ऐतिहासिक कर्जमाफीचं ऑडिट

फक्त हेतू चांगला असून चालत नाही, अंमलबजावणीही चांगली हवी. याचा प्रत्यय तथाकथित ऐतिहासिक कर्जमाफीवरुन येत आहे. आस्मानी आणि सुलतानीशी लढा देवून थकलेल्या शेतकऱ्यांची ७१ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर होऊन पाच वर्ष उलटली. त्यात शेतकऱ्यांचा कळवळा कमी आणि मतांचं राजकारणच जास्त होतं. मलमपट्टी असली तरी कर्जमाफीची योजना बऱ्याच छोट्या, पिचलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी होती यात शंका नाही. तसं असलं तरी अंमलबजावणीतला फोलपणा गेल्या पाच वर्षात वारंवार समोर आलाय.

कॅगचे ताशेरे

कॅगचे ताशेरे

आता Comptroller and Auditor General of India म्हणजेच कॅगनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय इतकंच. 

२००८ च्या अर्थसंकल्पात आधी ६० हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली गेली. नंतर ती वाढवून ७१ हजार ६८० कोटी रुपयांवर न्यावी लागली.

३ कोटी ६९ लाख छोट्या शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ तर इतर ६० लाख शेतकऱ्यांना एकरकमी परतफेडीचा फायदा असं याचं स्वरुप होतं. एकूण ४ कोटी २९ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार होता. २००९ साली लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही खेळी खेळली गेली होती, युपीए दुसऱ्यांदा सत्तेत येण्यात या कर्जमाफीचा मोठा वाटा होता.

सत्ता मिळाली. पुढची निवडणूक आली तरी अनेक पात्र शेतकरी कर्जाचे हफ्ते भरतच आहेत. कोल्हापुरात ४५ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवत कर्जवसुली सुरु आहे. दुसऱ्या बाजुला जे शेतकरीच नाहीत त्यांचं होमलोन आणि कार लोन पण याच कर्जमाफीत नील झालंय असं कॅगच्या अहवालात समोर आलंय.

अवघड गणित

पाच वर्षांपूर्वी केंद्रानं ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली त्याचवेळी त्यातला फोलपणा समोर मांडला होता. खरे गरजू शेतकरी या योजनेपासून कसे वंचित राहतील हे वास्तव माध्यमांनी  समोर आणलं होतं. त्यानंतर केंद्रानं कर्जमाफीची रक्कम ६० ऐवजी ७१  हजार कोटीवर नेली. महाराष्ट्र सरकारनंही लगेच नागपूर अधिवेशनात ६,२०० कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती, ज्यात ५ एकरपेक्षा जास्त शेतीवाल्यांचे किमान २० हजार माफ होणार होते. आणखी ४० लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणे अपेक्षित होते.

म्हणजेच केंद्र आणि राज्यसरकारची मिळून अंदाजे १५ हजार कोटींची कर्जमाफी आणि ७५ लाख लाभधारक शेतकरी असा आकडा.

एवढ्या मोठ्या योजनेची अंमलबजावणी कशी होतेय याकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं. आता कॅगनं कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या साडे ते चार कोटीं शेतकऱ्यांपैकी फक्त ९० हजार खातीच तपासलीत. त्याचा हिशेब मांडल्यानंतर पुन्हा आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला आहे.

महाराष्ट्रात फक्त ५ जिल्ह्यात जवळपास १७ कोटींच्या कर्जमाफीची तपासणी केली गेली. त्यात १२ लाखाचा घोळ असू शकतो असा कॅगला संशय आहे.

सरकारनं/कॅगनं दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात आत्तापर्यंत ८९५१.३३ कोटींची कर्जमाफी झालीय.

कॅगच्या अहवालावरुन थोडीशी आकडेमोड केली तर महाराष्ट्रात अंदाजे किमान ६० ते ६५ कोटी रुपयांचा घोळ/अनियमितता असू शकते.

महाराष्ट्रात १४ हजार कोटींची कर्जमाफी पकडली तर हा घोटाळा १०० कोटींच्या पलिकडे जाऊन पोचतो. विरोधकांच्या मते हा आकडा राज्यात ६०० ते ७०० कोटींच्या घरात जाईल.  शेतकऱ्यांसाठीच्या या योजनेत  देशभरात किमान १० हजार कोटींचा घोळ झाला असल्याचा आरोप केला जातोय.

