मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे

मुंबईचं वर्णन करताना भले भले थकत नाहीत. कुणाला ती सोने की नगरीया वाटली, कुणाला ती भूलभुलैया वाटली, कुणी तिला मायानगरी म्हणतं तर कुणी हादसे का शहर… मुंबई मेरी जान असं वाटणारांची संख्या माझ्या अंदाजापेक्षा जास्त आहे हे मला फार कमी काळात लक्षात आलं. आता हे आठवायचं कारण म्हणजे कविवर्य नामदेव ढसाळांशी आलेला भेटीचा योग.  

इतर लाखो लोकांसारखाचं मी मुंबईत आलो… पूर्वग्रह सोबत घेऊन…

माझं आणि मुंबईचं नेमकं नातं सांगणं अवघड असलं तरी मी जमेल तसे त्या गुढ नात्याचे पैलू आधी स्वत: समजून घेऊन मग जेवढे जमतील ते मांडायचा कधीतरी/अधनंमधनं प्रयत्न करणार आहेच, पण सध्यातरी ती पाण्यात बसलेली म्हैस आहे आणि सोबतीला माझा आवडता लॉ ऑफ पार्किन्सन्स… असो.

मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे

कॉलेजमध्ये असताना जे चुकून थोडफार वाचन व्हायचं त्यात ‘खेळ’ मधली ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे’ होती, मुंबईला शिव्या देणारी, गुणगाण करणारी भेटली होतीच पण कुणीतरी ‘प्रिय रांडे’ म्हणेल असं त्यावेळी वाटलं नव्हतं. त्यानंतर काही काळ लोटला आणि मग थेट मुंबईत आल्यावर, नवमुंबईकरांसारखी किरकिर करताना मुंबई मुंबई…चा विषयमेघराज पाटलांसोबत चर्चेला आला, तो अधनंमधनं येतंच राहिला.

इथेही शेती कसणं सुरु होतंच पण नाक खुपसण्याची सवय न गेल्यामुळे बाकी उद्योग कमी नसतात. त्यातूनच गेल्या आठवड्यात नामदेव ढसाळांशी बोलणं झालं तेव्हा फोनवरच मी त्यांना माझं आणि ‘मुंबई मुंबई’ चं नातं सांगितलं आणि ती ऐकणारच असा हट्टच केला होता म्हणाना… ते फक्त जोरात हसले, त्या दिवशी मूड चांगला होता हे लक्षात आलं, जयभीम जय महाराष्ट्र झालं, फोन ठेवला आणि त्यांच्या घरी जाऊन धडकलो.

त्यांची तब्येत तितकीशी बरी नव्हती पण त्यानंतरचे 2 तास त्यांनी आमच्यासाठी दिले, ते पर्वणीपेक्षा कमी नव्हते, त्यात अनेक विषय आले पण त्याबद्दल फिर कभी. शेवटी मी पुन्हा आठवण करुन दिली. “अरे ती तुम्हाला चालणार नाही, त्यापेक्षा मी दुसऱ्या दोनतीन म्हणतो”, असं ते म्हणाले, पण माझा आग्रह भारी पडला असं म्हणुयात (आपली पाठ थोपटून घेताना बरं वाटतं), “बऱ्याच वर्षांनी ‘ही’ म्हणतोय” असं म्हणून ढसाळांनी ‘मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे’ अशी सुरुवात केली. तब्येत बरी नसताना त्यांनी पूर्ण वाचली, थेट त्यांच्या तोंडून ऐकताना जास्त रंगत आली. मी हा फोटो फेसबुकवर टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी विचारणा केली, माझ्या सारखेच तेही नेटवर सर्च करुन थकले होते, त्यामुळेच अशा दर्दींसाठी ही कविता इथे टाकायचं ठरवलं.

