थँक्यू डॉक्टर देशमुख

मना कधी नव्हे ते २-३ तास खूप रडली. आत्ताच झोपी गेल्याचं अंजलीनं सांगितलं. तिचं रडणं थांबत नव्हतं. विजयसोबत अंजली मनाला एका प्रथितयश डॉक्टरकडे दाखवून आलेली. विजय त्याच्या मुलीला त्याच डॉक्टरकडे घेऊन जायचा.म्हटलं बरं झालं, लहानांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करुन उपयोग नाही. त्या डॉक्टरीनबाईनं मनाला कसलं तरी इंजेक्शनही दिलं होतं. त्या गुंगीतच ती कदाचित रात्रभर झोपली असावी.

मी सकाळीच ऑफीसला निघून गेलो. त्यावेळेस मोबाईल सर्वसामान्यांच्या हातात यायचा होता. त्यामुळे घरी टचमधे राहण्याचा प्रश्नच नव्हता. दुपारी शिफ्ट संपवून घरी निघालो.

मना २-३ महिन्यांची झाल्यावरच तिला हैदराबादला आणुयात असं मी आणि अंजलीनं ठरवलेलं. आपल्या घरी म्हणजे बीडला माणसांचा-नातेवाईकांचा ओघ आटत नाही, तिथं  आजी-आबांसोबत गजबजल्या घरात असणं कधीही चांगलं. अशी अनेक कारणं.

त्यावेळी मी वनस्थळीपुरमला राहायचो. दोनेक वर्षात तीनेक घरं बदलून झालेली. विजय माझा सहकारी. दोघांनी एक मोठ्ठं २ बीचके घर भाड्यानं घेतलं. त्याची मुलगीही लहान, दोन्ही बायकांना आणि मुलींना एकमेकींची चांगली सोबत होईल आणि पैसेही वाचतील असा उद्देश. चांगले संबंध बिघडण्याची जोखीम होतीच पण त्यावेळी तो पर्याय चांगला वाटला. पुढं तो प्रयत्न फसला. फसणारच होता असो.

पावसाळा सुरु झाल्यावर कधीतरी आई-आज्जीसोबत मना हैदराबादला आलेली. हैदराबादचं बसस्टँड आशियातलं सर्वात मोठं.  सेमी लक्झरी ‘एशियाड’ गाडीत रात्रभर आजीच्या मांडीवर निवांत झोपून मना आलेली. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर ओळखीचं मस्त हसू आलं, तिनं जवळजवळ झेपच घेतली अंगावर. बापाला अजून काय हवं असतं? ऑफिसातून आल्यावर तिच्याशी थोडावेळ जरी खेळलो तरी दिवसभराचा ताण-थकवा पळून जायचा.

नेहेमीप्रमाणेच थोडे दिवस राहून आई परत गावी गेली, फक्त यावेळी तिचा पाय घरातून लवकर निघत नव्हता. नातीची तिला ओढ लागलेली.

वनस्थळीपुरम ते रामोजी फिल्मसिटी म्हणजे आमचं ऑफीस हे तासाभराचं अंतर.  तुम्ही फिल्मसिटी पाहिली असेल तर सांघी टेंपल लक्षात राहातंच. समोरच्या टेकडीवर गाडी उजवीकडे वळण घेत चढावर घुसली आणि हलकासा पाऊस सुरु झाला. अशा वातावरणात डोंगराच्या पदरातल्या रस्त्यातून वळणं घेत होणारा प्रवास आणखीनच रेंगाळायला लावणारा. माझा स्टॉप सुषमा टॉकीजचा.

कधी उतरलो आणि घरी पोहोचलो कळलंही नाही.

