बोलतो जे अर्णव

एके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ? काय झालंय तिला? तिचं पोट दुखतंय का बाबा? मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब.

इतना क्यूं सोचते हो तुम?

अर्णवलाही प्रश्न पडू लागले. मनाच्या वेळी झालेली चूक सुधारायची ठरवलं आणि जमेल तसे काही प्रश्न मोबाईलच्या नोटमधे सेव्ह केले. नवरात्र संपलं, दसरा उजाडला, मोरूचा बाप मोरूस म्हणाला, असल्या बोअर कथा टीव्हीमुळे कधीच रद्दीत जमा झाल्यात. त्यांची जागा बातम्या सागंणाऱ्या अँकर, धोनी, कोहली, क्रिकेट मॅचचे प्रेक्षक, जाहिरातीतली सनी लिओन, कृष्ण हनुमानाच्या डीव्हीडी, बेनटेन, शिंचन आणि दहापंधरा दिवस उपाशी राहणारे अण्णा यांनी घेतलीय. टीव्हीमुळे असेल कदाचित त्याच्या प्रश्नांची संख्या आणि त्यातली विविधताही वाढलीय. एक वेगळ्या प्रकारचं टेलिवर्तन…

शाळेत जायची त्याला भारी हौस. कशाला गडबड करतोस बाळा? असा माझा विचार… मनात. त्याचे शाळेतले अनुभव तो अशा पद्धतीनं सांगतो की त्यावर कदाचित वेगळं पुस्तक लिहिलं जावू शकेल. त्याची आई त्याला अभ्यासाचं महत्व वगैरे सांगत असते. एकदा मी कुठलंतरी पुस्तक वाचत बसलो होतो, त्यानं मला विचारलं, बाबा, अभ्यास केल्यावर माणूस मोठा होतो?  हो बाळा.. अच्छा, म आता तुम्ही मोठे होणार??

एकदा स्वारी सकाळी झोपेतून उठली. मग पहिलं काम त्याला सू करून आणायचं. नेलं त्याला बाथरूममध्ये…  त्याला सू करायला सोईचं व्हावं म्हणून चड्डी खाली सरकवली. तर त्याचा प्रश्न.. बाबा, बाबा, बघा ना, नुन्नु कशी मोठी झालीय? का झालीय??????? हे असं काहीतरी पहिल्यांदाच होतंय याची भिती अस्वस्थता, त्याच्या आवाजात. होत असंतय रे, माझं एवढं सांगणंही त्याला रिलॅक्स करायला पुरेसं ठरलं.

Jab They Met

लहानपणी महालक्ष्मीला स्टार माझाचं ऑफिस असताना अर्णवला एकदा घेऊन गेलो. सगळ्यांशी बोलला, खेळला पण अर्णवच्या लक्षात राहिली ती आमची अँकर ज्ञानदा चव्हाण. तिनं काय जादू केली माहित नाही तो तिचा कट्टर चाहता बनला. तिच्या बातम्या हमखास बघणार. तिचा आवाज कुठूनही ओळखणार. तिच्याबद्दलच प्रश्न विचारणार, तिच्याशी बोलायचंय फोन करा म्हणून हट्ट करणार. इतकं की तो रडत असताना बायको स्टार माझा लावायची, ज्ञानदा असेल तर पोरगा एकदम शांत होणार. एकदा रात्री बराच उशीर झाला तरी तो झोपतच नव्हता. सगळं सांगून समजावून भिती दाखवून वगैरे  झालं. काऊ झोपली, चिऊ झोपली सगळे झोपले बघ तुही झोप… अर्णवनं पटकन विचारलं, ज्ञानदा झोपली?…  हो ती ही झोपली असं सांगितल्यावरच महाराज झोपले.

हैदराबादचे दिवस आठवले. लंचनंतर बेसमेंट कॅंटीनच्या कट्ट्यावर सगळे थोडावेळ एकत्र जमलेलो, जवळच्या झाडावरुन चिमण्या चिव चिव करत उडाल्या, आणि ‘ती बघ चिवचिव’ असं म्हणायची तीव्र इच्छा झाली, म्हणालो की नाही ते आठवत नाही. असंख्य लहान मुलांप्रमाणे तिनं ब्बा ब्बा ब्बा ब्बा… द्दा द्दा द्दा द्दा… म्मा म्मा म्मा म्मा अशी सुरुवात केली त्या दिवसात तर आपण बाहेरही चुकून बोबडं बोलू की काय असं वाटायचं. हाईट म्हणजे बऱ्याचदा ऑफिसमधे अचानक सहकारी समोर आला की त्यांना ‘भ्भॉ’  करावं असंही वाटायचं. मनासोबत खेळायचो त्याचा परिणाम.

हैदराबादमधे घालवलेल्या सात वर्षातले ते काही मस्त क्षण होते. मना बालसुलभ प्रश्न विचारु लागली तेव्हा फार मजा यायची. खरं तर तिचे प्रश्न लिहून ठेवायचे, त्याला ‘मनाचे बोल’ नाव द्यायचं असं त्यावेळी मी आणि अंजलीने ठरवलेलं, पण आयुष्यात ज्या अनेक गोष्टी करायच्या ठरवल्या पण केल्या नाहीत त्यात आणखी एका गोष्टीची भर पडली इतकंच.