बाकी भेटीचा वृतान्त लवकरच… तोवर करा रसग्रहण अर्थात एन्जॉय…

मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे

ये व माझा स्वीकार कर

सात घटकेचा मुहूर्त

आधीव्याधीनंतर

सर्वांगसुंदर प्रतिमासृष्टी

अश्विनीरुप ऋतुस्नात कामातूर लक्ष्मी

सर्पस्वरुप विष्णू उर्ध्वरेत स्खलित

सूर्याचे अनुष्ठान

हे शेष सूर्याच्या चेहऱ्या

हे कामेच्छेच्या माते

हे आदिती

माझ्या प्रियेचा दगड

मला अधिकच प्रिय आहे

4 वेद 18 पुराणं 6 शास्त्र

मी मारतो लंडावर

6 राग 36 रागिण्या मी खेळवतो उरावर

छान, या सुभगवेळी

तू संभोगेच्छा प्रदर्शित करतेस?

स्त्रीची कामेच्छा पुरी न करणं

कवी असल्यामुळे मी समजतो पाप

मी तुला खेळवून जाईन

पानंफुलं झिम्माफुगडी खेळतायत

कोकिळा गातायत राजहंस गातायत

खरंच गं, तुझ्या अरण्यानं नवीन रंग धारण केलाय

द्वैत भावातल्या शुभाशुभाची सावली

जिथे नजर टाकतो तिथे अथांग शृंगार

अस्तित्वाच्या दर्पणात तुझा कैफ उभा

विस्ताराचे संदर्भ, नश्वर अनवरत जलधार

अराजकता, निरर्थकता

सरळ सोप्या प्रतिमांतून रुप घेणारं तुझं लावण्य

सत्याच्या अंतहीन रेषेला स्पर्श करणारा

आकाशानंतरचा विलुप्त स्वर्ग

अप्राप्य प्रेमाच्या गोष्टीअगोदरचा क्षुद्र दैनिक मृत्यू

ध्वनी वळणानंतर होत जातो पुष्कळ

नेपथ्याच्या जागी फेकलं जातं द्रवरुप

तीन वृक्षांच्या तीन तऱ्हा

कालोदयाबरोबरची चकोर वाढ

चंद्रकिरणांचं नृत्य

चंद्रकोरीवरली धूळ चोच मारुन एक चिमणी झटकते आहे

हिरवळीच्या चादरीत दवबिंदूंचा चेहरा लपलेला

सहस्त्रमुखांनी

हे सर्व पूर्वसमुद्राला मिळण्यापूर्वी

या नि:शेष साम्राज्यात मला माझ्या

अभिशप्त एकांतापर्यंत जाऊ दे

मी भ्रमणयात्री

या शहरातलं हे हवेचं तळं

तळ्यामधल्या न्हात्याधुत्या पोरी

खडतराची तुळई आणि उशी

गवत ढग आणि पाण्याचा विभ्रम

हिर्वा आशीर्वाद घेऊन माझा आत्मा निघाला आहे भ्रमणाला

दुपारी

जनावरांसारखं रवंथ करणं कदाचित नसावं त्याच्या

अंगवळणी

तुझी मर्जी ठेव उजेडावर

उजेड म्हंजे ज्याला मी म्हणतात

नाहीतर कोसळून जातील विद्यापीठातले बुद्धीजन्य वारस

आता काहीच हरवण्यासारखं उरलं नाही

आता काहीच मिळण्यासारखं राहिलं नाही

‘मारा’चा पाऊस सहन करणारी नुसती एक सशक्त पोकळी

आणि कुणाचीही भिंत चोरुन अंगावर चालत येणारा ज्ञानेश्वर

कल्पनेचा महारोग

बेंबी / मेंदू / फुफ्फुस यांतून

या सर्व रोगलागणीनंतरही

ही ज्ञानपीठं आनुवांशिक, त्यांच्या अंतरंगातून

झुलती घरं इच्छांची

ही बैठकीच्या जागेतली शापितं आणि गुपितं

भाषेचं वस्त्र भाषेचा साज भाषेचा रोग आणि

भाषेचा हातमाग

आठवणी बालपणाच्या आणि परिपक्वतेच्या