जीना चढत असतानाच मनाचा रडण्याचा आवाज कानावर आला. तो भीतीदायक होता. घरात पाऊल टाकलं तर अंजली मनाला कडेवर घेऊन चकरा मारत होती, डोळ्यातली काळजी लपवण तिला अवघड गेलं. विजय आणि त्याची बायकोही अस्वस्थ होते. दिवसभर गुंगीत असलेली मना दुपारनंतर कधी तरी जागी झाली ती रडतच. गुंगी उतरताच तिला पुन्हा त्रास सुरु झालेला. घरगुती सगळी औषधं देऊन झाली. आई बीडला परत गेल्यामुळं अशावेळी जो मोठा आधार वाटतो तोही जवळ नव्हता. मीही प्रयत्न करुन पाहिला. पण मनाचं रडणं काही कमी होत नव्हतं. असह्य वेदनेत असं मनाला पाहायची ती माझी पहिली वेळ. तिच्या त्या रडण्याचा आवाज अजुनही कानात घुमतो.

खाण्यापिण्यात काहीतरी आलं असेल? कान दुखत असेल? इथपासून ते आजीआबा दिसत नाही म्हणून रडत असेल इथपर्यंत अनेक कारणांचा विचार झाला. मनाचं रडणं सुरुच होतं आईबाप होण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे अशावेळी नेमकं काय करायचं तेही आम्हाला सुचत नव्हतं, पुन्हा ‘त्या’ डॉक्टरीनबाईकडे जायचं ठरलं, मनाचं रडणं सुरुच. खाली उतरलं की मागच्या दोन गल्ल्या सोडून तो दवाखाना. कालचा रस्ता अंजलीच्या लक्षात होताच.

आम्ही पोहोचलो त्यावेळेस दवाखान्यातले सगळे लाईट लागलेले नव्हते. बाहेर पावसाची भुरभुर सुरुच होती. पावसामुळं अंधारून आलेलं. कारण काहीही नव्हतं पण तो दवाखाना मला गुढ वाटत होता.  तेवढ्यात बाल्कनीमधे एक बाई अवतरल्या.  त्याच डॉक्टरीनबाई होत्या. काहीतरी चुकीचं घडतंय अशी माझी फिलिंग वाढली. खाली गेटच्या समोरच्या खोलीत त्या आल्या, मनाचं रडणं सुरुच होतं.

अजुन पोरीला बरं वाटत नाहीय का वगैरे इंग्रजी कम हिंदीत त्यांनी अंजलीला विचारलं आणि मनाचं पोट दाबून बघितलं. तसा तिचा आवाज आणखीनच वाढला. मग त्यांनी मनाला बाजुच्या बाकावर झोपवलं, टेथस्कोप वगैरे लावून तपासलं. गंभीर होत म्हणाल्या, तिच्या पोटात काहीतरी मेजर प्रॉब्लेम असू शकतो, आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील, मी लिहून देते तिथं जा मग ठरवू काय करायचं ते… सध्यातरी मी काल दिलेलं इंजेक्शन तिला देतेय असं म्हणून बाजुच्या कपाटातून डॉक्टरीणबाई ते मोठ्ठं इंजेक्शन काढू लागल्या. माझी चुळबुळ वाढली, मी त्यांना थांबवलं. मी काय म्हणालो ते आठवत नाही, फक्त तिथून पटकन बाहेर पडायचं एवढा एकच विचार डोक्यात होता. खिशातून पैसे काढले आणि डॉक्टरीनबाईच्या हातात टेकवले. मनाला घेऊन आम्ही बाहेर पडलो.

त्यावेळी लेकराबाळावाले सहकारी कमी होते. वनस्थळी मार्केटजवळ एक टेलिफोन बुथ होता. तिथूनच न्यूज डेस्कला फोन केला. गिरीधर पांडेला हा प्रकार सांगितला. त्यानं शांतपणे ऐकून घेतलं, घाबरु नकोस; एनजीओ कॉलनीत एक लहान मुलांचे चांगले डॉक्टर देशमुख आहेत त्यांच्याकडे जा असं म्हणाला. त्यांना मराठी कळत हे आवर्जुन सांगितलं. त्याच्या सार्थकला तो देशमुखांकडेच घेऊन जायचा. एनजीओ कॉलनी म्हणजे पनामा गोडाऊनपासून सुरु होणाऱ्या वनस्थळीचा शेवटचा स्टॉप.

