नाश्कात छगन भुजबळ भेटले. त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या काळातले किस्से त्यांच्याच तोंडून ऐकताना मजा आली. त्याकाळी निवडणुकीला फक्त 700 ते आठशे रुपये खर्च आला होता हे ऐकताना अंगावर रोमांच आणि शहारे दोन्ही आले होते. आता किती खर्च येतो? या प्रश्नावर भुजबळ साहेबांनी फक्त हात जोडले. मला वाटतं यातच सगळं आलं. सध्याच्या काळात निवडून येण्यासाठी सगळेच पक्ष, उमेदवार कुठल्या थराला जातात ते आपण पाहतोच. या रणधुमाळीत कोणीही मागे नाही ही शोकांतिका. मतदारही शहाणे झालेत सगळ्यांनाचा हो म्हणतात. हा सगळा एकदिवसाचा खेळ हे त्याच्याही अंगी रुजलंय.
अमरावतीला भाऊचा धक्का करत होतो. तुकडोजी महाराजांनी निवडणूकीबाबत काहीतरी लिहिलं असेल अशी खात्रा होती. मित्राला संजय देशमुख म्हणजे एसपी/एस्प्याला फोन केला. त्यानं मोझरीच्या गुरुकुंज आश्रमातल्या अमोल बांबल यांचा नंबर दिला. त्यांनी लगेच ग्रामगीतेत तुकडोजींनी लिहिलेला सुंदर उपदेश ऐकवला. मतदान, निवडणूक आणि लोकप्रतिनिधींबद्दल सोप्या भाषेत लिहिलंय, शांततेत वाचलं तर मतदान कुणाला आणि का करावं हे कळेल. तुम्हीही वाचा आणि जमले तर आपल्या गावकऱ्यांपर्यत ‘तुकड्या’चा हा संदेश पोचवा.
कानी घ्या तुकड्याची वार्ता, सांगा मतदान कुणा करणार?
ऐसे न करावे वर्तन | असतील जे इमानदार सेवकजन |
तेचि द्यावेत निवडून | एकमते सर्वांनी ||
सर्वास असावी चिंता समाजी | कोण आहे लायक जगामाजी |
कोण घेई गावाची काळजी | सर्वकाळ ||
भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे | आपुल्या मतावरीच साचे |
एकेक मत लाखमोलाचे | ओळखावे याचे महिमान |
मत हे दुधारी तलवार | उपयोग न केला बरोबर |
तरीच आपलाची उलटतो वार | आपणावर शेवटी ||
दूर्जन होतील शिरजोर | आपुल्या मताचा मिळता आधार |
सर्व गावास करतील जर्जर | न देता सत्पात्री मतदान ||
मतदान नव्हे करमणूक | निवडणूक नव्हे बाजार-चुणूक |
निवडणूक ही संधी अचूक | भवितव्याची ||
नाती-गोती, पक्ष-पंथ | जात-पात, गरीब- श्रीमंत |
देवघेव, भीडमूर्वत | यासाठी मत देवूची नये ||
– ग्रामगीता
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज