मला बी आपमंधी येंऊं द्या की रं…

स्थळ: जंतर मंतर, दिल्ली.

दिनांक: 11 डिसेंबर

वेळ: रात्री 8 नंतरची

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दिल्लीत मोठं यश मिळवलं.

सर्वसामान्यातील सर्वसामान्य लोकांना विधानसभा निवडणुकीत उभं केलं, लोकांनी त्यांना निवडुनही दिलं. जंतरमंतरवर सगळ्या नवीन निवडून आलेल्या आमदारांसह केजरीवाल यांनी जनतेशी संवाद साधला, सगळ्या वाहिन्यांनी ते लाईव्ह दाखवलं. सगळ्या प्रामाणिक लोकांनी आप मध्ये यावं असं आवाहन त्यांनी केलं. तेवढचं नाही तर प्रत्येक पक्षात ईमानदार लोक आहेत, त्यांची तिथे घुसमट होत आहे त्यांनी बंड करावं किंवा आमच्या आम आदमी पक्षात यावं असं आवाहन केलं. उद्या कुमार विश्वाससोबत राळेगणाला जाणार आणि अण्णांच्या समोर पब्लिकमधे बसणार वगैरे घोषणाही केली.

————–*********************———————

स्थळ:- साहेबांचं निवासस्थान

दिनांक 11 डिसेंबर

वेळ रात्री 8 नंतरची

दिल्लीतील निकालानंतर साहेब अस्वस्थ येरझाऱ्या घालत होते.

अखेर ही संधी साधून नाराजीला ब्लॉगमधून थोडी वाट मोकळी करुन दिली होतीच,

राहुल की सोनिया, मनमोहन की पृथ्वीराज, आप (AAP) की नॅक (NAC), की आणखी कोण… नेमकं निशाण्यावर कोण आहे; हे कळायला नको अशी नेहेमीची मोजकी सूचना ब्लॉग टिमनं तंतोतत पाळल्याचं समाधान चेहेऱ्यावर होतं…

नाही म्हटलं तरी थोडी उसंत होतीच.

टीव्ही ऑन केला तर समोर अरविंद केजरीवाल यांचं भाषण सुरु. वैतागून चॅनल बदललं तर तिथेही तेच… मराठी चॅनल लावलं तर तिथेही तेच… इंग्रजी चॅनेलांवर हेचं सुरु असेल असा अंदाज होताच, तो चुकला नाही…

असं एकानंतर एक चॅनलं बदलत असताना काही वाक्य कानावर पडली आणि…

आणि साहेबांनी स्वत: पत्र / ई मेल लिहायला घेतलं.

प्रिय एके,

तुमच्या पक्षानं दिल्लीत काँग्रेसची धुळधाण आणि भाजपची गोची केली त्याचा मला खूप आनंद झाला. अभिनंदन.

तुमच्या सारख्या नेतृत्वाची आणि पक्षाची देशाला गरज होती. तुम्हाला तर माहिती आहेच, आधीच्या पक्षात खूप घुसमट होत होती, त्यावेळी तुमचा आप पक्ष नव्हता म्हणून आम्हीच वेगळा पक्ष काढून त्यात गेलो.

गेली काही वर्ष आमच्याच पक्षात घुसमट होते आहे. ‘आपलेच दात आपलेच ओठ’, काय करायचं कळत नव्हतं, तेवढ्यात जंतरमंतरवरचं आपलं भाषण ऐकायला मिळालं. मी खूप प्रभावित झालो आहे.

ऊस असो की कांदा, गहू असो की साखर, जमीनीचं प्रकरण असो की कर्जमाफीचं, भाव पडलेले असो की महागाई असो…  देशात सर्वात जास्त चुकीच्या वावड्या आणि अफवा उठवल्या गेलेला एक आम आदमी म्हणून तुमच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचं मी ठरवलंय.

वाढदिवसाचं मुहुर्त साधत आम्ही आपल्या पक्षात प्रवेश करायचं निश्चित केलं आहे.