चालतो परंतु अंतर कापलं जात नाही

ही खोड जडतरातली

बिछान्याचं पातं

बिछान्याचे आयने

शाईच्या पंखातून प्रसवणारं समृद्धीचं नागरिकत्व

भविष्य होऊन जातं डोळ्यातलं गढूळ पाणी

कल्पनेच्या पंज्यात सापडतो निराशयाचा उंदीर

सार्वजनिक जागांचं गावठी माहात्म्य उठतं पेटून

लक्षवेधी सूचनेनुसार

नि:श्वास लागतो पिकू

दृष्टीक्षेप होतो प्रस्थापित

वर्ष, वर्षामागून वर्ष

परंतू शकत नाहीत मूळ जागी

कितीतरी गमावलं

कितीतरी कमावलं

वेळ करु शकत नाही सहाय्य

तू एक दुखरा क्षण ठेव माझ्यासाठी जपून

मी तुझ्यातून

फाटक्या भणंगासारखा निघून जाणार नाही

मुंबई, मुंबई

माझ्या प्रिय रांडे

मी तुला नागवून जाईन

कालचक्राची विलोभनीय रुपं

‘नशीब’ नावाचा दरोडेखोर त्यांवर प्रहार करणारा

“चार आनेकी मुर्गी

बारा आनेका मसाला”

शतकांच्या जखमांवर किती मलम चोळायचं?

 सुळावरच्या पोळ्या किती उपसायच्या?

किती ठेवायचे आठवणीत दगड?

प्रत्येक ठेचेत एक एक मृत्यू सहज आणि रगड

या भूमिगतपणातून व्हायचं असं प्रगट

मर्मात आवाज भिडू द्यायचा आकाशाला

समुद्राचा खवळता

वीज आणि ज्वालामुखी

ढगाची छत्री या समुद्रनवरीच्या माथ्यावर

वऱ्हाडी, करवल्या आणि करवले

ही वरात अशीच वाजत गाजत चाललेली

धुळीच्या चेहऱ्याला जखमी करणारा घोड्याचा नाल

ही मायावी पृथ्वी करु शकणार नाही आपलं कल्याण

पोटभर घालणार नाही जेवू खावू

पाशवी थैमानांचं आंधळेपण

आंधळा न्याय तीक्ष्ण नख्यांचा

या अगाध गहनतेत पेरलेलं दु:ख माझं

हे स्त्रोतफूल अनुपातातलं लोकोत्तर

सुलभत्या वैभवाचा होतो असा गर्भपात

भूतभविष्याच्या डोहात जाऊ दे मला बुडून

हजारो वर्षांपासून ही पाखरं कैदेत तडफडणारी

माणसांचा समुद्र, विशालतर बंदरं

कावळे बगळे पोहते पाणपक्षी

समुद्राची मुडप महिरप घडपडघडीची

काठ्या डोलकाठ्या उभारती शिडं आव्हानांची

सिंदबादच्या सफरी

नानाविध रुपं समुद्रखेळाची

सूर्य असा गुंजेसारखा होऊन जातो गडीगप्प पाण्यात

क्षितिजाच्या पलिकडे त्याला असं शोधायला निघायचं

आपल्याच रक्ताचे नि:स्पंद भोग असे राजरोस जागवायचे

दळणवळणाचे जाळे

ट्रेन, बसेस, डिलिव्हरी व्हॅन्स

सात लाख वाहनांनी प्रदूषित काळीकभिन्न झालेली तू

ओंजळभर पाण्यात आपण जीव द्यायचा काय?

हे असं नाकातोंडात पाणी

ही अशी नाकाबंदी

घ्या सुय्या पोत बिबं

बाये

हायका

डबा बाटली

कागद कपटा

हेपट्यावर हेपटा

ही मुंबई खरंच कोणाला उपाशी निजू देणार नाही

ही मुंबई खरंच कोणाला उपाशी मरु देणार नाही

कंच्या भूगर्भातील पुरुषार्थाशी ही रात्र

संग करु पहातेय?

सीमांत, देहांत

या गिरण्यांची बटनं

कोण ऑन करतात?

