मॉल्स सुरु आहेत. 6 हजार उत्पादनं किंवा विविध वस्तूमधून निवडण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला मिळतो. अमृतसर, झिराकपूर, जालंधर, कोटा, भोपाळ, लुधियाना, रायपूर, इंदोरमध्ये 3 हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतोय. हा आकडा आणखी वाढणार आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ मिळतेय, ग्राहकांना चांगला दर्जा आणि जास्त पर्याय.

मध्यप्रदेशात त्यांनी ७० कोटी गुंतवलेत, पंजाबमधल्या जवळपास 1 हजार शेतकऱ्यांना उच्च लागवड तंत्र दिलं जातं, कमी पाण्यात, कमी खतं- किटकनाशकं वापरुन उत्पादनवाढीला मदत केली जाते आणि उत्तम व्यवस्थापनातून मिळालेला दर्जेदार शेतमाल थेट शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो. २०१५ साला पर्यंत म्हणजे पुढच्या ३-४ वर्षात किमान ३५ हजार शेतकऱ्याकडून थेट खरेदी करण्याचं कंपनीचं ध्येय होतं. हा आकडा FDIचा निर्णय येण्यापूर्वीचा होता म्हणजे त्यात आणखी मोठी भर पडण्याचीच शक्यता आहे. हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आणि चांगला भाव मिळाला तर हजारो शेतकऱ्यांचं किमान 20 ते 25 टक्के उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे.

Continue reading

ऊस गोड लागला म्हणून…

प्रकृती अस्वास्थ्य तसंच इतर काही कारणांमुळे महिना दीडमहिना मला इंटरनेटपासून दूर राहावं लागलं. या काळात गद्दाफी मारला गेला, टीम अण्णा फुटली, ऊसप्रश्न पेटला, जगभरात बऱ्याच उलथापालथी झाल्या. मी एक सर्वसामान्य माणूस आहे,अण्णा किंवा बाळासाहेबांसारखा मी भाग्यवान नाही; माझा ब्लॉग मला स्वत:लाच लिहावा लागतो; त्यामुळेच इच्छा असूनही मला काही दिवस तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही असो. अनेक विषय आहेत सुरुवात ऊसापासून करुया.

थेट बारामतीत धडक

साखर कारखाने ऊसाला  प्रति टन जो दर देतात किंवा पहिला हफ्ता देतात तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी SMP वैधानिक किमान मूल्य म्हणायचे आता त्याला FRP (Fair and Remunerative Price) म्हणजेच रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणतात. या हंगामासाठी केंद्र सरकारनं एफआरपी १४५० रुपये प्रति टन ठरवला. उत्पादन खर्च वाढत असताना हा दर जो कोणी ठरवतात त्या तज्ञांना भेटून एकदा त्यांना साष्टांग दंडवत घालायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे, असो. कायद्यानं एफआरपीपेक्षा कमी दर कारखाने देऊ शकत नाहीत, जास्त दर द्यायचा असेल तर राज्य किंवा साखर कारखाने आपल्या जीवावर तो द्यायला मोकळे असतात. Continue reading

का रडवतो कांदा?

कांद्यामुळे सत्ता जाते आणि डोळ्यात पाणी येते १९९८ साली भाजपमुळं सगळ्या राजकीय पक्षांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनीच कांद्याचा धसका घेतला. त्याकाळात एका रात्रीत उद्ध्वस्त झालेले अनेक शेतकरी आणि त्याच रात्रीत माडीवर माडी चढवणारे अनेक दलालं आज देशभरात आहेत. गेल्यावर्षी कांद्यामुळं देश कसा व्याकुळ झाला ते आपल्याला माध्यमांमुळे पाहायला मिळालंय. या खरीपात कांद्याचं उत्पादन कमी होऊन गेल्यावर्षीची परिस्थिीती रिपीट होईल की काय अशी चिंता असलेल्या सरकारनं त्यामुळेच आपल्या स्वभावाच्या विरुध्द जात तडकाफडकी निर्णय घेतले. आधी कांद्याचं किमान निर्यात मूल्य वाढवलं आणि नंतर लगेच कांद्यावर निर्यातबंदीही आणली. शरद पवारांचा फारसा दोष नसताना प्रथेप्रमाणे त्यांच्यावर खापर फोडूनही झालंय. आता आपण कांदा का रडवतो या प्रश्नाचा जरा खोलात वगैरे जाऊन विचार करुया.

