किमान चार महिने चलन वेदना
नोटाबंदीचा निर्णय होऊन १० दिवस उलटले. रांगेतल्या ‘चलन वेदना’ कमी झालेल्या नाहीयत. नोटांची टंचाई नाहीय असं अर्थ खातं सांगतंय तरीही रांग सांशक आहे.
नोटा आहेत मग सगळीकडे पोहोचायला उशीर का होतोय असा प्रश्न रांगेला पडतोय.
रोजच्या व्यवहारात किती नोटा आहेत, नव्या नोटा यायला किती वेळ लागेल, परिस्थिती कधी सुधारेल या प्रश्नांनी रांगेची अस्वस्थता वाढतेय.
पंतप्रधान मोदींनी ५० दिवस धीर धरायचं आवाहन केलंय. मात्र चलन वेदना कमी व्हायला कमीत कमी ३ ते ४ महिने लागतील असा अंदाज आहे.
एकूण किती नोटा चलनात होत्या?
अंदाजे ९ हजार कोटी नोटा
—–****——
कितीच्या किती नोटा होत्या ?
२ रुपये आणि ५ रुपयाच्या – ११६२ कोटी नोटा
१० रुपयाच्या – ३२०० कोटी नोटा
२० रुपयाच्या – ४९२ कोटी
५० रुपयाच्या – ३८९ कोटी
१०० रुपयाच्या – १५७७ कोटी
५०० रुपयाच्या – १५७० कोटी नोटा तर
१००० रुपयाच्या – ६३२ कोटी नोटा
अशा एकूण – ९ हजार कोटी नोटा चलनात होत्या
—-***—–
किती नोटा बाद झाल्या?
या ९ हजार कोटींपैकी २५ टक्के वाटा १ हजार आणि पाचशेच्या नोटांचा होता (संदर्भ – rbi )
चलनबंदीच्या निर्णयामुळे १ हजाराच्या ६३२ कोटी नोटा तर ५०० च्या १५७० कोटी नोटा बाद झाल्या. अशा अंदाजे २३०० कोटी नोटा बदलाव्या लागतील.
दरवर्षी १५०० कोटी खराब नोटा बाहेर काढल्या जातात त्यात १०० च्या ५०० कोटी, १० च्या ५०० कोटी आणि ५०० च्या २८० कोटी कोटी नोटा असतात. एकूण अर्थव्यवस्थेत नकली नोटांच्या रुपात (FICN) ४०० कोटी रुपये आहेत असं अर्थखात्याची आकडेवारी आहे.
या नोटांचं मूल्य किती ?
८ नोव्हेंबरला साडे सोळा लाख कोटी रुपये चलनात होते त्यात एक हजाराच्या नोटांचं मूल्य ६ लाख ३२ हजार कोटी रुपये तर पाचशेच्या नोटांचं मूल्य ७ लाख ८५ हजार कोटी रुपये असे दोन्ही मिळून साडे चौदा लाख कोटी रुपये होतं. एकूण चलनात या दोन बड्या नोटांचा वाटा होता तब्बल ८६.४ टक्के .
२ हजाराच्या किती नोटा छापाव्या लागणार?
त्या साडे चौदा लाखापैकी सरकार नेमका किती पैसा परत आणणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत पण एक हजाराच्या सगळ्या ६३२ कोटी नोटा २ हजाराच्या नोटांनी बदली करायचं ठरवलं तर २ हजाराच्या ३३१ कोटी नोटा छापाव्या लागतील.
कुठे छापतायत नोटा?
पश्चिम बंगालच्या सालबोनी आणि कर्नाटक राज्यातल्या म्हैसुरमध्ये भारतीय रिजर्व बँकेचं नोट मुद्रणालय म्हणजेच छापखाना आहे तिथे हे काम सुरुय. (Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited)
देशाला लागणाऱ्या चलनापैकी ६० टक्के नोटा या दोन ठिकाणी छापल्या जातात (संदर्भ – BRBNMPL)
यासोबतच मध्यप्रदेशातील देवास आणि आपल्या नाशिकच्या मुद्रणालयात म्हणजेच छापखान्यात ४० टक्के नोटा छापल्या जातात. (Currency Note Press)
नव्या नोटा कधीपासून छापतायत?
