सगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून कुछ नही हो सकता इस देश का किंवा चलता है, सामान्य माणसासाठी-जनतेसाठी- देशासाठी कोणताच राजकीय पक्ष काम करत नाही, परिस्थिती बदलूच शकत नाही असं आपण नकळत गृहित धरलेल. त्यामुळेच करायचं कशाला, आणि करायचं असेल तर आपणच का, दुसऱ्या कुणाला तरी करु दे की असं नकारात्मक वातावरण असताना अण्णांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आलं. त्या आंदोलना दरम्यान सोशल मीडियाची औट घटकेची का असेना पण ताकद आणि अरविंद केजरीवाल, त्यांचं संघटन कौशल्य लोकांना पाहायला मिळालं. आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ‘आप’ चा इथेच जन्म झाला.
अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा त्यांच्या आणि अण्णा हजारेंमधील वादाबद्दल मत-मतांतरं असतीलही, तसे ते काही रुढार्थाने मुरब्बी, धुर्त वगैरे राजकारणी नाहीयत, पण अमर्यादीत सत्तेमुळे मुजोर झालेल्या राजकारण्यांचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये असा प्रघात रुढ असल्यामुळे असेल कदाचित; गेली काही वर्ष अनेक SCOUNDRELS नी POLITICS ला शेवटचं नाही तर पहिलं आश्रयस्थान बनवल्याचं चित्र तयार होत होतं, त्याला केजरीवालांनी तडा दिला. System ला नावं ठेवतं बसण्यापेक्षा, ‘be in the system TO change the system; असं त्यांनी ठरवलं. त्यांनी धाडस केलं. त्याचं कौतुक आहे. घराणेशाहीत अडकलेल्या राजकारणालाही एखादा मोकळा श्वास हवाच आहे.
केंद्रातल्या यूपीए सरकारच्या खराब झालेल्या छबीचा तसंच दिल्लीतील शीला सरकारच्या अँटी इनकम्बसीचा फायदा विधानसभेला होणार म्हणून भाजप गुडघ्याला बाशिंग लावून तयार होता. त्यांची ग्रॅंड पार्टी थोड्याफार प्रमाणात स्पॉईल केलीय अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने. आधी स्वत:, मग स्वत:चा परिवार मग सगेसोयरे, मग माझा पक्ष मग वेळ मिळाला आणि पैसा वाचलाच तर देश –देशातली जनता असं सध्याच्या राजकारणाचं चित्र… प्रस्थापितांच्या गलिच्छ आणि स्वकेंद्रीत राजकारणाला कंटाळलेल्या जनतेला ‘आप’च्या रुपाने एक पर्याय मिळाला असं वाटलं तर त्यात सर्वसामान्य लोकांचा दोष नसेल.
फेसबुक, ट्विटरवर अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ ची चर्चा होती तोवर बाकी पक्ष सुस्त होते, सोशल मीडियावर पडिक असलेले लोक काही घराबाहेर पडून मतदान करत नाहीत असा विश्वास त्यामागे होता. पण मतदानाला बाहेर पडणाऱ्या लोकांमधे – वस्त्यांमधे ‘अब की बार चलेगी झाडू ’ अशी चर्चा सुरु झाली, तसंच विविध वाहिन्यांच्या ओपिनियन पोलमधे अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीची हवा दिसू लागली तशी सुरुवातीला ‘आप’ला रिडीकूल करणाऱ्या काँग्रेस आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली. त्यामुळेच त्यांनी सर्वात सोपा मार्ग अवलंबला, ‘आप’ कशी वेगळी नाहीय, कशी बदनाम, भ्रष्ट आहे वगैरेसाठी स्टिंग ऑपरेशन केलं, केजरीवालांनी अण्णांच्या आंदोलनाचा पैसा वापरला वगैरे आरोप केले, हेतू हा की आम्ही तर चांगले नाहीच आहोत पण तुमच्या समोर पर्यायही चांगला नाहीय असं जनतेच्या मनात ठसवायचं. त्याचा कोणाला, किती फायदा होतो ते कळेलच.
दिल्ली एका अर्थाने ‘आप’ साठी प्रयोगशाळा आहे. ‘आप’ ने काँग्रेस भाजप सारख्या पक्षांना सुद्धा शिक्षण, चारित्र्य वगैरे चांगले निकष बघून उमेदवार देणं भाग पाडलं. काँग्रेस आणि भाजपला दखल घ्यायला लावली यातच आम आदमीचं यश आहे. केजरीवाल किंवा ‘आप’ जे मोठमोठे दावे करत आहेत, ते सगळे लगेच पूर्ण होतील आणि एका रात्रीत देश बदलेल अशी खरं तर दिल्लीतल्या जनतेचीही अपेक्षा नसेल, त्यातलं १० टक्के जरी ते करु शकले तरी लोकांना ते पुरेसं असेल.
दिल्ली निवडणुकात जे होईल त्यातून देशभरात ‘आप’बद्दल वातावरण निर्मितीसाठी मदत होणार आहे. त्यांना दिल्लीत यश मिळेल की नाही ते कळेलच. संरजामशाहीची, गुलामगिरीची, राजा पाहायची, घराणं पाहायची, लार्जर दॅन लाईफ हिरो पाहायची सवय भिनलेल्या आपल्यामुळे कदाचित आपण ‘आप’ला फार यश मिळू देणारही नाही, पण बुरसटलेल्या राजकारणाला पर्याय देण्याचा हा एक प्रयत्न असेल आणि त्याचा हेतू वरवर तरी चांगला आहे.
एबीपी न्यूजचा ओपनियन पोल बघितला तर ‘आप’ च्या मदतीशिवाय दिल्लीचं सरकार बनू शकणार नाही असंच सध्याचं चित्र आहे, त्याचा फायदा ‘आप’ ने घ्यायला हवा.
दिल्लीतली जनता किती मतदानकेंद्रात झाडू ‘चालवते’ की ‘आप’लाच झाडून लावते याकडे सगळेच पक्ष डोळे लावून असतील, त्यावर येत्या लोकसभेसाठीची काही गणितं अवलंबून असतील. राजकारण कुठल्या दिशेने जाणार ते ही ठरेल. आम मतदारांनी ‘आम आदमीच्या’ पारड्यात मताचं दान टाकलंच तर जेवढ्या जागा येतील तिथे ‘आप’ने संधी न दवडता, अपेक्षाभंग न करता, प्रस्थापितांपेक्षा चांगलं काम करु दाखवावं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
इथं बसून अंदाज येणं तसं अवघड आहे पण मी दिल्लीत असतो तर यावेळी तरी ‘झाडू’समोरचं बटन दाबायचा मोह टाळणं अवघड गेलं असतं, कदाचित 🙂
(एबीपी माझाच्या ब्लॉगची लिंक)
Wait 8dec.
सर .. जर कॉंग्रेस च्या मदतीने “आप” ने किवा “आप” च्या मदतीने कॉंग्रेस ने सरकार स्थापित केल तर उचित ठरेल का ??
राजकारणात काहीही होऊ शकतं, पण तुम्ही म्हणताय तसं यावेळीच झालं तर ‘आप’ सुरु व्हायच्या आतच संपेल…