नेहेमीच कसा होतो वांदा?

सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी या दोन ध्रुवांना रडवण्याचं घाऊक कंत्राट कांद्यालाच  मिळालंय याबाबत माझ्या मनात फार कमी शंका आहे. Continue reading

आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ

पाऊस वेळेवर आला नाही किंवा त्यात  खंड पडला तर सगळीकडं कसं  चिंतेचं वातावरण होतं ते आपण अधूनमधून अनुभवत असतो. शेतकऱ्याचे हाल होतात, जनावरांना चारापाणी मिळत नाही, अन्नधान्याच्या दराचा ग्राफ वर तर ग्राहकाचं बँक बॅलन्स खाली येतो, असे थेट दिसणारे परिणाम आपण पाहीले आहेत. त्याची दाहकता १९७२ साली देशानं आणि अगदी अलिकडे २००३ ते २००५ च्या दरम्यानं दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रानं अनुभवलीय. ज्या भागात सलग २ वर्ष पाऊसच पडला नाही तिथे काय होत असेल

HORN OF AFRICA

भीषण दुष्काळामुळं पीक तर सोडाच; चरण्यापूरतं गवतही शिल्लक राहिलं नाही, हजारो गायीम्हशी-शेळ्यामेंढ्या मृत्यूमुखी पडल्या, जगण्याचा आधार असलेलं पशुधनंच गेल्यामुळं ११० लाखांपेक्षा जास्त लोक उपासमारीला तोंड देत आला दिवस ढकलतायत. प्रतिकार करण्याची ताकद संपली की मृत्यूला शरण जातायत. महागाई गगनाला भिडलीय. यात सर्वात जास्त हाल होतायत ते लहान मुलांचे. दूध नाही, पाणी नाही खायला अन्नही नाही,  लाखो बालकं कुपोषण आणि तिथून मरणाच्या दारात पोचलीयत. हे सारं सुरु आहे आफ्रिकेच्या शिंगात म्हणजेच HORN OF AFRICA  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमालिया, इथिओपिया, केनिया या आफ्रिकी देशात. हा भाग गेंड्याच्या शिंगासारखा दिसतो म्हणून horn of africa…  Continue reading

मुन्नाभाईईईईई यॅग्रिकल्चर

मुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा मला प्रचंड आवडला. त्यानंतर मुन्नाभाई अॅग्रिकल्चर असाच सिक्वल येईल असं वाटत होतं, त्यात शेती शिक्षणातील उणीवांवर हसत हसत बोट ठेवलं जाईल आणि हा उपेक्षित विषय मेन स्ट्रिममध्ये येईल असं स्वप्न पाहात होतो.

तसं वाटायला एक छोटंसं कारण होतं…

या सिनेमात मेडिकल कॉलेज म्हणून जी भव्य वास्तू दाखवलीय ना  Continue reading

शेतकरी नवराच हवा गं बाई!

 एक गाव असतं, त्या गावात औंदा कर्तव्य असलेला एक तरुण शेतकरी असतो, सर्व अविवाहित मुलांप्रमाणेच तो सुद्धा एका सुंदर, सुशील, सर्वगुणसंपन्न वगैरे मुलीच्या शोधात असतो. अट एकच असते की आपल्या होणाऱ्या कारभारणीला शेतीतली सगळी कामं आली पायजेल.

कोण म्हणतंय, शेतकरी नवरा नको गं बाई?

शहराच्या झगमगाटाला कंटाळलेल्या १० तरुणी नेमक्या याच गावात येतात आणि मग या दहाजणींमध्ये सुरु होते त्या शेतकऱ्याचं मन जिंकण्यासाठी चढाओढ. शेतीकामात आपण दुसरीपेक्षा कशा चांगल्या आहोत हे त्या शेतकऱ्याला पटवण्यासाठी या दहा ललना भरपूर मेहनत घेतात. ट्रॅक्टर चालवतात, कोंबड्यांना खायला घालतात, गाईम्हशीचं दूध काढतात,  पार तबेल्यात गवतावर रात्र झोपून/जागून काढतात, थोडक्यात, काही करायचं बाकी ठेवत नाहीत. (थोडा अंदाज फोटोवरुन येईलच) शेवटी यातली जी शेतावर प्रेम करते असं त्याला वाटतं तिला तो शेतकरी आपली बायको म्हणून निवडतो आणि (बहुदा) ते सुखाने संसारही करत असावेत.

