मी त्याला देव मानत नाही…

मी त्याला देव मानत नाही… पण त्याची एकही इनिंग पाहायची संधी मी सोडली नाही, सुरुवातीची ११ वर्ष तरी.  त्यासाठी किती जुगाड केलेयत, गणती नाही.  असं करणाऱ्या कोट्यवधींपैकी मी ही एक होतो…

THANK YOU SACHIN

THANK YOU SACHIN

छापखाना गल्लीतला मामाचा वाडा. दारासमोर गणपतीचं मंदिर, पिंपळाचा पार.   काळे गल्लीतून फारफार दहा मिनिटं लागायची. लहानपणी हक्कानं जाण्याचं ठिकाण. मामीचे वडिल म्हणजे तात्यांची भेट तिथं कधीतरी झाली. मॅच असली की तात्यांनी रेडिओवर कॉमेंट्री लावलेली असायची. स्कोरवरुन थोडं बोलणं व्हायचं. क्रिकेटचं वेड असणारी म्हातारी माणसं त्याकाळी विरळच. त्यामुळे त्यांचं आदरयुक्त कौतुक वाटायचं. अशाच एका भेटीत तात्यांनी माझ्या हातात ‘षटकार’ दिला. बहुतेक पहिलाच अंक. त्याच्या मुखपृष्टावर फटाक्याची लड, सुतळी बॉम्ब वगैरे बॅटवर घेतलेला सुनील गावस्करचा मस्त फोटो. ‘षटकार’ आणि ‘क्रिकेट सम्राट’चं व्यसन पुढे बराच काळ टिकलं. षटकारमधे एक बातमी आणि फोटो पाहिल्याचं आठवतंय. त्यात बहुतेक दिलीप वेंगसरकर आपली बॅट, कुरुळ्या केसाच्या एका लहान पोराला भेट देत होता. ती ‘आमची’ पहिली भेट.

काही वर्ष गेली, आम्ही काळे गल्लीतून सहयोग नगरात राहायला आलो. गावातल्या कंकालेश्वरच्या मोकळ्या जागेऐवजी नव्या सो कॉल्ड स्टेडियममधल्या बाभळी तोडून केलेल्या पिचवर क्रिकेट खेळणं सुरु झालं. घरांमधे रेडिओची जागा टिव्हीनं घेतली. सुनिल गावस्कर निवृत्त होऊन काही काळ लोटला होता, त्यांची जागा कोण भरुन काढणार अशी चिंता क्रिकेट कळणाऱ्या प्रत्येकाला होती, म्हणजे तशी मोठ्यांची चर्चा कानावर पडायची.

ऑफ स्टंप बाहेरच्या किंवा बाहेर भर्रकन जाणाऱ्या आऊटस्विंगरला इमानेइतबारे बॅट लावली नाही आणि स्लिपमधे कॅच दिला नाही तर पाप लागतं असा समज असलेली बरीच मंडळी त्या काळात होती टीममधे. जेनुईन फास्ट बोलिंगला आपले फलंदाज एकामागोमाग आऊट होताना बघणं कठीण जायचं. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा दौरा तर फार मनस्ताप देऊन जायचा.

हळुहळू  हे चित्र बदलणार होतं.

त्याच्या आगमनाची वर्दी मिळाली होती.

ही मॅच नेमकी कुठं पाहिली, की बातम्यात पाहिलं आठवत नाही पण पाकिस्तानात अनऑफिशियल वनडेत त्यानं अब्दुल कादिरला पुढं सरसावून त्याच्या डोक्यावरुन भिरकावून दिलं तेही एकदा नव्हे तर चारदा… तिथं कौतुक वाटलं, त्या सीरिजमधे नंतर इम्रान, अक्रमला धीरानं सामोरं गेला, बहुतेक पहिल्याच मॅचमधे गॅपमधून जाणाऱ्या त्याच्या दोन कडक बाउंड्रीज पाहून कौतुकात भर पडली, त्यानंतर वर्ष उलटण्याच्या आतच इंगलंडमधलं त्याचं पहिलं वहिलं शतक पाहताना त्या कौतुकाला धार चढली.