उद्या तुम्ही राळेगणसिद्धीला अण्णांना भेटायला येत आहातच, बाकीचं तिथे ठरवू.

हा मेलप्रपंच आपल्या दोघांमधेच ठेवाल अशी खात्री

आपला

***साहेब

————–**************————–

स्थळ:- आम आदमीचं कार्यालय

दिनांक 11 डिसेंबर

वेळ रात्री 11.30 -12 नंतरची

अरविंद केजरीवाल पत्र, निवेदनं मेल चेक करतायत, कुमार विश्वास दोघांचं पुण्याचं तिकीट बुक करायच्या घाईत आहेत तर योगेंद्र यादव, मनीष शिसोदिया देणग्यांची वगैरे प्लॅनिंग करतायत.

हमाम में सब...

हमाम में सब…

आज काहीशा अगम्य अशा वेगवेगळ्या मेलआयडीवरुन बरेच मेल आल्याचं केजरीवालांच्या लक्षात येतं. एका मेलपाशी केजरीवाल थबकतात. कोणाचा मेल असावा याचा अंदाज येणं कठीण, मग मायना पुन्हा पुन्हा वाचतात. त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतात. थोडा अंदाज येताच ते गडबडून जातात. काय करायचं सूचत नाही. सगळ्यात आधी कुमार विश्वासला पुण्याचं बुकींग कॅन्सल करायला सांगतात. मोठा ताप आल्यानं राळेगणसिद्धीला येणार नाही असं सहकाऱ्यांना सांगून खोकल्याचं औषध घेतात. उद्या राळेगणला गेलं तर कोणतं धर्मसंकट येणार याची माहिती सहकाऱ्यांना मेल वाचून आलेली असते.

त्याखाली तसेच कुठल्यातरी abc@xyz.com अशा वेगळ्यावेगळ्या मेलआयडीवरुन आलेले मेल असतात, केजरीवाल एकएक मेल ओपन करतात,

एकजण म्हणत होता, आपल्या बायकोचा हट्ट पुरवण हे पाप आहे का? घर घेणं हे सामान्य माणसाचं स्वप्न असतं, ते पूर्ण करणं हा गुन्हा आहे का? आणि असेल तर मी एकट्यानंच सजा का भोगायची?

बिल्डिंग एवढी मोठी, त्यात फ्लॅट घेणारे सगळ्याच पक्षाचे पण खुर्ची जाते म्या पामराची… याला तुम्ही काय म्हणाल? आम आदमीवरहा सरळसरळ अन्यायच आहे. तसा मी प्रामाणिक आहे, मला तुमच्या पक्षात यायंचंय….

एकजण म्हणत होता, तुमच्या पक्षाला दिल्लीत जे यश मिळालंय त्यात माझाही वाटा आहे, मी पुण्यातून तिथे येऊन मोठ्या खेळाचं आयोजन आणि त्या आयोजनाचा खेळ केला नसता तर तुम्हाला एक मुद्दा मिळाला नसता आणि एवढी मोठी संधी मिळाली नसती.  तसा मी प्रामाणिक आहे, मला तुमच्या पक्षात यायंचंय….

एकजण म्हणत होता, एकेकाळी पक्ष उभारला मी, खस्ता खाल्ल्या मी, देशभर फिरलो मी, पक्ष 2 वरुन थेट सत्तेत नेला मी, पण आता माझं कोणी ऐकतंच नाही, पक्षात माझंच एक चालत नाही, वय झालंय अंमळ पण सिंहासन एवढं जवळ असताना मला अडगळीत ढकलून दिलंय आणि स्वत: समृद्ध होतायत… माझी खूप घुसमट होतेय पक्षात, तसा मी प्रामाणिक आहे, मला तुमच्या पक्षात यायंचंय….