घरातून बाहेर पडून आम्हाला तास सव्वा तास झाला. मना रडतच होती. आमचे चेहरे आणि रडणारी मना पाहून रिक्षावाल्यानं वेगानं आम्हाला तिथं नेलं असावं. रस्त्यालगतचा एक साधा गाळा म्हणजे देशमुखांचा दवाखाना. तिथे बरीचशी गर्दी, लांब रांग, पावसामुळे आलेला कोंदटपणा आणि वेगवेगळ्या वयातली छोटी मुलं. कुणी रडत होती तर कुणी रडून रडून थकून झोपलेली. तेलुगुतून हळु आवाजात बोलणं सुरु होतं. लेकरांसोबत त्यांचे आईबापही. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्यासारखेच भाव. भीतीचे.

आम्ही उतरताच सगळ्यांचं लक्ष मनाकडे गेलं, म्हणजे आम्हाला त्याची सवय होतीच कारण मना खूप गोड दिसायची, पण यावेळचं पाहणं तिच्या रडण्यामुळे जास्त होतं. नंबर लावला, नेहेमी 7 वाजेपर्यंत येणारे डॉक्टर नेमकं आज 7.30 होऊन गेले तरी आले नाहीत.  माझी घालमेल आणखी वाढली, शक्य तितक्या संयमानं शिव्या बाहेर पडत होत्या. तुम्ही चीड चीड करुन काही उपयोग आहे का असं अंजलीनं किती वेळेस सांगितलं हे नक्की आठवत नाही.

अखेर उशिरानं का होईना डॉक्टर आले, मनाचं आतडं पिळवटून टाकणारं रडणं ऐकून तिथल्या सगळ्या बायाबापड्यांनी आम्हाला चक्क सगळ्यात आधी आत जा असा इशारा केला. मनातल्या मनात त्याचे आभार मानले. आत टेबलापलिकडचा माणूस हसला, त्यात कृत्रिमपणा नव्हता, माझ्या मनात नेहेमीप्रमाणेच येणाऱ्या शंका दबून राहत होत्या असा आश्वासक मध्यमवर्गीय चेहरा होता डॉक्टर देशमुखांचा. काय काय झालं ते सांगत असतानाच उजव्या हातानं त्यांनी गोळ्यांची एक डबी उचलली आणि टेबलावर टकटक करत, ते शिटी वाजवू लागले. माझ्या मांडीवर बसलेल्या मनाचं तिकडं लक्ष गेलं आणि काही क्षणांसाठी ती एकदम शांत बसली.

काळजी करु नका. काही नाही झालंय तिला, बरं वाटेल थोड्यावेळात. बाहेरच्या दुकानातून ही गोळी घ्या आणि तिथेच पाव गोळी बारीक करुन पाण्यातून तिला द्या. दुसरं औषध घेऊन मला दाखवायल या. बस्स. अरे पोरगी दोन दिवसांपासून एवढी रडतीय आणि पाव गोळी अर्धी गोळी काय? कुठला डॉक्टर असं  सांगेल? शंका दाबून ठेवत विचारलं किती झाले? 30 रुपये. आँ. पुन्हा धक्का.

मेडिकलवर गेलो 1 रुपयाला 1 की 2 गुलाबी रंगाच्या गोळ्या आल्या.  आमची अवस्था बघून मेडिकलवाल्यानेच पाणी दिलं, तिथेच अंजलीनं तुकडा करुन गोळी बारीक केली. चमचाभर पाण्यातून मनाला दिली. काही सेकंद मधे गेले, ढेकराचा आवाज आला आणि मनाचं रडणं थांबलं, काही मिनिटात तर काही न झाल्यासारखी ती पुन्हा इकडं तिकडं बघत खेळू लागली, तिचं ते मस्त हसू चेहऱ्यावर परत आलं. च्यायला हा डॉक्टर आहे का जादूगार?

