टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये

मीडिया बाजार

दूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.

बातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही.

आज जगात सर्वात जास्त न्यूज चॅनल्स आपल्या देशात आहेत. परखड पत्रकारितेची परंपरा अगदी ब्रिटिशकाळापासूनच आपल्याला लाभलीय असं म्हणतात. काही मोजक्या वृत्तपत्रांनी किंवा वृत्तपत्रातील काही मोजक्यांनी ती टिकवायची धडपड सुरु ठेवलीय. टिव्ही चॅनल्सकडूनही जनसामान्यांनी तशीच अपेक्षा करणं ओघानं आलंच. आजचं देशातलं चित्र पाहता या अपेक्षा पूर्ण करण्यात टीव्ही मीडियाला किती यश आलंय हा वादाचा मुद्दा आहे.

लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, देशातलं वातावरण तापू लागलंय. छोट्या पडद्यावर रोज नवनवे गौप्यस्फोट सुरुच आहेत. बाईट वर बाईट देणं आणि घेणं सुरु आहे. येत्या काळात न्यूज चॅनल्सची भूमिका महत्वाची ठरणार आहे.  त्यामुळेच छोट्या पडद्याकडे राजकारण्यांचं बारीक लक्ष राहणार आहे.

गेली काही वर्ष राज्य आणि देशात विरोधी पक्ष संभ्रमित अवस्थेत असताना, ती भूमिका देशातला मीडिया पार पाडतोय असा सर्वसामान्य जनतेचा समज होता. तो भ्रम फार काळ टिकणार नव्हताच. ‘अशोक पर्व’ने भ्रमाच्या भोपळ्याला पहिला तडा दिला आणि जिंदाल – झी न्यूज प्रकरणाने आणखी एक घाव बसला आहे.

जिंदालचा झी न्यूजला ‘प्रतिडंख’

प्रकरण वरवर दिसतं तितकं सोपं नक्कीच नाहीय.

टुजी, कोळसाप्रकरणी मनमोहनसिंह सरकारची लाज जाणं सुरुच होतं. त्यातच वाड्रा डिएलएफ प्रकरणामुळे बोफोर्सनंतर पहिल्यांदाच गांधी घराण्यावर थेट आरोप झाले.  या वातावरणाचा फायदा मुख्य विरोधी पक्ष भाजपला होणार हे स्पष्ट होतं पण नितीन गडकरींच्या रुपात सत्ताधाऱ्यांनी नवा बंगारु लक्ष्मण मिळवला. आम्ही चांगले नसलोत तरी तुमच्यासमोर पर्यायही चांगला नाही हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यात काँग्रेसप्रणित सत्ताधारी यशस्वी झाले. सत्तेतला मुख्य पक्ष आणि मुख्य विरोधी पक्ष या दोघांची विश्वासार्हता धोक्यात आल्यावर, न्यूज चॅनल्सची विश्वासार्हता टिकून राहणं त्यांना कसे परवडेल?

प्रसिद्धी मिळतेय म्हणून असेल किंवा उगाच पंगा घेतला तर आपल्या ‘कर्तृत्वाची’ कुंडली बाहेर येईल म्हणून असेल राजकारणी मंडळी मीडियाला कुरवाळत राहायचे. न्यूज चॅनेलचा प्रभाव माहित असल्यानं फार फार तर मीडिया से न दोस्ती अच्छी होती है न दुश्मनी हे तत्व ते पाळायचे पण आता ते बाजूला ठेवून न्यूज चॅनल्सना थेट अंगावर घ्यायला सुरुवात केलीय.

राजकारणी आणि मीडिया यांचा मधुचंद्र संपू लागला आहे. त्याला अर्थातच न्यूज चॅनल्सही तितकेच जबाबदार आहेत. अंजली दमानियापासून अरविंद केजरीवालपर्यंत कोणीही पत्रकार परिषद घ्यायची, फक्त आरोप करायचे आणि चोवीस तास चॅनल चालवण्याच्या अपरिहार्यतेमुळे त्याची शहानिशा न करता न्यूज चॅनल्सनं त्याची ब्रेकिंग न्यूज करत राहायची, लाईव्हची ही घाई पत्रकारितेला परवडणारी नाहीय.

जशी सगळीकडेच गळेकापू स्पर्धा आहे, तशी ती मीडियामधेही आहे. देशातलं न्यूज चॅनेल्सचं मार्केट अंदाजे अडीच हजार कोटीं रुपयाचं आहे. त्या जाहीरातींमधील जास्तीत जास्त वाटा आपल्याला कसा मिळेल यासाठी सगळ्यांचेच प्रयत्न. त्याचाच साईड इफेक्ट म्हणजे या क्षेत्राचं झालेलं बाजारीकरण आणि चुकलेला प्राधान्य क्रम.