वयाने आपल्यापेक्षा दोन चार वर्षच मोठा असलेल्या इतक्या लहान पोराला एवढा मोठा चान्स मिळाला, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतोय वगैरे तुफान कौतुक आणि थोडीशी ज्येलसीही वाटत असावी त्यावेळी. शाळा कॉलेजचं, परिक्षेचं टेन्शन नाय काय नाय, फक्त खेळा, मस्त लाईफंय, साला, आपणही असं काही करायला पाहिजे असे फुका कॉन्फिडन्सचे दिवा स्वप्न रोज. त्याच्या मध्यमवर्गीय वगैरे बॅकग्राऊंडशी सहज जोड़ून घेता यायचं.

1992 चा वर्ल्ड कप अनेक गोष्टींमुळे लक्षात राहिला. बीडात ज्याच्या घरी कलर टीव्ही आहे त्याच्या घरी आम्ही काही मित्र एकत्र जमायचो, थोडा अभ्यास करायचो, भल्या पहाटे म्हणजे बहुतेक अडीच तीन वाजता उठून मॅच बघायचो. मार्टिन क्रोची कॅप्टनशिप, दीपक पटेलनं बॉलिंगची सुरुवात करणं, मार्क ग्रेटबॅचचा धडाका असा काहीसा वेगळा न्यूझीलंड संघ लक्षात राहिला. आणि लक्षात राहिली भारताची तशी सवयीची नांगीटाकू कामगिरी. त्यातही थोडा दिलासा म्हणजे पहिल्याच वर्ल्ड कपमधे खेळणारा, दोन चार मॅचेसमधे मोक्याच्या वेळी येऊन पटकन ५०-६० रन मारणारा, त्याकाळी टीममधे अभावानेच दिसणाऱ्या चपळाईने रन धावणारा, नॉन स्ट्रायकरलाही पळायला भाग पाडणारा, पाकिस्तानविरुद्धची ती मॅच जिंकून देणारी इनिंग खेळणारा तो चांगलाच लक्षात राहिला.

याच काळात क्रिकेटकडून अपेक्षा वाढल्या. त्यापोटी मॅच पाहायचं व्यसन लागलं आणि एखाद्या अॅडिक्टप्रमाणेच मॅच पाहता यावी यासाठी सगळे मार्ग आले.

आई कधीतरी काम सांगायची पण मॅच सुरु असेल तर ते टाळायची कला साध्य केली होती. ती सुरुवात होती.

अमरावती अनेक कारणांनी माझं वन ऑफ द आवडतं शहर. शिक्षणासाठी वगैरे तिथं चार वर्ष राहिलो. कॉलेजमधे किती शिकलो माहिती नाही, बाहेरच्या जगानं मात्र मस्त अनुभव दिेले. काही चांगले मित्रही… मोरे, गावंडे या मित्रकंपनीसोबत रुरलच्या ग्राऊंडवर जवळपास रोज क्रिकेट खेळायचो. समोर गर्ल्स होस्टेलही होतं. आम्ही जिथं राहायचो त्या घरमालकाच्या पोराला रिक्वेस्ट करायची, त्यानं खिडकी उघडी ठेवायची मग  खिडकीच्या गजातून दिसणाऱ्या टीव्हीत आपण मॅच बघायची असेही काही दिवस काढले. रुरल होस्टेलला टीव्ही असायचा, तिथं मित्रांकडे जाऊन, दंगा करत काही मॅचेस बघायला मिळाल्या. काही ‘एसप्या’ देशमुखच्या घरी.

तिथे पंचवटी चौकाजवळच्या राधानगरात एक मिनी थिएटर सुरु झालं होतं. एरवी हॉलिवूड मुव्ही बघण्याचा तो अड्डा. तिथे ९६ च्या वर्ल्ड कपच्या मॅचेस लाईव्ह दाखवणार असं कळलं. मोठ्या पडद्याचं अप्रुप होतंच. नेहमीप्रमाणेच एक अडचण होती… पैशांची. महिन्याच्या शेवटी शेवटी- आपत्काळात रुमवर साचलेली पेपर रद्दी आणि बाटल्या (रिकाम्या) हमखास मदतीला यायच्या, सगळ्याच बॅचलर्सच्या येतात कधी न कधी. मोजक्याच मॅचेस बघायचं ठरवलं. सगळी रद्दी आणि होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या बाटल्या (रिकाम्या) महिना संपायच्या आधीच भंगारात घातल्या, आणि मोठ्या पडद्यावर मॅच पाहायची सोय केली.