एक जण म्हणत होता, सायेब म्हणतात तेच आमचं बी म्हणणं हाय… नेतृत्व कणखर पायजे… तशी आमची तयारी जोरातंय. पार बीडापर्यंत नेटवर्क सिग्नल स्ट्राँग राहिल याचा बंदोबस्त केलाय. पण साहेब काय करतील काही नेम नाही, आधीच पाण्याची पखाल गळ्यात अडकवलीय, त्यामुळे तयारीत असलेलं बरं. आमदार आपल्याच मागं आहेत. तसा मी प्रामाणिक आहे, मला तुमच्या पक्षात यायंचंय….

एक जण म्हणत होता, साहेब आधार होते, ते गेले आणि सगळे ग्रहच बदलले हो. पक्षाचे आणि आमचेही, अपमानाची पर्वा नव्हती तशी कधी पण तो कोणी करावा याचा धरबंद सुटलाय हल्ली आणि वयाचाही विचार करु नये यापेक्षा दुर्दैव ते कोणतं? नेतृत्व कसं कणखर हवे… तुम्ही द्याल ती जबाबदारी पार पाडू, आम्ही प्रामाणिक आहोतच, आम्हाला तुमच्या पक्षात यायंचंय…

एकजण म्हणत होता/ होती, एरवी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही पण संसदेत काम अडलं, मत पाहिजे असलं की लगेच सीबीआयची भिती दाखवतात. देशासाठी, गरीबासाठी काही करायचं म्हटलं तर मेलं कुणी करु देत नाही, तशी मी प्रामाणिक आहे…मला तुमच्या पक्षात यायंचंय

एकजण म्हणत होता, मी हरियाणातला छोटा शेतकरी आहे, मला थोडी जमीन सरकारनं दिली आहे, थोडी खाजगी कंपन्यांनी, त्यावरच माझं घर चालतं, ते सुद्धा लोकांच्या डोळ्यात खुपतं, नाही नाही ते आरोप करतात, मी काय घरजावईय का असं विचारतात, तसा मी प्रामाणिक आहे, मला तुमच्या पक्षात यायंचंय….

तसे आम्ही प्रामाणिक...

तसे आम्ही प्रामाणिक…

काहींचं म्हणणं होतं, जातीचं, धर्माचं, घराणेशाहीचं, भाषेचं, प्रांताचं, पैशाचं, गुन्हेगारीचं, अन्नाचं, धान्यांचं, धन्याचं, मानाचं, सगळ्या पद्धतीचं राजकारण करुन थकलोत, थोडा चेंज हवा आहे… तसे आम्ही प्रामाणिक आहोत, आम्हाला तुमच्या पक्षात घ्या….

मराठी, बंगाली, तमिळ, उर्दु वगैरे जवळपास सगळ्या भाषांमधले मेल होते, मेल करणारांमधे बिल्डर्स, शिक्षण सम्राट, सहकार सम्राट, कॉँट्रॅक्टर्स, नोकरशहा, सामान्य जनतेचा कळवळा वगैरे असणारे झाडून सगळेसगळे होते,पण…

एक मेल तर कोरा करकरीत होता, काहीच न लिहिता कोणीतरी बरंच काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होतं… हजारो शब्दांपेक्षा हा कोरा कागद चांगलाच बोलका वाटत होता…

झोपेनं केजरीवालांचे डोळे गपागप मिटत होते, झोपण्यापूर्वी एक शेवटचाच मेल बघू म्हणून त्यांनी क्लिक केलं तर मेल अर्धाच ओपन झाला, कुणीतरी रागारागात कागद फाडून टाकल्यासारखा…

मायना थोडा थोडा दिसत होता… माझ्या खापरपणजोबांनी, माझ्या पणजोबांनी, माझ्या आजोबांनी, माझ्या आजीनं, माझ्या बाबांनी, माझ्या आईनं, माझ्या अमक्यानं माझ्या तमक्यानं वगैरे लांबण इतकी लांबली की पीसीच हँग झाला…

या सगळ्यांचं,  देशाचं, जनतेचं आणि आपचं कसं होणार या विचारात केजरीवालांना तिथे खुर्चीतच कधी झोप लागली कळलंच नसेल. 🙂

(अगा जे घडलेचि नाही)

2 thoughts on “मला बी आपमंधी येंऊं द्या की रं…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s