तुझ्या गावात नाही का तीरथं?

थायरॉईडमुळे सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आली. महिन्याभरात दुसऱ्यांदा सहकुटूंब सहपरिवार गाव गाठावं लागलं. “तुझं कृषी पर्यटन, ट्रेकिंग चालूच असतं, आता थोडं आमच्यासोबत पर्यटन कर” असं आईनं आधीच वदवून घेतलं होतं. आईवडलांना नाही म्हणणं ही किती अवघड गोष्ट आहे याचा तुम्हालाही कधी न कधी अनुभव आला असेलच.  “या प्रवासादरम्यान कुठल्याही नद्यांना किंवा प्रथांना सवयीप्रमाणे नाव ठेवू नकोस” असं बाबांनी निक्षून बजावलं होतं, ते जमेल तसं पाळलं. तसा मी नास्तिक नाही, मी सगळ्यांचे देव मानतो, माझ्या मर्जीप्रमाणे अर्थ काढतो आणि माझेच नियम पाळतो. माझ्या आणि देवाच्या मधे कुणी लुडबूड केली तर खटके उडतात इतकेच.  कामानिमित्त सगळीकडं फिरणं होत असतं, ‘धार्मिक’पर्यटनासाठीसुद्धा उत्तरेत जाणं होईल असं कधी वाटलं नव्हतं.

बहती हो क्यूँ?

गंगा यमुना नर्मदेच्या तीरावर धर्माचा/श्रद्धेचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा मोठ्ठा बाजार तेजीत आहे तो पाहायला अनुभवायला मिळाला, तिथे एक पुर्णपणे वेगळं जग आहे. जन्मभर जाणते-अजाणतेपणी जी काही पापं केलीयत ती धुतली जातील झालंच तर काही पुण्य पदरात पडेल या आशेने रोज हजारो लोक बोटांच्या चिमटीत नाक धरुन नदीत डुबक्या मारण्यासाठी गर्दी करतायत असं चित्र,  मी ही त्या गर्दीचा भाग बनलो.

तिथे अनपेक्षितपणे अंगोळ करायली नदीपे ज्यायचा आनि मग जेवन करण्याचं किंवा ओ माव्शी इकडे या, काका ही नाव तयार छे किंवा मी पोपटला आवाज काढला; ल्हान बालाचा आवाज काढला अशी स्थानिकांची वाक्य सर्रास कानावर पडतात. सर्वात जास्त भाविक महाराष्ट्र आणि गुजरातचे येतात हे त्यामागचं मुख्य कारण. एकीकडे महाराष्ट्रात निरुपमसारखी माणसं इथल्या उत्तर भारतीयांना भडकवण्याचा प्रयत्न करत असतात, अबु आझमीसारखी लोकं मराठीत शपथ घ्यायचीच नाही यासाठी अडून मनसेला मुद्दा देत असतात तर दुसरीकडे मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातली चहावाल्यापासून पंड्यांपर्यंत; स्थानिक माणसं पर्यटकांशी जमेल तितके मराठी शब्द वापरत बोलायचा प्रयत्न करत असतात. सलाते, सलानातेची गडबड सोडा; व्यवसायाची भाषा सगळ्यांना कळते,  ती शिकलो तर जास्त काळ जास्त पैसा कमावता येईल हे गणित लक्षात आल्यामुळे असेल किंवा तिथले आगलावे नेते इकडे बीझी असल्यामुळे असेल;  तिथली लोकं या वादापासून दूर होती, सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीच्या गोष्टीतलं सार त्यांना कळलं असावं, असो.

