तुमचा PF (प्रॉव्हिडंट फंड) तुम्ही ऑनलाईनही बघु शकता.
तसंच पीएफ पासबुक डाऊनलोडही करु शकता,
EPFO (Employees’ Provident Fund Organization) ने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आत्तापर्यंत वर्षातून एकदाच पीएफ स्लिप कंपनीतर्फे दिली जायची, तेव्हाच पीएफ कळायचा. त्यानंतर मोबईलवर SMS मिळणं सुरु झालं, म्हणजे पीएफच्या साईटला जायचं आपला नाव, नंबर टाकायचा की मेसेज यायचा, पण त्यात फक्त रकमेचा एक आकडा कळायचा; तो ही बहुदा मार्च अखेर जमा असलेल्या पीएफचा.. डिटेल्स कळायचेच नाहीत.
आता मात्र ईपीएफ अकाऊंटचे सर्व डिटेल्स एका क्लिकवर मिळतील.
दर महिन्याला किती पीएफ जमा झाला?, त्यात तुमचा वाटा किती? तुमच्या कंपनीचा वाटा किती? तसंच ग्रॅच्युइटी किती जमा झाली हे सगळं रियल टाईममधे आपल्या पासबुकात पाहू शकता, डाऊनलोड करु शकता आणि फुर्सतीत पाहण्यासाठी प्रिंट सुद्धा करु शकता.
सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी ना आणखी एक User ID लक्षात ठेवायची कटकट, ना आणखी एक password आठवत बसायची झंझट…
तुमचा पॅन नंबरही पुरेसा आहे आणि तुमचा पासवर्ड असेल तुमचा मोबाईल. तेवढा मोबाईल आणि पीएफ नंबर जवळ असला की झालं.
पीएफ ऑनलाईन बघण्यासाठीच्या 10 सोप्या स्टेप्स
1. आपला पीएफ पाहण्यासाठी पहिल्यांदा ईपीएफच्या वेब पोर्टलवर जा, इथे क्लिक करा
2. पहिल्यांदा लॉग इन करण्यापुर्वी तुम्हाला REGISTER हे बटन दाबावं लागेल. तिथे दिलेली माहिती म्हणजे मोबाईल नंबर, जन्मतारीख वगैरे भरा.
3. पॅन कार्ड, वोटर कार्ड, आधार कार्ड, बँक अकाऊंट नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, पासपोर्ट नंबर अगदी रेशन कार्ड नंबर वगैरे पैकी जे ओळखपत्र तुमच्याकडे असेल त्याची माहिती भरा. शक्यतो यापैकी जास्तीत जास्त ओळखपत्रांची नोंदणी केली तर पुढे कधी आठवाआठवी करत बसावं लागणार नाही. अर्थात आता तुम्ही पीएफ पाहण्याच्या घाईत असाल तर हे सगळं नंतर कधीही अपडेट करु शकता.
4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पिन नंबर येईल तो तिथं दिलेल्या रकान्यात भरा की तुम्ही तुमच्या होमपेजला जाऊन पोचाल.
5. तिथे वर काही ऑपशन्स आहेत त्यात DOWNLOAD PASSBOOK सुद्धा आहे त्याला क्लिक करा.
6. राज्यात महाराष्ट्र क्लिक करा, त्यानंतर
7. आपल्या पीएफ ऑफिसचा कोड म्हणजे तुम्ही बांद्रा विभागात असाल तर MH- BANDRA क्लिक करा, किंवा नाशिक, औरंगाबाद वगैरे.
8. मग तुमचा पीएफ नंबर रकान्यात भरा. तुमचा पीएफ नंबर MH/48620/XXXX असेल तर त्यातील 48620 पहिल्या रकान्यात भरा,त्यानंतरचा रकाना ब्लँक सोडा आणि पीएफचे शेवटचे चार अंक शेवटच्या रकान्यात भरा.
9. त्या खाली दिलेला कोड सोबतच्या रकान्यात भरा. I Agree च्या रकान्यात टिक करा आणि GET PIN क्लिक करा. थोड्या वेळात तुमच्या मोबाईलवर चार आकडी पिन नंबर येईल,
10. त्याच पेजवर सर्वात खाली Enter Authorization PIN रकाना आहे त्यात तो पिन टाकला की तुमच्या पीएफ फाईलचं पीडीएफ मिळेल ते डाऊनलोड करा, पाहा किती PF जमा झालाय ते. हवं असेल तर सेव्ह करा किंवा ठोकताळ्यासाठी प्रिंट काढून घरी नेऊन निवांत बघा.
दुसऱ्यांदा कधी पीएफ पाहायचा असेल तर पॅन कार्ड किंवा तुम्ही रजिस्टर केलेल्या ओळखपत्राचा नंबर आणि फोन नंबर टाकून थेट साईन इन करु शकता.
समजा तुम्हाला कंपनी, पीएफ ऑफिस, पत्ता, विभागाचा कोड माहिती नसेल तर तो शोधण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. अगदी पिनकोड नंबरवरून सुद्धा पीएफ ऑफिस, ऑफिसरचे डिटेल्स मिळवू शकाल
सरकारी खातं अशा काही सुविधा ऑनलाईन देतंय, त्या वापरणं इतकं सोपं – user friendly वगैरे आहे, एखाद दिवसाचा अपवाद वगळता साईट व्यवस्थित सुरु आहे असे अनेक आश्चर्यमिश्रित सुखद धक्के पचवायची सवय लावून घ्यायची माझी तयारी आहे.
तुमच्या खात्यात भरीव पीएफ जमा होत राहो, दरवर्षी त्यात वाढ होत राहो ही सदिच्छा 🙂
( त्या 2-3 दिवसात एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर सर्वात जास्त शेअर केला गेलेल्या आणि वेबसाईटवरील सर्वाधिक वाचल्या गेलेल्या ब्लॉग पैकी एक या ब्लॉगची लिंक )
Very good