त्या एका मॅचमधल्या दोन गोष्टी लक्षात राहिल्या, एक, शेन वॉर्नच्या हातून बाहेर पडणारा आणि भयानक पद्धतीनं गर्रगर्र फिरत वळणारा पांढरा चेंडू, मोठ्या पडद्यावर तो आणखीन अंगावर यायचा, आणि दुसरी, भारताला विजयाकडे घेऊन जाणारी पण मार्क वॉच्या धुर्तपणाने यष्टीचित झालेली त्याची इनिंग.

त्यावेळचे त्याच्या आणि आमच्या चेहऱ्यावरचे निराशा हताशेचे भाव एकच असावेत.

पुढचा टप्पा होता परभणी. गाव बदललं पण क्रिकेट प्रेमाबाबतची परिस्थिती फार बदलली नाही. मॅचचा जुगाड कुठे होतो याचीच चिंता अभ्यासापेक्षा जास्त. लोकलचं कोण आहे, ज्युनिअर आहे की सिनीयर आहे, कोणाकडून जॅक लावता येईल असे विचार, मग कनेक्शन लावायचं. अशीच ढाणे-पाटील, संजू’राहुल रॉय’गुगवाड सारखी समवेडी सिनीयर मंडळी भेटली. एकदा त्यांच्यासोबत याचकाचे सगळे भाव तोंडावर ठेवत त्यांच्या मित्राच्या घरी मध्यरात्री आगंतुकपणे धडकलो. तिथं आधीच छोटी जत्रा. थोडावेळ मॅच पाहिली पण पावसानं राडा केला, सगळी मेहनत वाया. आफ्रिकेविरुद्धच्या त्या सीरिजने बऱ्यापैकी निराशा केली पण आम्ही आमचा नित्यनेम नाही सोडला.

नागनाथ होस्टेलला काही काळ पॅरासाईट म्हणून घालवला. मॅच असली की रात्री बाहेर निघायचं, स्टेशनला उभ्या असलेल्या वॅगनच्या खालून अंधारात अंदाज्यानं रुळ क्रॉस करुन गावात जायचं.

कुणीतरी सांगितलं विसावा लॉजमधे मॅच चालु असते मग एक मॅच तिथे धडकलो, तो जो कोणी तिथं ड्युटीवर होता त्याला दादा बाबापुता करत लोणी लावलं, पाचपाच रुपये दिले. मग त्याने आत घेतलं, तिथं जिन्याच्या पायऱ्यावर बसून आवाज न करता थोडा वेळ मॅच बघितली.

आता त्या रोडचं नाव आठवत नाहीये पण परभणीतला फेमस रोड, शेंगदाणे खात संध्याकाळी फिरण्यासाठी चांगला. तिथे मॅचच्या संध्याकाळी मार्केटमधे ज्या दुकानात टीव्ही सुरु असेल तिथं जाऊन दुसरी इनिंग बघायचो. एक आशाळभूत नजर टीव्हीकडे एक नजर गल्ल्यावरच्या दुकानदारावर ठेवत, बाहेर गटारीच्या एका काठावर एक पाय, दुसऱ्या काठावर दुसरा… असा तोल सांभाळायचा; ध्यान लावलेला बगळा आठवायचा; आपल्यामुळे दुकानदाराला थोडा सुद्धा त्रास होऊ नये अशी काळजी घ्यायची. कधी एखादा दुकानदार टीव्हीचा अँगल बदलून बाहेरच्याला म्हणजे आस्मादिकांना दिसणार नाही याची काळजी घ्यायचा, कधी एखादा दुकानदार चॅनलच बदलायचा. एखादा थेट खेकसायचा. एकानं टीव्ही बंद केला तेव्हा मी गटारीवरचा तोल सांभाळून त्याला बोललो, काय काका आमच्या घरीसुद्धा मोठा कलर टीव्ही आहे वगैरे. त्याला काही दया आली नाही. मी पुढच्या दुकानाचा रस्ता पकडला.