 प्रयाग म्हणजे अलाहाबादजवळ गंगा यमुना आणि ‘गुप्त’ सरस्वती अशा तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम आहे. आधी त्रिवेणीत डुबकी मारायला नावेनं जावंच लागतं, अशा किमान 2-3 हजार नावा तिथे आहेत, त्या हातानं म्हणजे वल्हवत न्यायची प्रथा, या व्यवसायात अगदी रामाच्या काळापासून प्रामुख्यानं केवट समाज असल्याचं आमच्या तरुण नाविकानं सांगितलं. साधारण 10-12 लोकं बसले की नाव निघते, पर हेड त्याला 50 रुपये. नाव थोडी पुढं जाते न जाते तोच बाजूची छोटीशी नाव जोरात वल्हवत एक पोरगा मागे लागतो. त्याच्याजवळ शेंगदाणे-फुटाण्याचे छोटे पाकीटं असतात, 5 किंवा 10 रुपयाला एक पाकीट, मोठ्ठ्या नद्यांच्या प्रवाहाच्या ओढीनं आलेल्या ‘परदेशी पाहुण्यांना’ देण्यासाठी. हळुहळू पक्षांच्या थव्यातून मार्ग काढत जिथे दोन्ही नद्यांचे- गंगा यमुनेच्या पाण्याचे रंग आणि प्रवाह स्पष्टपणे ओळखू येतात अशा ठिकाणी नाव पोचते.

इथे मोठ्या होड्या असतात. दोन मोठ्या होड्यांच्या मधल्या जागेत एक चार-पाच फूट खोलीवर लाकडी पिंजरा/प्लॅटफॉर्म सोडलेला असतो. त्यात एक झालं की एक भाविक उतरतात आणि मोस्टली मनोभावे डुबक्या मारतात. पाण्यातून डोकं वर काढतायत न काढतायत तोच होडीवरचा एक भय्या हातात तीन नारळ कोंबतो; त्याचे 30 रुपये, एक पेलाभर दूध गंगामैया को अर्पण करावं लागतं वगैरे, पेला 5 का 10 रुपयाला. ते तीन नारळ आपण असे वाहिले, की लगेच त्यांच्यातलाच कोणीतरी ते थोडं पुढे जाताच काढून घेतो, तेच पुन्हा पुढच्या भाविकाच्या हातात, महिन्याभरात असा एखादा नारळ लाखभर रुपये तरी कमावत असेल. नावेतच बॅलन्स सांभाळत कपडे बदलणे वगैरे स्टंट पार पाडले जातात. कधी कधी येताना किंवा जाताना एखादी नाव उलटण्याच्या घटनाही घडतात क्वचित  जीवितहानी होते पण तिथे ना किनाऱ्यावर काही सुरक्षा व्यवस्था दिसली, ना नावेत लाईफ जॅकेट किंवा तत्सम जीव वाचवायला काही संरक्षक उपाय, फक्त नावाड्याचा सहारा, देवावर विश्वास न बसला तरच नवल.

श्रद्धा, घाट आणि बाजार

मी नदी तीरावर पोचलो तेव्हा पुरोगामी महाराष्ट्रातल्या काही गाड्या तिथे आल्या होत्या, किमान 70-80 लोक असतील आणि ती एकाच कुठल्यातरी जातीची नक्कीच नव्हती. वाळूत रोवलेले बांबू आणि वर गवताच्या पेंढ्या/ झावळ्या टाकलेले पेंडाल्स,त्यात एकाच जागेवर वेगवेगळे विधी चाललेले. त्या बिन भिंतीच्या साधारण 50 बाय 50 च्या झोपडीत पिंडदान झाले की त्याच जागी थोडा झाडू मारुन पाणी टाकून लगेच पुढ्च्या विधीची गर्दी बसवली जाते. इथे प्रत्येक राज्याचा वेगळा पंड्या म्हणजे पुजारी. प्रत्येकाकडे तेवढीच गर्दी. पिंडदान, सेतू दान, वेणीदान (म्हणजे त्याच जोडप्यांचं पुन्हा एकमेंकाशी लग्न लावायचं) वगैरे प्रत्येक विधीचे वेगवेगळे रेट्स. दोन विधीचे 301, एकाचे 150 रुपये वगैरे घासाघीसही चालते, पंड्या मोठ्या मनानं डिस्काउंटही देतो. फक्त 30 लोकंच जरी धरली तरी 30 X 301 = 9,000 रुपये तेही अंदाजे 3 तासात, उरलेला दिवस कमाई झाली नाही असं मानलं तरी फक्त विधी सांगून महिन्याला किमान पावने तीन लाख रुपये, हे फक्त एका पंड्याचे, असे तिथे किती आहेत माहिती नाही.