नवीन नोटांवर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे, त्यांनी ५ सप्टेंबरला पदभार स्वीकारला म्हणजे २ हजाराच्या नोटा छापण्याचं काम सप्टेंबर- ऑक्टोबरपासून सुरु असावं . ५०० च्या नोटा छापण्याचं काम मात्र याच महिन्यात सुरु झाल्याचं सांगतात.
नोटा छापण्याची क्षमता किती?
सालबोनी आणि म्हैसुरमध्ये वर्षाला दोन शिफ्टमध्ये १६०० कोटी नोटा छापल्या जातात, त्यात देवास आणि नाशिकची भर घातली तर ही चार ठिकाण मिळून वर्षाला दोन शिफ्टमध्ये अंदाजे २६०० कोटी नोटा छापण्याची क्षमता आहे म्हणजे महिन्याला अंदाजे २०० कोटी नोटा.
मात्र नोटाबंदीची तयारी म्हणून सप्टेंबर ऑक्टोबरपासून दोन ऐवजी ३ शिफ्टमधे काम सुरुय त्यामुळे महिन्याला ३०० कोटी नोटा छापणं शक्य आहे.
आत्ता रोज किती नोटा छापल्या जातायत?
सर्व चारही छापखाने पूर्ण क्षमतेने ३ शिफ्टमधे चालतायत असं गृहित धरलं तरी रोज १० कोटी नोटा छापल्या जातायत.
२ हजारच्या नोटा सरकारकडे आहेत का ?
चारही मुद्रणालयात २ हजाराच्या नोटा छपाईचं काम ऑक्टोबरमध्ये सुरु झालं असं गृहीत धरलं तरी १ हजाराच्या सर्व नोटांच्या बदली लागणाऱ्या २ हजाराच्या ३३१ कोटी नोटा एव्हाना सरकारच्या खजिन्यात तयार असतील.
५०० च्या नोटांची काय स्थिती?
५०० च्या नवीन नोटा काही प्रमाणात मिळणं सुरु झालंय.५०० च्या जुन्या सगळ्या म्हणजे १५७० कोटी नोटा बदलायच्या आहेत. चारही छापखाने पूर्ण क्षमतेनं चालले म्हणजे महिन्याला फक्त पाचशेच्याच ३०० कोटी नोटा छापल्या तरी सर्व नोटा बदलायला किमान पाच महिने लागतील. जुन्या नोटांइतक्या नोटा सरकार बाजारात आणणार नाही असं गृहित धरलं, यातल्या ८० टक्के छापायचं ठरवलं तरी कमीत कमी ४ महिने लागतील.
चलन वेदना किती काळ?
नव्या नोटांना सामावून घेण्यासाठी दररोज २० हजार एटीएम अपग्रेड केले जातायत, देशातले सर्व सव्वा दोन लाख एटीएम अपग्रेड व्हायला किमान १० दिवस लागतील म्हणजेच या महिन्याअखेरीपर्यंत सर्व एटीएमवर २ हजाराच्या नोटा मिळू लागतील, ५०० च्या नोटाही मिळू लागल्या की परिस्थिती निवळेल. सामान्य जनतेला नोटाबंदीच्या निर्णयाचं महत्व कळतंय, त्यामुळेच ती फार कुरकुर न करता रांगेत उभी आहे, उभी राहील मात्र ८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री चलनबंदीनंतर बाद झालेले साडे १४ लाख कोटी रुपये पुन्हा चलनात येण्यासाठी किमान फेब्रुवारी तरी उजाडेल.
(एबीपी माझाच्या स्टोरीची लिंक )
Pingback: नोटाबंदी आणि ई-पेमेंट | रामबाण
अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, सगळं पूर्ववत होण्यासाठी ५० दिवसापेक्षा जास्त काळ लागणार हे निश्चित.