आमच्याकडं टीव्हीचा डब्बा नुकताच सुरु झाला होता तो काळ. झीटीव्ही दाखवणाऱ्या डिश फक्त शहरात २-४ धनाढ्य व्यापाऱ्यांच्या घरावरच दिसायच्या, आम्हाला फक्त दूरदर्शन म्हणजे डीडी नॅशनल आणि २-४ तास मराठी सह्याद्रीचा आधार वाटायचा. एकेकाकडे हळूहळू टीव्ही खरेदी सुरु झाली होती. कुणाच्यातरी घरी छायागीत, चित्रहार, चित्रगीत, रंगोली अगदी साप्ताहिकीलाही गर्दी व्हायची तो काळ. क्रिकेट मॅचमध्ये बॉल एकीकडे जायचा आणि कॅमेरा दुसरीकडे पळायचा असं सर्रास दिसायचं तो काळ.
अस्मादिकांनी बहुतेक तारुण्यात पदार्पण केलं होतं किंवा on the verge of आहोत असं सारखं वाटायचं तो काळ…
त्या काळी दूरदर्शनवर शुक्रवारी लेट नाईट पिक्चर दाखवायचे, मंडी हा पिच्चर तुम्हाला माहितीय का? तो सुद्धा या कॅटगरीत दाखवला जायचा यावरुन अंदाज लावा. साधारण ११ वाजता सुरु होणाऱ्या या सिनेमांना ‘A’ सर्टिफिकेट असायचं, खरंतर आजच्या पिक्चरच काय सिरियलच्या तुलनेत त्याकाळचा ‘A’ काय X दर्जाचा चित्रपटही स्वत:हून मस्त लाजेल अशी अवस्था; पण त्यावेळी लेट नाईट चित्रपटाबद्दल प्रचंड औत्सुक्यमिश्रित कुतुहलमिश्रित भितीमिश्रित थ्रीलची भावना असायची.
ते चित्रपट पाहता यावेत यासाठी बराच खटाटोप चालायचा, दुसऱ्या दिवशी कोणीकोणी काय काय कष्ट घेतले याची वर्गात चर्चा रंगायची. कधी कोणाकडे तरी अभ्यासासाठी म्हणून रात्री जमायचा कटही रचला जायचा, कधी त्यात यश यायचं तर कधी प्लॅन फ्लॉप जायचा.
अशाच एका यशस्वी प्लॅनमध्ये आम्हाला कमल हसनचा सदमा गावला. कमल हसन माझा आवडता कलाकार, सदमाच्या शेवटी त्याला आणखी मानायच्या प्रोसेसला सुरुवात झाली. त्याआधी सदमाला लेट नाईटमध्ये का टाकलं त्याचं उत्तर जाणून घ्यायची आम्हाला घाई झाली होती, तोवर आम्ही श्वास रोखून बसलेलो. फार वेळ वाया गेला नाही आणि आमचं उत्तर मिळालं त्याचं नाव होतं सिल्क स्मिता. सिल्कचे मादक हा शब्द कमी पडतील असा भाव आणलेले डोळे आणि अंगप्रत्यंगाचा कमल हसनला सेड्यूस करायला तिने केलेला वापर, त्याला तोड नाही. बरं तिचं बँडेड लावणं; कमलसोबतचं तिचं गाणं, किंवा बाकी जे काही तिनं केलंय (समजून घ्या किंवा सदमा बघा) ते वल्गर किंवा बीभत्स किमान आम्हाला तरी वाटलं नाही.
तिचं त्याला घरी बोलावणं आणि इशाऱ्याचे बोल… रात को कितने बजे सोते हो? हा प्रश्न तिनं दोनवेळा ज्या पद्धतीनं विचारलाय तो ऐकाच/ पाहाच; मग आपण बोलू…
बरं कॅमेराही असा वापरलाय की पोरांनी कमल हसनच्या जागी स्वत:ला पाहिलं नसतं तरच नवल. कमलचं कॅरेक्टर त्या अदांमधून कसं काय वाचलं माहित नाही, लेखकालाही तो मोह आवरणं सोप्पं नक्कीच गेलं नसेल, आम्ही मात्र पार आरपार घायाळ झालो होतो, ते वयच तसं होतं असं म्हणायलाही जागा नव्हती कारण कोणत्याही वयातल्या पुरुषाचा विश्वामित्र करायची ताकद सिल्कमध्ये आहे यावर आमचं तिथेच एकमत बनलं. सदमामधे कमल, श्रीदेवी, बालू महेंद्राचं दिग्दर्शन, गुलशन ग्रोवरसोबत लक्षात राहिली ती सिल्क.
सदमामधल्या तिच्या अभिनयाला बालूचा परिस स्पर्श लाभला होता हे मानायलाच हवं. तसं नसतं तर ती आणखी पुढे गेली असती; उपेक्षेचं- जवळपास पोर्नस्टारचं जीणं तिच्या वाट्याला आलं नसतं. नंतर ती जितेंद्रच्या जवळपास प्रत्येक चित्रपटात दिसली. सिल्कचं गाणं नाही असा त्याकाळात जितेंद्रचा एकही चित्रपट नसेल. सगळे चित्रपट पाहिले नाहित पण ऊई अम्मा उई अम्मा, बांगो बांगो बांगो, गली गली बात चली वगैरे गाणी कानावर पडत राहिली. त्यानंतर सिल्क गायब झाली, थेट 15 वर्षांपूर्वी तिच्या गुढ मृत्यूची बातमी आलेली आठवतं. तिच्या पडद्यावरच्या मादक अदांच्यामागे असलेली व्यथा समजून घेणारं तिला कुणी भेटलं नसेल कदाचित.
सिल्क जिवंत असती तर आज 51 वर्षाची असती. तिच्या वाढदिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘डर्टी पिक्चर’मुळे तिचं नाव पुन्हा गुगलवर अवतरु लागलं. विद्या बालनची मेहनत आणि मिलन लुथरासारख्या डायरेक्टरमुळं सिल्कची व्यथा आपल्यापर्यंत पोचली तर हा तिच्या उपेक्षेला काव्यगत न्याय असेल का?