हे गाव, हा किस्सा अर्थातच आपल्या देशातला नाहीय.

ऑस्ट्रेलियातला हिट्ट रियॅलिटी शो

हे सगळं घडतंय युरोपात एका रियॅलिटी शो मध्ये…

ऑस्ट्रेलियातल्या चॅनेल नाईनवर  FARMER WANTS A WIFE हा रियॅलिटी शो गेली १० वर्ष सुरु आहे. अमेरिकेसह, युरोपातल्या अनेक देशातही हा शो सुरु आहे.

अमेरिकेत १ शेतकरी दहा ललना आहेत, तर ऑस्ट्रेलियात शेतकरी आणि मुलींच्या सहा जोड्या आहेत. प्रत्येक देशानं आपल्या प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत फॉरमॅट मध्ये बदल केलाय. शेतकऱ्याचा तो तरुण पोऱ्या, त्या सुंदऱ्यांपैकी एखादीला ट्रॅक्टरवर आपल्या मिठीत घेतं असतो तेव्हा गाव आणि शहरातलं अंतर लुप्त होतंय अशी कल्पना करत तिथले आबालवृद्ध सुखावले नसते तरच नवल. प्रेक्षकांना या शो नं अक्षरश: खिळवून ठेवलंय.

अमेरिकेत या शो साठी शेतकरी निवडताना कृषी विभागाकडून म्हणजेच USDA कडून त्या शेतकऱ्याच्या शेतीकामाची कुंडलीच मागवली जाते, मॅट न्यूस्टॅट ला तुम्ही पाहिलंत तर तो शेतकरी आहे यावर विश्वास बसणार नाही, त्याच्याकडे १६०० एकर शेती आहे, त्याच्या परिवाराला १९९५ ते २००६ या काळात अनुदान, नुकसान भरपाई, मदत वगैरे मिळून ७ लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे साडे तीन कोटी रुपये मिळाल्याचं कळलं आणि मला आपला शेतकरी, अनुदान, पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे गोष्टी आठवल्या, असो.

असं भारतातही होईल?

 खरं तर, शेतकरी नवराच हवा गं बाई असा कार्यक्रम तथाकथित शेतीप्रधान भारत देशात सुरु करायला भरपूर स्कोप होता. चॅनल्सना मसाला, टिआरपी मिळाला असता, प्रेक्षकांना आयतं मनोरंजन आणि कुणी सांगावं शेतकऱ्याच्या पोरायल्ना जीवनसाथीही मिळाली असती.

 या शो ची नक्कल भारतीय टेलिव्हिजनवर दिसली खरी पण त्यात शेतकरी दिसला नाही तर राहुल महाजन, राखी सावंत अशी पात्र दिसली.

रियॅलिटी शो असला म्हणून काय झालं, शेतावरची मेहनतीची काम करायला कोण शहरातली पोरगी तयार होईल? आपल्या शेतकऱ्याची-समाजाची अवस्था चॅनेलवाल्यांनाही चांगली माहिती आहे, काय विकलं जातं हेही त्यांना बरोब्बर समजलंय. जगभरात शेतकऱ्याच्या नावानं गाजत असलेल्या या रियॅलिटी शोची आपल्याकडे कॉपी करताना त्यातून शेतकरी गायब होतो तो त्यामुळेच.

या कन्सेप्टमध्ये बदल करुन शेतकऱ्याच्या जीवनाची रियॅलिटी कधी तरी पडद्यावर आणायला वाव आहेच. बाकी आपल्याला पचतील-रुचतील असे बदल करुन, भविष्यात- २०-२५ वर्षात कधीतरी FARMER WANTS A WIFE किंवा शेतकरी नवराच हवा गं बाई असं वाक्य भारतातल्या टिव्ही शोमध्ये जरी ऐकायला मिळालं तरी भरुन पावलं म्हणायचं.

