“पेरा पेरात साखर त्याचं पिकलं शिवार, घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते “
एकिकडे भीषण दुष्काळ, पाणी टंचाई तर दुसरीकडे याच पाण्यावर ऊस कारखानदारीची सूज; असं राज्यातलं चित्र. या असमतोलावर आणि त्याला कारणीभूत असलेल्या राजकारणावर कधी नव्हे इतकी टिका होतेय, त्याचा फारसा परिणाम होणार नसला तरीही.
याच स्थितीचं वर्णन ‘बलुतं’कार दया पवार यांनी केलं होतं. ते आठवण्याचं कारण ठरला परिणीता दांडेकर आणि हिमांशु ठक्कर यांचा नवा ब्लॉग, ज्याची सुरुवात दया पवारांच्या याच ओळींनी केलीय. South Asia Network for Rivers, Dams & People (SANDRP) च्या नव्या ब्लॉगची लिंक खाली दिली आहे, त्याआधी राज्यातल्या विदारक परिस्थितीच, धरणग्रस्तांचं, त्या स्त्रिचं दु:ख शब्दात पकडणाऱ्या दया पवारांना सलाम
बाई मी धरण धरण धरण बांधिते
माझं मरण मरण मरण कांडते
झुंजू मुंजू ग झालं पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा ग कोंडा ग कोंडा ग रांधिते
दिस कासऱ्याला आला जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरू लेकरू लेकरू पाटीखाली घालिते
काय सांगू उन्हाच्या झळा घाव खाली फुटे शिळा
कढ दाटे कढ दाटे पायी पाला मी बांधिते
पेरा पेरात साखर त्याचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडाळते
येल मांडवाला चढे माझ्या घामाचे ग अढे
माझ्या अंगणी अंगणी अंगणी पाचोळा ग पडे
—————–
रॉ कुठे सापडली नाही पण आनंद पटवर्धन यांनी गायलेली ‘धरण’ ची लिंक सापडली ती सुद्धा इथे देत आहे, एकदा जरुर ऐका – बाई मी धरण
SANDRP च्या ब्लॉग ची लिंक – ऊस, साखर, सोलापूर
अस्वस्थ करणारं वास्तव…