मोठ्या शहरात दोन चार गाड्या जाळल्या आणि एक दीड लाखाचं नुकसान झालं तर  तर ती मोठी बातमी ठरते, दिवसभर कॅमेऱ्यासमोर तज्ञांच्या चर्चा झडतात, अधिकारी पुढारी चिंता व्यक्त करतात. नुकताच वाशिम जिल्ह्यातल्या 12 गावात सोयाबीनला आगी लावण्याच्या घटना वाढल्या. राजकीय हेवेदावे आणि अंधश्रद्धेतून फक्त 10 दिवसात थोडथोडकं नव्हे 45 लाखांचं सोयाबीन भस्मसात झालं. किती चॅनल्सवर तुम्हाला ही बातमी दिसली?  हे चुकलेल्या प्राधान्यक्रमाचं उदाहरण नाही का?

सर्वसामान्य माणसाच्या मनातून मीडियाची विश्वासार्हता आणखी उतरली तर ते अनेकांना हवंच आहे. कोट्यामधून दोनदोन तीनतीन घरं पदरात पाडून घेणारांकडून किंवा पाकिटापासून ते जाहीरातींपर्यंत अनेक गोष्टींकडे वर्षभर डोळ्यात प्राण आणून वाट पाहणाऱ्यांकडून तत्वनिष्ठ, परखड वगैरे पत्रकारितेची अपेक्षा करण्यात फार अर्थ नाही. पण जसे सगळे राजकारणी, सगळे पोलिस, सगळी न्याय व्यवस्था किंवा सगळी नोकरशाही भ्रष्ट नाही तसंच प्रसार माध्यमांचं. त्यामुळेच या क्षेत्रात जी काही चांगली लोक उरली आहेत त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढचा मार्ग खडतर आहे, अखंड सावधान राहून बातमीशी इमान राखावं लागणार आहे.  26 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याच्या कवरेजमधे इलेक्ट्रॉनिक माध्यमांची गेलेली पत, आझाद मैदानावरील हिंसाचारावेळी दाखवलेल्या प्रगल्भतेनं काही प्रमाणात परत मिळवली असली तरी त्यात सातत्य आणणं गरजेचं आहे.

अण्णांच्या जनलोकपाल आंदोलनाविरोधात झाडून सारे राजकीय पक्ष एकत्र आल्याचं चित्र देशाला पाहायला मिळालं. त्याचवेळी इ डिब्बा का कुछ किजीए असा सूर जोर धरु लागला. टीम अण्णाचा व्यवस्थित बंदोबस्त केल्यानंतर राजकारणी आता मीडियाकडे वळले आहेत असं दिसतंय.

‘चार काम वो हमारे करते है, चार काम हम उनके करते है’ असं गडकरींचं वाक्य सांगत,  गडकरीं  आणि पवारांचे साटेलोटे असल्याचा आरोप दमानिया बाईंनी केला आणि क्विड प्रो को (Quid Pro Quo) हा खूप छान शब्द देशाला माहिती झाला. ज्याचा डिक्शनरीतला अर्थ आहे, A favor or advantage granted in return for something.       राजकारणी आणि पत्रकारांमधल्या QPQ ची जाहीर चर्चा कधी व्हायचीच नाही. ती आता सुरु होईल. मीडियावरचा लोकांचा जो काही विश्वास आहे तो 2014 पर्यंत कमी कमी होत जाईल अशी स्ट्रॅटेजी असली तर नवल वाटायला नको.

आत्ताचं न्यूज चॅनल्स कव्हरेज पाहिलं की मला साधारण 15 वर्षांपूर्वी आलेला मॅड सिटी सिनेमा आठवतो. One Man will Make a MISTAKE, The Other will Make it a SPECTACLE अशी टॅग लाईन.  त्यात न्यूज चॅनल्स बातमीसाठी कुठल्या थराला जाऊ शकतात हे दाखवलंय.    डस्टीन हॉफमनमधला रिपोर्टर जॉन ट्रॅवोल्टाच्या अगतिकतेला मीडिया इव्हेंटचं स्वरुप देतो. त्यात तथ्य, भावनांचा बळी ठरलेला. शेवटी ‘WE’ KILLED HIM हे डस्टीनचं वाक्य सगळं काही सांगून जातं.

आपल्या टीव्ही पत्रकारितेची वाट मॅड सिटीच्या दिशेनं जाऊ नये ही अपेक्षा.

दिव्य मराठीत छापून आलेल्या या लेखाची ही लिंक 

3 thoughts on “टीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये

  1. true.. .. kadhi ek hotil ani common people cha ghat kartil sangta yet nahi.. Batmicha bajarikarnavarch satya khup effectively mandalay

Leave a Reply to Sunny Lorel Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s