दुर्दम्य स्पर्शाचं रोरावणं

संकीर्ण वेदनांचा परावश चित्कार

या बीजांना कोणाच्या आज्ञेवरुन अंकुर फुटतात

संप मोर्चे निदर्शनं घेराओ

जमल्यास लुटुपुटूचा लाँग मार्च

जीवनातल्या विषाचा विलंब

सुखदु:खाचा तोळामासा

ना आत ना बाहेर

स्वच्छ निळ्यात, सताड चंद्र उभा

रोशनीची उन्नत लहर, नि:स्तब्धता

जागोजागी क्षार हरवलेल्या अदृश्य गंधाच्या लाटा

माझ्याच ओढाळ देहाचा तू एक अवयव

माझ्याच रात्रीचा तू एक विभाग

मी वेडा आहे तुझ्यासाठी

छप्पर फाडून तू खाली ये

जोपर्यंत रोपित करत नाहीस तुझं अभिजात प्रेम

मी भुकेला आहे तहानलेला आहे आणि निद्रानाशानं त्रस्तसुद्धा

मी मागतो आहे भीक खणानारळाची

धुतले तांदुळ आणि तांदुळज्याची भाजी

एक दुसऱ्याला स्पर्श करणारी आपली ऱ्हदयं

आजपर्यंत मी ठेवला नसेल तुझ्यावर विश्वास

आलो नसेन तुझ्या ढावळीत

चाटल्या नसतील जिभेनं अंतरंगातल्या जखमा

तुझा उदय होतो आहे

उद्या काहीही वाढून ठेवलेलं असू दे ताटात

मीही असा पोस मागायचं सोडून

धेडगा नाचवीन

भुईनळाची झाडं, हवाई डब्या आणि अॅटम

सनईसूर ताशा आणि लेझीमची घाई

रात्रंदिवस तुझ्याच इच्छेची विभिन्न रुपं

ही आत्मारामाची कंपनी

तिच्यात सर्वच कसं होत रहातं ठणठणपाळ

हरहुन्नरी संदेश जाऊ दे घरोघर

भिकेवरल्या हाकेची निर्लज्ज दारं जाऊ देत कोसळून

उभारली जाऊ देत गुढ्या तोरणं

होऊ दे एकदाचं सीमोल्लंघन

हे सूर गोंधळात टाकणारे

ही वेळ आकाशाला चावणारी

अग्निवृक्षाचं कारंजं

चमकणाऱ्या प्रपातात उडी घेणाऱ्या धबधब्या

तू माझ्या पकडीतून निसट आणि चालू लाग

तू जाऊ शकत नाहीस कुठेही

तू राहू शकत नाहीस कुठेही

वर्तमानाला होऊ दे पायाचा स्पर्श

पावसात गंजून गेलेलं लोखंड

बाजाराचा भंगार आणि जथ्था

कुत्र्याचे रेशमी डोळे, जीवनाच्या

धारणेला संचलित करणारे

सूर्याची कॉइल पाहते आहे उडू

झावळतीच्या तारखा

या म्हणीच्या मध्यावरला

मी आशीष

मला रस्त्याचे क्रॉस चालत नाहीत

दगड चिरडला जातोय

माणूस चिरडला जातोय

होतेय सर्वस्वाची खडी खडी

पाडली जातेय खडी

फोडली जातेय खडी

हवेतले तुटते मनोरे

दऱ्यांचे ओठ रक्तबंबाळ होणारे

प्रस्फोटित होणाऱ्या मूलभूत कल्पना

गिलोटिनची इंद्रियं

छातीच्या स्लाइस

बेंबीची भाकरी

वक्ष:स्थळाची दारू

हवेची मुलगी डोळ्यांत नाचरी

कुत्र्याच्या डोळ्यांतला काकुळतीचा घननिळा

लाल पिवळा हिर्वा सर

किती मजेचा

घडाघडीची इमारत

जीवशास्त्राच्या पानावरली हालचाल

बीजकोषांना काढलं जातंय सोलून

घातलं जातंय जखमांना खतपाणी

पिकू लागते भुवई

शांततेचं मोडून पडतं तंगडं, मुळं दुखावतात

अवकाशात ऋतू राहतात जळत

कारागृहाच्या, गजाआड जळतात मेणबत्त्या

दगड उगवू लागतात आत

हवेची तीक्ष्ण चोच खुपसली जाते

बाईच्या अंगात

टांगलं जातं वळचणीला पाणी

बीजकोष गातात साती आसऱ्यांच गाणं

निदर्शनं करुन झोपलेलं पाणी

होऊन जातं लेकुरवाळं

दृष्टीचं यंत्र

सुसंवादाचा फ्लास्क

या जडशीळ प्रकाशापेक्षा

हलकं आहे तुझ्या कामांगाचं वजन

माझ्या देहाच्या पेटीत

हे कसले क्षण बंद करुन ठेवलेयस?

अवकाशाची कशी करायची घडी?

कशी

नांदवायची ज्योत त्रिभुवनांची?