वदनी कवळ घेता remixed

जेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक लहानपणी कानावर पडायचाच, बहुतेक शाळांमध्ये म्हणावा लागायचा…

माझ्या thank you शेतकरी दादा ब्लॉगच्या निमित्ताने बोलताना प्रसन्न जोशीने,

वदनी कवळ घेताच्या या दुसऱ्या/ improvised version ची  पुन्हा भेट घडवून आणली. 

यात शेतकरी कामगाराप्रती ऋण व्यक्त करण्याची भावना ठळकपणे जाणवते.

तुम्हालाही आवडेल…

वदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे

सहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे

कृषीवल कृषीकर्मी, राबती दिन रात

श्रमीक श्रम करोनी, वस्तू त्या निर्मितात

स्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल

उदर भरण व्हावे, चित्त होण्या विशाल!!

 

जेवणाच्या आधी हे म्हणायला, किमान आठवायला काय हरकत आहे.

THANK YOU शेतकरी दादा!

काही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना  Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं होतं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना तिथं पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today? असं तिथं विचारलं जातं. आता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी दूर करण्यासाठी  KNOW YOUR FARMER, KNOW YOUR FOOD (KYF2) ही योजना सुरु केलीय.

आपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरीग्राहकांना ठामपणे वाटत असतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो.

आपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं  बऱ्याच शहरी  मुलांना आजही वाटतं. मॉलच्या चकाचक रॅकवर दिसणारा गहू-तांदूळ-दूध-भाजीपाला आपोआप येत नाही, यासाठी ऊन-वारा-पावसाची तमा न करता, अनंत अडचणींशी सामना करत, शेतकरी नावाचा उपेक्षित जीव कुठेतरी दोन-चारशे किलोमीटरवर शेतात राबत असतो हे त्यांना कळणार कसं? इथेच आपण प्रत्येकजण महत्वाचा रोल निभावू शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून ती नव्या पिढीपर्यंत पोचेल याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी.

बियाणं वेळेवर मिळत नाही, खतं वेळेवर मिळत नाही, मजूरांची समस्या वेगळीच, कुठुन तरी कर्ज मिळवायचं शेतात काहीतरी पेरायचं,  पाऊस त्याच्या लहरीप्रमाणेच पडतो, निसर्ग साथ देईल अशी प्रार्थना करायची, दिवस रात्र मेहनत करायची, शेवटपर्यंत पीकाची काळजी घ्यायची, चांगलं उत्पादन मिळालं तर बाजारभाव चांगला मिळेल- व्यापाऱ्यांची मेहेरनजर राहिल अशी अपेक्षा करायची. अशा आणि आणखी अनंत अडचणींवर मात करत शेतकरी जगत असतो.  त्याच्या आत्महत्येच्या-मरणाच्या बातम्या आपल्यापर्यंत अधनंमधनं पोचतात पण तो जगतो कसा ते पोचतंच नाही, आपणही कधी ते जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत नाही. अशा प्रतिकुल परिस्थितीत जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का?

ज्याच्यामुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं त्या शेतकऱ्याचे आभार मानायचे… ही कल्पना मला त्यामुळेच खूप आवडली.

तशी  Thank a farmer (TAF) ही संकल्पना आपल्यासाठी नवी नाहीय, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणत आपल्या पूर्वजांनी शेतकऱ्यांचे आभारच मानले आहेत, फक्त आपल्याला त्याचा थोडासा विसर पडत गेला इतकंच. पाश्चात्यांचं अनुकरण करायची आपल्याला सवय आहेच, आता तिकडे TAF सुरु आहे म्हटल्यावर आपल्यालाही ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणजेच ASB चं महत्व कळेल अशी आशा करायला काय हरकत आहे.

शहरीकरणाच्या-आधुनिकतेच्या झगमगाटात आपण ग्रामीणभागापासून- शेतकऱ्यापासून मनानं दूर गेलो आहोत. TAF म्हणा, ASB म्हणा यानं किती फरक पडेल किंवा शेतकरी-ग्राहकामधली दरी किती मिटेल माहित नाही, पण शेतकऱ्याच्या कामाबाबत थोडी माहिती, थोडा आदर जरी तरुण पिढीच्या मनात निर्माण झाला तरी एका मोठ्या बदलाची ती सुरुवात असेल.

मग आज माननार शेतकऱयाचे आभार? म्हणणार THANK YOU शेतकरी दादा?