अशावेळी मोठया शोरुम्सचाही बऱ्याचदा आधार वाटायचा. तर कधी काही हॉटेलमधेही मॅच सुरु असायची. मनात नसताना जावं लागायचं, खिशाचा अंदाज घेत चहाची ऑर्डर द्यायची आणि जमेल तितका वेळ तिथं काढायचा असेही काही दिवस गेले.

टोरँटोतल्या सहारा कपच्या काही मॅचेस रात्री मेसमधे पाहिल्या. हे सारं किंवा यापेक्षा जास्त झेडझेड करणारे आपण एकटेच नाहीयत हे माहिती होतं.

तो चांगला खेळला, त्यातही भारत जिंकला तर तो दिवस आणि त्याच्या नंतरचे २-३ दिवस एकदम सॉलिड जायचे. मित्र कंपनीत तीच चर्चा. जणू आपणच खेळलो, आपणच मॅच काढली असा आव चेहऱ्यावर घेऊन हिंडायचो. तो आऊट झाला की मॅच बघण्यासाठी आपण उगीच इतकी झेडझेड केली असं वाटायचं.

पण ती ११ वर्ष फार छान गेली. त्याची अनेक कारणं होती. हिरो कपची लास्ट ओव्हर, मार्क मस्कारेन्स हे नाव आणि त्याकाळातला सगळ्यात मोठा तब्बल १०० कोटींचा करार, आपल्याशीच करार केलाय असं समजून कॅलकुलेशन्स करणं.  आफ्रिकेत एका सीरिजमधे क्रोनिएनं त्याचा केलेला बकरा, मॅकग्राविरुद्धची उच्च दर्जाची लढत, वॉर्नची धुलाई, शारजाह मधील दोन्ही मॅचमधील तुफानी खेळी, पाकिस्तान विरुद्धची जवळपास प्रत्येक वर्ल्ड कपमधील कामगिरी, नंतर स्टीव्ह बकनरला सर्वात मोठा व्हिलन मानून त्यांच्या अंपायरिंगला दिलेल्या शिव्या, अझर, जाडेजा, मोंगियाच्या काळातली त्याची अगतिकता, क्रिकेट वगैरे वाचवण्याची धडपड, पाकविरुद्धची चेन्नई कसोटी, त्याही अवस्थेत टिच्चून खेळणं मॅच काढायच्या जवळपास नेणं आणि आऊट होणं, आपलं चरफडणं, तो आऊट झाला की मॅच संपल्यात जमा असणं आणि तो स्ट्रेट ड्राईव्ह, अशा अनेक गोष्टी आठवतात.

खेळायचा तो, पण एक वेगळा आत्मविश्वास, सकारात्मकता मिळायची आपल्याला.

सगळ्या गोष्टींचं तुफान कौतुक त्यातलं जास्त मनातल्या मनात.

नंतर नोकरीसाठी हैदराबाद गाठलं. तिथंही निखिलच्या (आता TV9 मुंबई) खाजेपायी दर रविवारी क्रिकेट खेळणं सुरु होतं. क्रिकेट बघायचोही पण ती मजा येत नव्हती, शेवटी तो ही एक माणूस आहे हे लक्षात ठेवायचो त्यामुळे फार अपेक्षाही ठेवायचो नाही.

त्यातल्या त्यात २००३ च्या वर्ल्डकपमधे ती जुनी झलक दिसली शोएब अख्तरला पहिल्याच ओव्हरमधे टाचा उंचावून पॉईंटच्या डोक्यावरुन मारलेला कडक सिक्स जितका आवडला तितकाच इंग्लंडविरुद्ध कॅडीकला मारलेला पुलचा सॉलिड सिक्स मनाला इतका आनंद देऊन गेला त्याला तोड नाही. असे आनंदाचे क्षण अधनंमधनं मिळत राहिले.