हीनदीन पूर्वीपासूनच्याच सुरुवाती / समाप्ती

वयाशिवाय वाहणारा वारा

धूळ प्रकाश ध्वनी यांचा कारखाना

संभ्रमात टाकणारे रंगनंग

आंधळेपणाचं दगडी गाढव

व्यापारी खेळवतात अस्वलं

घणाघात सर्व आर्थिक नसनाड्यांवर

फिरला जातोय शुभ्रतेवर पोचीरा

कटक्यानं पुसले जातात मुलाबाळांचे आक्रोश

राजवंशातले कावळे वाहून आणले जातात कासवाच्या पाठीवर

अरे कुणीतरी बघा

या मुलांची नखं वाढलीयत

सुस्वरांची दारं आणि प्रार्थनांचे गुडदे

खरीखुरी शीळ

कारंज्याच्या स्पर्शानं भिजून जाणारी

माझा अहंकार जातो आहे तुटून

मी तिचा हात पकडू इच्छितो

मी तिचा सहचारी होऊन चालू इच्छितो

आज 29 ऑगस्ट

सपंत आलेल्या पावसाच्या गोष्टी

कोसळ्याच तर अजूनही एकदोन सरी कोसळतील

आजही

ओल्या पंखावरली ओलीचिंब नक्षी घेऊन पक्ष्यांचे कळप

लहरा घेतील आजही,

एखाद्या बगिच्यात प्रेमाच्या नांवाखाली जोडपी

सांडतील सालंकृत धातू आजही

लालजर्द स्कॉच

रत्नजडिताचं झाड

छान

या दिवसाचं नामकरण करतेयस तू

मस्त अनुभव

अमानुशतेचं पाणी

तू माझा विहंग

वस्त्र आणि अंग

या इच्छांना भर्जरी कपडे नेसवू नकोस

फॉस्फरसातून तय्यार होणारी माणसं

सुईचं घड्याळ, खांद्यांला स्पर्श करणारं,

या सर्वांना आग लागली तर तुझीही वाफ होऊन जाईल

हे खऱ्याखुऱ्या मुली

हे शृंगारिक लावण्यांमधल्या चंद्रावळी

या चतकोर सूर्याचा हट्ट सोड

पिवळं वादळ पंखांना इजा करणारं

त्यात हा असा रक्ताचा मुका ढोल

मी, चिरतृष्ण, तुला बहाल करु इच्छितोय

हिरवे जादूभरे नयन

त्यांत बॅक्टेरियाचे जंतू परंपरेला डिवचतात

पहाता पहाता संस्कृती निघते मोडीत

तू तुझी सर्व हाडं उघडी करुन टाक

रात्र उतरते आहे झाडावरुन खाली

दफनभूमीवर उगवलं आहे हिर्वं गवत

विद्युद्दाहिनीची चोच होऊ लागली आहे रेशमी

प्रत्येक शब्दाचं घातलं जातंय शवविच्छेदन

सत्याचा लुळा पाय घालू लागला आहे घोळ

बैठकीचं उत्सुक पाणी लागलं आहे आटू

या अंधारातल्या घोड्यांच्या खिंकाळ्या मी ऐकतो आहे

महाश्वेता झोपली आहे भुजांवर

तिला डिस्टर्ब नको

माझी आदिवासी छगुनी

आकाश आणि पृथ्वी

जन्म आणि मृत्यू

परमेश्वर आणि मनुष्य

उदय होतोय की अस्त

सर्व चेहरे सारखेच आहेत

सर्व नावं सारखीचं आहेत

जीवनाचं वाहन थांबता थांबत नाही

संपता संपत नाही

या भरंवश्याच्या जगात

बेभरंवश्याचा महोत्सव

