सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाऊन मिनिटभर शांत उभा राहून आलो. हातात जे होतं त्यातल सोपं म्हणा हवं तर ते काम केलं. मनात अनेक विचार सुरुच होते.
१२० कोटी जनता, १ लाख लोकांमागे फार फार तर १२५ पोलिस…
७,५०० किलोमीटर सागरी किनारा, त्याच्या संरक्षणासाठी फारफार तर १०० पॅट्रोल बोटी..
अमेरिकेनं पाच वर्षापूर्वी एका संरक्षण विषयक अहवालात भारताला जगातील सर्वात जास्त अतिरेकीग्रस्त देशात स्थान दिलं होतं, या अहवालानुसार, भारतात २००७ या एका वर्षात वेगवेगळ्या अतिरेकी कारवायांमध्ये प्राण गमवावा लागणाऱ्या नागरिकांची संख्या होती २ हजार ३००…
१९९३ च्या स्फोटांपासून मुंबईवर किमान ८ अतिरेकी हल्ले झाले आहेत, ज्यात शेकडो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला; हजारो निष्पाप जीवांना त्या जखमा घेऊन कसेबसे जगावं लागतंय. २६ नोव्हेंबरचा हल्ला सोडला तर बाकी प्रत्येक वेळी बाँब ठेवणारे किंवा रिमोट दाबणारे हात; कित्येक दिवस आपल्या आजुबाजुला, याच समाजामधे वावरत होते; अजूनही राहात असतील ही बाब जास्त अस्वस्थ करते.
२६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री असलेले विलासराव देशमुख आज केंद्रात कॅबिनट मंत्री आहेत, नियोजन चांगलं असल्यामुळे संधी मिळताच महाराष्ट्रात कधीही परत येऊ शकतात. गृहमंत्री असलेले आर.आर. पाटील, राजीनाम्यानंतर काही काळ जाऊन पुन्हा गृहमंत्रीपदावर आले आहेत, थोडे अबोल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, आधी पंजाब आता राजस्थानचे राज्यपाल आहेत. ओंबळें आणि त्यांच्या धाडसी साथीदारांमुळे जिवंत सापडलेला अतिरेकी अजमल कसाब जेलमध्येच आहे, खाऊन पिऊन व्यवस्थित असावा. या हल्ल्याचा प्लॅन करणारे सगळे अतिरेकी पाकिस्तानात सुखरुप आहेत, जमेल तशा कारवाया करत असतात. कटात मदत करणारा पाकीस्तानी-अमेरिकी एजंट डेव्हीड कोलमन हेडली आणि तहव्वूर राणा अमेरिकेच्या ताब्यात आहे. जनता पुन्हा रामभरोसे आणि “स्पिरिट”च्या ओझ्याखाली दबलेलीच आहे. जुलैमध्ये मुंबईत तीन स्फोट झाले तेव्हा “३० महिन्यानंतर अशी अतिरेकी घटना मुंबईत घडली” याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणारे चिदंबरम आणि दर स्फोटानंतर हे सहन केलं जाणार नाही वैगैरे छाप वाक्य बोलणाऱ्या राजकारण्यांना विसरणं शक्य नाही. थोड्याच दिवसात हल्ल्याचा दिवस म्हणजे तारीख फक्त वर्ष टू वर्ष आठवली जाते, मृतांचे तर केव्हाच आकडे झालेले असतात. जनतेची स्मरणशक्ती चांगली नसते याचा गैरफायदा राजकारणी आणि अतिरेकी दोघेही आणखी किती काळ घेणार आहेत माहित नाही. सर्वसामान्य जनतेच्या रक्तानं अतिरेक्यांचं कॅलेंडर रंगवायचं काम सुरुच आहे.