अर्णवसोबत खेळताना तोच आनंद पुन्हा अनुभवतोय. ‘तुम्ही माझ्यासोबत असं खेळतच नाही’ अशी तक्रार मृणाल सारखी करत असते हा भाग वेगळा. मी तिच्यासोबत असा दंगा केला असेल हे सांगूनही तिला काही केल्या पटत नाही. आणि माझ्याकडे टाईम मशीनही नाही.

आता करीना कपूरही अर्णवला आवडू लागलीय बहुदा, पण ऑफिशियली त्याचा पहिला क्रश म्हणजे ज्ञानदाच… प्ले ग्रुपसाठी शाळेत जाऊ लागला तेव्हापासून मात्र ज्ञानदाचं वेड नकळत कमी होतंय असं आमच्या लक्षात आलं. माझा शिक्षण पद्धतीवरचा राग अनाठायी नाहीय.

आपण बॉय का आहोत? त्या गर्ल का आहेत? तुम्हाला दाढी का आहे? अंगावर केस का असतात? रावणाने सीतेला का पळवून नेलं, तो वाईट का होता? कोटी म्हणजे काय? पेप्सी कशापासून तयार करतात? टायगरला बोलता का येत नाही? भिकाऱ्याला जेवायला का मिळत नाही? आंदोलन कसं असतं ? असे एक न अनेक प्रश्न. कितीतरी निरुत्तर करणारे, कितीतरी विचार करायला लावणारे…

ब्रश नीट करत जा रे

आत्ता गणपतीला गावी गेलेलो. लाड पुरवणारे आजी-आबा, येता जाता आवर्जून बोलणारे लोक,  आणि स्क्वेअर फुटाच्या गणितात न अडकलेलं ऐसपैस घर. मना आणि अर्णव दोघेही प्रचंड रिलॅक्स असतात तिथे. आतल्या छोट्या खोलीतल्या जुन्या लाकडी कपाटावर एक तुटका कंगवा पडलेला, तो अर्णवच्या हाती आला, त्यानं विचारलं, अरे या कंगव्याचे दात का पडलेयत? हां नीट ब्रश करत नाय म्हणून याचे दात पडले ना…

सुट्ट्या संपल्या, लवकर संपतात त्या. मी इथेच राहतो आज्जीआबांसोबत असं नेहेमी म्हणणाऱ्या अर्णवची परत यायची इच्छा नसतेच, तशी तर माझीही नसते, तरीही आम्ही मुंबईच्या बसमधे चढतो.

सोबतचं माणूस यायला थोडासा उशीर झाला तरी लहानमुलं फार अस्वस्थ होतात. अंजली आणि मना खाली बोलत उभ्या होत्या, गाडी सुरु झाली आणि अर्णवनं गडबडीत सीट एका हातात आणि हँडल एका हातात घट्ट पकडून ठेवलं आणि मलाही म्हणाला बाबा बाबा पटकन असं पकडून ठेवा म्हणजे त्या दोघी येईपर्यंत गाडी पुढे जाणार नाही. आधीच्या प्रवासात तो असाच अस्वस्थ झाला होता तेव्हा, घाबरु नको रे त्या येईपर्यंत मी गाडी पकडून ठेवतो असं सहज त्याला बोललो ते त्यानं असं लक्षात ठेवलं.

सकाळी सकाळी मुंबईत पोचलो. सोसायटीत पाऊल टाकत असतानाच, आळसावलेल्या स्वरात अर्णवनं विचारलं, बाबा आपण मुंबईला का आलो?  या प्रश्नाचं उत्तर मीच शोधतोय. गेले अनेक दिवस. त्याला काय सांगणार? मी शांत असतो… वरुन.

13 thoughts on “बोलतो जे अर्णव

 1. सर खरंच अर्णवच्या मनातले प्रश्न…. मनाला भीड़णारे आहेत… उत्तम जमलाय ब्लॉग…

 2. हा लेख वाचल्यावर ज्ञानदा ही म्हणेल मै इंतजार करुंगी ………

 3. मस्त.. अशा प्रश्नांच्या उत्तराची तयारी मला आत्तापासूनच करावी लागेल..

  • हो, पण फक्त उत्तराचीच तयारी करु नकोस.
   तिचे चांगले प्रश्न/ प्रसंग जमतील तसे लिहून ठेवता आले तर बघ.
   मस्त कलेक्शन बनेल

 4. एका ब्लॉगमधून खूप काही प्रश्नसमोर येतात, आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत, ते प्रश्न पुन्हा लहानग्यांनाही पडतायत. काही प्रश्नांची उत्तर माहित असूनही त्यावर बोलता येत नाही.

  ते जाऊ द्या, लग्न ठरल्याची बातमी तुमच्या चिरंजीवला सांगितलं का? लग्न म्हणजे काय? हे त्याने विचारू नये म्हणजे झालं. तुम्हाला प्रश्न पडेल की उत्तर कसं द्यायचं. म्हणून बातमी सांगण्याआधी जरा तयारी गृहपाठ करून जा…

  • तो प्रश्न कधीचाच विचारुन झालाय, जयवंतराव. आमच्या लग्नाच्या अल्बममधे त्याचा फोटो दिसत नाही म्हणून रुसूनही झालंय. आपण आपल्या परीनं उत्तर द्यायचा आणि शोधायचा प्रयत्न करायचा.

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s