नोकरी मुंबईत घेऊन आली. मीडिया कपची प्रॅक्टीस करायची ठरलं. सुधीर रावने शिवाजी पार्कला सकाळी बोलावलं, तिथे एक नेट बुक केली होती. शनिवारी सकाळी पार्कात पोचलो पण आत जाऊ शकलो नाही लवकर. याच मैदानातून सुरुवात केली अशा दिग्गजांची नावं डोळ्यासमोरुन फिरली. कुठं बीडाचं ग्राऊंड, आपलं बॅकग्राऊंड, कुठं शिवाजी पार्क, वेगळंच दडपण जाणवलं. त्यावरुन कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांच्या दडपणाची पुसट कल्पना पुन्हा आली. त्या मैदानात सरावासाठी का असेना कधी मी हातात बॅट किंवा बॉल घेईल असं वाटलं नव्हतं. माझ्यासाठी तो मोठा क्षण होता, जगून घेतला.

एक माणूस… ज्याचा आणि आपला कधीही तसा थेट संबंध आला नाही, पण आपल्या एवढ्या मोठ्या प्रवासात तो आपल्या सोबत असतो, त्याला आपण आपलं मानतो, त्याच्याकडनं अति अपेक्षा ठेवतो, अपेक्षाभंगाचं दु:ख पचवतो, आपलेपणापोटी कधी पाठराखण करतो तर कधी शिव्या घालतो. त्याची निराशा आपली मानतो, त्याचं यश आपलं मानतो, त्याचे माईलस्टोनही आपले मानतो…

असं कधी होतं का आयुष्यात? पण हे झालंय, कोट्यवधी भारतीयांसाठी तब्बल २४ वर्ष आणि माझ्यासाठी किमान पहिली ११ वर्ष तरी.

या ११ वर्षाच्या प्रवासात, मॅच सुरु असताना ज्या आईनं दळण आणायची किंवा कुठल्याच कामाची सक्ती केली नाही, ज्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानातला टीव्ही सुरु ठेवला, मित्रांच्या ज्या मित्रांनी मॅचसाठी त्यांच्या घरात येऊ दिलं, ज्या हॉटेलवाल्यांनी एका चहावर १-१ तास बसून मॅच पाहू दिली, घरमालकाच्या मुलानं ज्यानं टिव्ही दिसेल इतपत खिडकी किलकिली ठेवली, ज्या मित्रांनी कुठल्याही थराला जात मॅच बघायला साथ दिली आणि आम्हाला मॅच बघता यावी म्हणून ज्या रद्दी आणि बाटल्यांनी भंगारात जाणं पसंत केलं अशा अनेक ज्ञात अज्ञातांचे आभार.

या शेवटच्या दोन कसोटीत काहीही झालं तरी त्याची चिंता मला नाहीये,

ती सुरुवातीची ११ वर्ष मला कायमची पुरतील,

तृप्त मनाच्या भरपूर शुभेच्छा सदैव त्याच्यासोबत असतील.

थँक्यू मित्रा…

होय मित्राच, कारण मी त्याला देव मानत नाही…

मला तो सदैव सोबत करणाऱ्या अदृश्य मित्रासारखा जास्त वाटला…

करोडो क्रिकेटप्रेमींच्या जीवनात आनंदाचे असंख्य क्षण पेरल्याबद्दल त्याचे आभार…

थँक्यू व्हेरी मच मित्रा…

(एबीपी माझाच्या वेबसाईटवर आलेल्या ब्लॉगची ही लिंक)

सुदाम्याचा कृष्ण

देव नाही मित्र

14 thoughts on “मी त्याला देव मानत नाही…

 1. खूप खूप सुंदर लिहीलंस मित्रा… एक जबरदस्त चौकार मारल्याचा आनंद मी घेतला. ‘तो’ मलाही कधी देव वाटला नाही. पण त्याची एकच गोष्ट सगळ्याच जास्त भावते, त्याचं उत्तुंग भरारी घेणं तरीही पाय जमिनीवर असणं. त्या मित्राला वैयक्तिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा !!!