कॅगचा अहवाल संसदेच्या पटलावर येताच झाडून सगळ्या सत्ताधाऱ्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. असा घोळ झालाच नसल्याचं आणि असलाच तर तो अत्यंत किरकोळ असल्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा बचाव आहे. कॅगचा अहवाल झापडबंद पद्धतीनं केला असण्याची शक्यता आहेच. कारण या अहवालानुसार महाराष्ट्रात कॅगच्या तपासणीत फक्त ९८६ केसेस आहेत ज्यांना पात्रतेपेक्षा जास्त लाभ देण्यात आलाय, त्यातही फक्त १२ लाख रुपयांची अनियमितता दाखवण्यात आलीय. मग एकट्या कोल्हापुरातच ४५ हजार शेतकरी अपात्र ठरवले गेलेयत त्याचं काय? त्यांच्या कडून जी ११२ कोटींची वसुली सुरुय त्यातले ६० कोटी नाबार्डनं वसुलही केलेयत त्याचं काय? अंतर्गत  राजकारणामुळे का असेना कोल्हापुरातील प्रकरण समोर आलं. क्षणभर ते खरं मानलं तर कॅगच्या अहवालात दिसतोय त्यापेक्षा कितीतरी मोठा घोळ कर्जमाफीत समोर येईल.

देशाचे पंतप्रधान स्वत: विख्यात अर्थतज्ञ, केंद्रीय अर्थमंत्रालयाचा कारभार पी.चिदंबरम आणि प्रणब मुखर्जींसारख्या हुशार समजल्या जाणाऱ्या व्यक्तिंच्या हातात. मग एवढा मोठा घोळ पाच वर्ष लक्षात येत नाही, यावर कुणाचा विश्वास बसेल?

कॅगच्या अहवालाचं पुढं काय होतं हे आपल्या समजण्यापलिकडचं प्रकरण. २००८ ते २०१३ या ५ वर्षात कर्जमाफीचं ऑडीट का झालं नाही? पाच वर्ष रिझर्व्ह बँक आणि नाबार्ड झोपा काढत होतं का? आत्ताच म्हणजे निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपलेल्या असतानाच हा घोटाळा बाहेर का काढला जातोय? जे पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले त्यांचं काय? की अशा शेतकऱ्यांची सहानुभुती मिळवण्यासाठी दुसऱ्या कर्जमाफीची ही तयारी आहे? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न.

२००८ च्या ऐतिहासिक कर्जमाफीबाबत कॅगच्या अहवालातील काही महत्वाच्या बाबी –

७१ हजार ६८० कोटींची कर्जमाफी असली तरी २००८-९ ते २०११-१२ या काळात ५२ हजार ५१६ कोटी रुपये कर्जमाफी पोटी रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला मिळाले आहेत.

२०१० अखेर महाराष्ट्रातील ३० लाख २३ हजार छोट्या शेतकऱ्यांची कर्जमाफी तर १२ लाख २५ हजार शेतकऱ्यांना एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळाला. राज्यातील ४२ लाख ४८ हजार शेतकऱ्यांची एकूण ८ हजार ९५१.३३ कोटी रुपयांची कर्ज माफ झाली.

कॅगने २५ राज्यात ९२ जिल्ह्यात ९०,५७६ खाती तपासली, त्यात ३३० कोटी ३६ लाख ६४ हजार ९४५ रुपये माफी मिळालेली होती.

९ राज्यात ९३३४ खात्यांपैकी १२५७ म्हणजे १३.४६ टक्के खाती अशा शेतकऱ्यांची आहेत जे पात्र होते तरीही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही.

यात महाराष्ट्रातील ६२४ खाती तपासली त्यात फक्त १ शेतकरी आहे ज्याचं ९५ हजार ०८६ रुपयांचं कर्ज माफ होऊ शकलं असतं.

तसंच १८३ खाती अशी होती ज्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीत होतं तरीही त्यांचं कर्ज माफ झालं नाही.

तपासलेल्या ८०,२२९ खात्यांपैकी ८.५% म्हणजेच ६८२३ खाती अशी आहेत जी कर्जमाफी किंवा एकरकमी सुविधेसाठी अपात्र असूनही २०.५० रुपयांची माफी दिली गेली. एकूण विचार करता खूप मोठा आकडा असण्याची शक्यता कॅगने वर्तवलिय.

११७४ खाती अशी आहेत, जी निकषात बसत नव्हती म्हणजे त्यांचं गृह कर्ज, वाहन खरेदी कर्ज, गाळा खरेदी, जमीन खरेदी वगैरेसाठीच ४ कोटी ५७ लाख रुपये माफ केले गेलेयत.

यात महाराष्ट्रातील फक्त ४ खाती अशी आहेत ज्यात ८०,०५५ रुपयांचं कर्ज माफ केलं गेलंय.

१ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००७ दरम्यान दिलं गेलेलं, ३१ डिसेंबर २००७ पर्यंत थकीत असलेलं आणि २९ फेब्रुवारी २००८ पर्यंत एकही हफ्ता न फेडलेलं कर्ज माफ होणं गरजेचं होतं

मात्र ५६१६ खात्यांवरचं १५.८७ कोटी या निकषात बसत नसतानाही माफ केले गेलेयत.