जानेवारी
२७ जानेवारी, २००३, मुंबई, विलेपार्ले स्टेशनबाहेर सायकलवर ठेवलेल्या बाँबचा स्फोट ३० जखमी
१ जानेवारी, २००९, आसाम, गुवाहाटी, तीन साखळी स्फोटात ५ ठार ६० जखमी
फेब्रुवारी
१४ फेब्रुवारी १९९८, कोईंबतूर – १३ साखळी कार बाँब स्फोट ४६ ठार, २०० जखमी
१९ फेब्रुवारी २००७, समझौता एक्स्प्रेस, ६६ ठार
१३ फेब्रुवारी २०१०, जर्मन बेकरी, पुणे, १६ ठार, ६५ जखमी
मार्च
१२ मार्च १९९३ मुंबई साखळी बॉम्ब स्फोट २५७ मृत्यूमुखी, ७१३ पेक्षा जास्त जखमी
१३ मार्च २००३, मुलुंड स्टेशनवर रेल्वे डब्यात स्फोट, ११ ठार ६५ जखमी
७ मार्च २००६, वाराणसी २ स्फोटात किमान २० मृत, १०१ जखमी
एप्रिल
१४ एप्रिल, २००६ – दिल्ली जामा मशीदीजवळ स्फोट २० जखमी
६ एप्रिल २००९ – आसाम, मालीगाव, ढेकियाजुली भागात पंतप्रधान भेटीच्या आधी बाँब स्फोट. ९ ठार, ६२ जखमी
मे
१८ मे २००७ हैदराबाद, आंध्र प्रदेश, मशीदजवळ स्फोट १३ ठार
१३ मे २००८ जयपूर, राजस्थान ६ साखळी स्फोट, ६३ ठार, १५० पेक्षा जास्त जखमी
जून
१५ जून १९९१ लुधियाना, पंजाब, रेल्वेवरील हल्ल्यात ८० ठार
जुलै
२८ जुलै २००३ मुंबई बसमध्ये स्फोट, ३ ठार ३१ जखमी
११ जुलै २००६, मुंबई लोकलमध्ये स्फोटांच्या मालिकेत ७ स्फोट, २०० ठार ८०० जखमी
२५ जुलै २००८ बंगळुरु कर्नाटक, ७ साखळी स्फोट, १ ठार १५० पेक्षा जास्त जखमी
२६ जुलै २००८, अहमदाबाद, गुजरात १६ स्फोट, ४५ ठार, १६१ जखमी
१३ जुलै २०११, मुंबई, ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार, कबुतरखाना इथं ३ साखळी स्फोट २१ ठार, १५० पेक्षा जास्त जखमी
ऑगस्ट
२५ ऑगस्ट २००३ – मुंबई, गेट वे ऑफ इंडिया आणि मुंबादेवी मंदिराजवळ झवेरी बाजारात दोन टॅक्सी स्फोट. ४५ ठार, १६७ जखमी
२५ ऑगस्ट २००७ – हैदराबाद, आंध्रप्रदेश गोकुळ चाट भांडार आणि लुंबिनी पार्क अशा दोन ठिकाणी झालेल्या बाँब स्फोटात ४२ ठार, ५० जखमी
सप्टेंबर
२४ सप्टेंबर २००२ – गांधीनगर, गुजरात, अक्षरधाम मंदीरावर; लश्करे तोयबाच्या २ अतिरेक्यांचा हल्ला, ३१ ठार, ७९ जखमी
८ सप्टेंबर २००६ – मालेगाव बाँब स्फोट, ३७ ठार १२५ जखमी
१३ सप्टेंबर २००८ – दिल्ली, ५ साखळी स्फोट ३० ठार, १०० जखमी
२९ सप्टेंबर, २००८ – मालेगाव, ८ ठार ८० जखमी
७ सप्टेंबर, २०११ – दिल्ली हायकोर्टात स्फोट ११ ठार, ७६ जखमी
ऑक्टोबर
१ ऑक्टोबर, २००१ – काश्मिर विधानभवनावर आत्मघाती हल्ला. २१ ठार
२९ ऑक्टोबर,२००५ – दिल्लीत ऐन दिवाळीच्या संध्येला स्फोटांची मालिका ६१ मृत्यूमुखी, २१० जखमी
११ ऑक्टोबर, २००७ – अजमेर शरीफ स्फोटात ३ ठार २८ जखमी
३० ऑक्टोबर, २००८ – गुवाहटी, आसाम, साखळी स्फोटात किमान ५० ठार, २५० पेक्षा जास्त जखमी
नोव्हेंबर
२६ नोव्हेंबर २००८, मुंबईवर १० पाकिस्तानी अतिरेक्यांचा हल्ला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे, ताज, ओबेरॉय, नरीमन हाऊस या ठिकाणी ६० तास चाललेल्या छोट्या युद्धात २ कमांडो, २६ परदेशी नागरीकांसहित १६६ ठार शेकडो जखमी
डिसेंबर
२४ डिसेंबर १९९९, एअर इंडियाच्या काठमांडू-दिल्ली विमानाच अपहरण, एका प्रवाशाची हत्या, बाकी प्रवाशांच्या बदल्यात भारताच्या जेलमध्ये कैद असलेल्या मौलाना अझहर मसूदसहीत ३ कट्टर अतिरेक्यांची सुटका.
२२ डिसेंबर,२००० – लष्कर ए तोयबाचा लाल किल्ल्यावर हल्ला, २ जवानांसह ३ ठार १३ डिसेंबर २००१- थेट संसदेवरच आत्मघाती हल्ला ,१२ ठार, २० पेक्षा जास्त जखमी
२ डिसेंबर, २००२ – मुंबई, घाटकोपर स्टेशनबाहेर, बेस्ट बसमध्ये स्फोट २ ठार, ३१ जखमी
७ डिसेंबर २०१० – वाराणसी/काशी, उत्तर प्रदेश, गंगेच्या काठावर स्फोट १ मुलगी ठार २५ जखमी