 2. chhaan lekh….
  “mitra” maidanawar aani tamam cricketrasik “dabbya”samor…..
  ekhadya matchmadhe “Duck” var paratala ki kevdhi hurhur , pan pudhchyach matchla dimakhdar fatke marat rasikanchi sari chinta dur…
  manala jevdha anand dila tevdhich hurhur nirman keliye tyane jata jata…

  • Kharach re bhava, natyamule mhanshil nahitar Sachin’chya kadun cricket natyamule mhanshil….me pan bahutansh goshticha sakshi aahe shatkar vale maze tatya azoba asot kinva aapan sobat pahilela/khelalele cricket aso…jodnara duva mhanaje sachinach!!!!!

 3. mala match chi kaadhi aawad nvti pn he sagle wachun aanni gelya kahi diwasanpasun sachin baddal jewadh kahi jawadun aiktoy tyamule me khup kahi gamawaly asa satat wataty…..

  • yes गमावलंस खरं… पण आता रिपीट, रेकॉर्डिंगची सोय आहे ना, त्यात आनंद वगैरे मानून घ्यायचा 🙂

 4. या लेखातल्या बहुतेक आठवणी फक्त प्रसंग, शहर आणि थोडाफार तपशील बदलला तर मलाही लागू आहेत. क्रिकेटची मॅच आणि सचिनची इनिंग पाहण्यासाठी मागचे 20 वर्ष मी हेच करत आलोय.

  • 🙂 पैसे देऊनही केली नसती इतकी धडपड…कधी सार्थकी लागायची कधी पाण्यात जायची पण त्याचं फार काही वाटायचं नाही कधी.. किंवा आपण काही जगावेगळं करतोय असंही नाही वाटायचं…असं करणाऱ्या करोडोंपैकी आपण एक होतो याची जाणीव होतीच

   • Sir……..mi pan hotoch ki sahyog nagarla….kharach atishay bhari hote te divas…….

 5. ‘देव नाही मित्रच’ नी, माझ्याही 1986-87च्या दरम्यानच्या आठवणी जागवल्यास तू. त्यावेळी मी इंजिनिअरींग कॉलेज मध्ये शिकत होतो. सूट्टीत मुंबईला येणं झालं. सर्वत्र सचिन-कांबळी या जोडीची चर्चा होती. तुझा हा ब्लॉग वाचतांना निश्चितच तो काळ डोळ्यासमोर आला. काही प्रमाणात क्रिकेट खेळणाऱ्यांची जी मनस्थिती होते त्या स्थितिचं तंतोतंत वर्णन केलंस तू. सचिन खेळला अन आपण जिंकलो की काही दिवस खरच छान जाएचे.
  खरंतर जेंव्हा गावस्करने त्याला आपले पॅड भेट म्हणून दिल्याची बातमी वाचली होती तेंव्हाच त्याच्या बद्दलची अपेक्षा आणि त्याचे कौतूक वाटू लागले होते. पुर्वी मला गावस्करही खूप आवडायचा. अजूनही त्याचा खेळ आठवतो. फक्त स्कल कॅप घालायचा तो. हेलमेट न घालता ओपनर आणि तेही स्ट्राईकर म्हणून यायचा. केवढ त्याचं कौतुक होतं. सचिनने गावस्कर रिटायर झाल्याची कमी जाणवू दिली नाही. गावस्कर सारखाच कमी उंचीचा असणं. त्याही पेक्षा अगदी मिसूरडीही फूटली नसतांना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणं. भल्या फास्ट बॉलर्सना ठोकणं. मुर्ती लहान आणि कीर्ती महान गावस्कर सारखंच सनिलाही ही म्हणं लागू झाली. क्रिकेट प्रेमी त्याला देव मानतात. काही जणांसाठी तो देवासारखा असेलही, तूला तो मित्र वाटतो तेही योग्यच. मला तो आवडतो. का .. नाही सांगतायेत…बस..आवडतो. असं वाटतं….पुन्हा असा कोणी येईल का आपल्या वाटेला…आनंद देणारा… ज्याच्या मुळे क्रिकेट पहावसं वाटेल आपल्याला असा… पुन्हा!

 6. डोळ्यात केवळ अश्रूच आले…. आठवणीचे, आपलेपणाचे, आपल्या लहानपणीच्या एडछापपणाचे अश्रू……

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s