शहर एक दगड

किंवा नावाचा चिरेबंद

गुलाबाचं स्वातंत्र्य

कायद्याचा खेळ

वायद्याची दारु

मेंदूत पसरते आहे शाई

ग्रंथालयं होतात खुन्यांचे संदर्भ

विद्यापीठं होतायत बेडुक-लोणच्यांच्या बाटल्या

हे सूर्या

या शहराला पिऊन टाक

हे पृथ्वी, या शहराला पोटात घे

हे पाण्या

या शहराला हवेत छिनून ठार कर

मनुष्य धूळ आणि हवेतला उत्तराधिकारी

ढगांच्या थिएटरात

मीठ चिवडणारे नाकतोडे

अंतर खणलं जातंय

अनुवंशिक रोगांना जागवलं जातंय

लक्ष्मी / सरस्वती पक्षपाती रांडा

आम्ही या म्हटलो त्या आल्या नाहीत

आमच्या खाली निजा म्हटलो

त्या निजल्या नाहीत

तू आमच्याशी इनाम राख

तू आमच्या बिछान्यांना जागव

अनंताची मुरली वाजव

तू आमच्या स्वप्नांना खेळव

तू आमच्या रेतांना अंकुर फोड

हे भटकभवाने

हे अतिशुद्रे

हे खंडोबाच्या मुरळे

हे नाचनारणे

हे हमदर्दी रांडे

मी तुझ्यातून फाटक्या भणंगासारखा

निघून जाणार नाही

तुझं सत्त्व फेडून घेईन

तू अल्लखनंदाचे दरवाजे वेडझव्यांसाठी खुले कर

मुंबई मुंबई, माझ्या प्रिय रांडे

मी तुला खेळवून जाईन

मी तुला असा खिळवून जाईन

– नामदेव ढसाळ

9 thoughts on “मुंबई मुंबई माझ्या प्रिय रांडे

  1. मुंबईचं वर्णन करताना मला शब्द सुचले असते किंवा लिहिता आलं असतं तर कदाचित ढसाळांच्या या वर्णनाच्या स्टाईलचंच काहीतरी लिहिलं असतं, त्यामुळेच या कवितेचं आकर्षण.बाकी मला कवितेतलं काही कळत नाही आणि या कवितेबाबत तर बोलायलाच नको….

    हे अगदी सत्य आहे….की संदिप सर तूम्ही त्यांच्यासारखं नाही मात्र त्यांच्यापेक्षा वेगळ नक्की लिहील असत..

  2. Pingback: Namdeo Dhasal reads | Rede

  3. मस्त ….कविता आहे ..पुरती वाचू नाही शकत एका दमात…आणि लायाकीपण पण नाही माझी त्या कवितेचा अर्थ समजून घेण्याची……म्हणून कॉपी करून घेतली आहे…नंतर निवांत वाचेल म्हणून….खूप खूप आभार…कविता पोस्ट केल्याबद्दल…….

    • अतुल, मुंबईचं वर्णन करताना मला शब्द सुचले असते किंवा लिहिता आलं असतं तर कदाचित ढसाळांच्या या वर्णनाच्या स्टाईलचंच काहीतरी लिहिलं असतं, त्यामुळेच या कवितेचं आकर्षण.बाकी मला कवितेतलं काही कळत नाही आणि या कवितेबाबत तर बोलायलाच नको.

Leave a Reply to रामबाण Cancel reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s