पुन्हा दवाखान्यात जाऊन डॉक्टरना भेटलो, खूप रिलॅक्स वाटत होतं, सहसा लहान मुलात कॉमनली आढळणारा हा प्रकार. ती गोळी होती जेलुसिल. त्यानंतर मी हायकोर्ट कॉलनीत म्हणजे आणखी दूर राहायला गेलो. तिथून रिक्षाचा खर्च 40 रुपये व्हायचा आणि डॉक्टर ची फी 30 रुपये, कधीकधी तर तीही घ्यायचे नाहीत. रिपोर्टची जाड फाईल नाही, महागडी औषधं नाहीत की मोठ्ठी फी नाही. सर्दी ताप आला तर लगेच येऊ नका किंवा कॅलपॉलही देवू नका, तिच्या शरीराला लढायची सवय लागू द्या असं सांगणारे डॉक्टर मोजकेच असतील. हैदराबादमधे होतो तोवर गरज पडली की मनासाठी डॉक्टर देशमुखांकडेच जायचो. काय मग तू मृणाल काळे का गोरे? हा ठरलेला पहिला प्रश्न त्यांनी विचारला की मना आणि तिचे आईबाबा रिलॅक्स झालेच समजा.

नंतर मुंबईत आलो, अर्णवला पहिल्यांदा दवाखान्यात न्यावं लागलं तेव्हा खरंतर मी एका देशमुख डॉक्टरच्या शोधात होतो पण मला ते सापडले नाहीत. मुंबईत सापडतील अशी आशाही सोडलीय.

कोणत्याही लहान मुलाला कधीही किंवा किमान बोलता येईपर्यंत तरी कसलाही त्रास होऊ नये असं मला कायम वाटत आलंय. काय दुखतंय हे त्यांना सांगता येत नाही, आपण पूर्णपणे डॉक्टरवर डिपेंड असतो, त्यांचं निदान चुकलं तर? किंवा आपली डॉक्टरची निवड चुकली तर? मी त्या संध्याकाळी घाबरुन मनाला टेस्टसाठी नेलं असतं तर…? देशमुख डॉक्टरकडे गेलो नसतो तर..?

महाराष्ट्रातल्या माणसाला आंध्रप्रदेशच्या राजधानीत कर्नाटकातून आलेल्या डॉक्टरचा आधार वाटावा हे बरंच काही सांगून जातं.

परवा आमीरचा सत्यमेव जयते पाहात असताना हे सगळं डोळ्यासमोरुन गेलं. एक तर लेकरं आजारी पडूच नयेत, पडलेच तर मनाला जसे डॉक्टर देशमुख भेटले तसे त्यांनाही भेटावेत.

थँक्यू डॉक्टर देशमुख, थँक्यू आमिर.

4 thoughts on “थँक्यू डॉक्टर देशमुख

  1. खरतर बरेच वेळा लोक पण गल्लत करतात…. जास्त पैसे घेतो तो चांगला आणि कमी पैसे घेतो तो वाईट असा ठोकळ समज करून घेतला आहे लोकांनी… एखाद्या डॉक्टर ची ओळख करून देताना पाहिलं… तो फक्त चेक अप करायचे अमुक अमुक पैसे घेतो इथून सुरुवात होते.

    • इलाज चांगला होत असेल तर पैसे गेल्याचंही काही वाटत नाही, पण त्यांनी आपला किंवा लेकरांचा गिनिपिग करु नये एवढी माफक अपेक्षा असते. काही डॉक्टर तर पेशंटचा ATM सारखा वापर करतात की काय अशी शंका येते.

    • आणि आपल्याला त्यातलं समजत नाही, लेकराचे हाल बघवत नाहीत याचाच गैरफायदा काही डॉक्टर्स घेतात. चांगला डॉक्टर मिळणं हे मोठी लॉटरी लागण्यासारखंच आहे असं वाटतं.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s