महाराष्ट्रात अशी ३३ खाती सापडली ज्यात १३ लाख ५३ हजार २८३ रुपयाचं कर्ज माफ केलं गेलंय.

२२७६ खात्यांना एकरकमी परतफेड सूट/One Time Settlement (OTS) ऐवजी कर्जमाफी दिली गेली.

महाराष्ट्रात अशा फक्त ५ घटना सापडल्या ज्यात ३२२१२० रुपयांच्या OTS ऐवजी कर्जमाफी दिली गेली.

९८६ घटनांमधे पात्रतेपेक्षा जास्त लाभ देण्यात आला.

राज्यात अशा ४६ केसेस आढळल्या ज्यांना ११ लाख ६९ हजार ४४९ रुपयांची माफी मिळालीय. (कोल्हापुर प्रकरणाशी हे विसंगत आहे कारण तिथे ४५ हजार शेतकरी आणि ११२ कोटींची वसुली सुरुय.)

ज्या शेतकऱ्यांना बँकेने थेट कर्ज दिलंय त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणं गरजेचं होतं पण बऱ्याच बँकांनी शेतकऱ्यांऐवजी मायक्रो फायनान्सिंग संस्थांना देशभरात 164.40 कोटी कर्जमाफीपोटी दिले गेले.

१५६४ खात्यांमधे पात्रतेपेक्षा कमी कर्जमाफी दिली गेली.

६१७९३ तपासलेल्या खात्यांपैकी २११८२ म्हणजेच तब्बल ३४.२८ टक्के खातेदारांकडून कर्जमाफी मिळाल्याचा कोणताही पुरावा घेतला गेला नाही किंवा तसं सर्टिफिकेटही दिलं गेलं नाही.

महाराष्ट्रात मात्र सर्व खातेदार/शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाण पत्र देण्यात आलंय – इति कॅग

ऐतिहासिक कर्जमाफीतील घोळ आणि महाराष्ट्र :-
कॅगने महाराष्ट्रातील
५ जिल्ह्यातील
४० संस्थांमधील
३,३९४ खाती तपासली, त्यातल्या ४६ खात्यांमधे गडबड असल्याचा संशय.
म्हणजेच यातील एकूण १६ कोटी ९८ लाख ९९ हजार २२३ रुपयांपैकी
११ लाख ६९ हजार ४४९ रुपयांचा घोळ असू शकतो असा कॅगला संशय आहे.

दोषींवर कारवाई करु असं पंतप्रधान सांगतायत तर कॅगला सगळी खाती तपासू द्या मग बोलू असं पवार साहेब म्हणतायत. शीतावरुन भाताची परिक्षा होते मग इथं कॅगनं तर ९० हजार खाती तपासलीयत. आणि किरकोळ असला तरी घोटाळा तो घोटाळाच. त्याचं समर्थन कसं होऊ शकतं? कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने अर्थमंत्रालयाची लक्तरं वेशीला टांगली गेलीयत. अगदी क्षुल्लक बाबींवरुन, कागदावरुन शेतकऱ्याला खेटे घालायला लावणाऱ्या, सामान्य जनतेची अडवणूक करणाऱ्या बँकांनी आता रुल्स रेगुलेशनचा तोरा मिरवू नये. गेल्या पाच वर्षात एक -फक्त एक- गरजू शेतकरीही जर कर्जमाफीपासून वंचित राहिला असेल तर त्याचं नुकसान, सगळ्या संबंधित अधिकारी – मंत्र्यांना शिक्षा झाली तरी भरुन येणार नाही.

फक्त हेतू चांगला असून चालत नाही, अंमलबजावणीही चांगली हवी.    

2 thoughts on “ऐतिहासिक कर्जमाफीचं ऑडिट

  1. Sarva kahi satesathich. Pratham yojana jahir keli, Eka ratrit purn bharatat banner lagale. Ata chukichi jababdari banner lavun ghyal kay? ?.

  2. संदिपजी,फक्त हेतू चांगला असून चालत नाही, अंमलबजावणीही चांगली हवी या शब्दातच सर्व आल.आपण खूप चांगले नियोजन करतो,आपल वैशिष्ट्यच आहे ते.मात्र एकदा योजना,उपक्रम सुरू झाला की अंमलबजावणी हातातून सुटते.सर्व भर कार्यकर्ते ‘सुटू’ नयेत यासाठीच चालतो.बदल व्हायला हवा आणि खात्री आहे की इ-प्रशासन बदल घडवून आणेल.एवढीच आशा. ..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s