तुझ्या गावात नाही का तीर्थ, बाबा कशाला रिकामा फिरतं? असं तुकडोजी महाराज म्हणाले; त्यात किती अर्थ दडलेला आहे ते कळतं.

दिल्लीच्या National Council of Applied Economic Research (NCAER) या संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरु या चार महानगरांना एकत्रितपणे जितक्या लोकांनी भेटी दिल्या, त्यापेक्षा जास्त लोकांनी म्हणजे तब्बल अडीच कोटी यात्रेकरुंनी तिरुपतीची यात्रा केली आहे. देशात हॉलिडे पॅकेज, हिल स्टेशन किंवा रिसोर्टला, बीचवर किंवा मोठ्या शहरांना भेटी देणाऱ्यांपेक्षा तीर्थस्थळांना भेटी देणाऱ्या लोकांची/यात्रेकरुंची संख्या जास्त  म्हणजे दुप्पट आहे.  महत्वाचं म्हणजे यात्रा करणारांमध्ये ग्रामीण भागातली  जवळपास 17 कोटी लोक आहेत तर शहरी परिसरातून 6 कोटी.

तीर्थस्थळ यात्रेकरुंची संख्या
तिरुपती 2 कोटी 30 लाख
पुरी जगन्नाथ 1 कोटी 82 लाख
वैष्णोदेवी 1 कोटी 72 लाख
हरिद्वार 1 कोटी 11 लाख
मथुरा 82 लाख
मोईनुद्दीन चिश्ती दर्गा, अजमेर 82 लाख
नैना देवी, उत्तर भारत 82 लाख
सुवर्णमंदीर, अमृतसर 73 लाख
शिर्डी 62 लाख
बद्रीनाथ-केदारनाथ 40 लाख
बुद्धीस्ट यात्रा 20 लाख

केल्याने धार्मिक पर्यटन

यातील संधी ओळखून देशातली 25 धार्मिक ठिकाणं निवडावीत आणि प्रत्येकी 110 कोटी रुपये खर्च करुन त्यांचा विकास करावा अशी Confederation of Indian Industry (CII) ने शिफारस केली आहे हे विशेष.

आयुष्यभर मेहनत करायची, जमेल तसा थोडाफार पैसा साठवायचा आणि आयुष्याच्या उत्तरार्धात वेगवेगळ्या तीर्थस्थळांवर जाऊन खिसा रिकामा करायचा हे आपल्याकडे अगदी पूर्वीपासून चालत आलंय, काळागणिक ते बदलेल, कमी होईल असं वाटत होतं, ते बदललंय फक्त कमी होण्याऐवजी चांगलंच फोफावलंय. लोकांकडे पैसा आहे म्हणा त्यांच्यातली श्रद्धा-धर्मभावना वाढलीय म्हणा किंवा काशी प्रयाग किंवा दोन धाम-चार धामला जाणं आधीच्यापेक्षा खूप सोप्पं झालंय म्हणा, लोकांची गर्दी वाढत आहे. घाटाघाटांवर कोट्यवधी रुपयांची प्रचंड मोठ्ठी उलाढाल होतेय, वाढतेय. मेहनत करुन खाणाऱ्या गाईड-नाविकापासून ते गडबडीत कर्मकांड सांगणाऱ्या पंड्यापर्यंत सगळ्यांचं पोट भरतंय, कोणताही धर्म याला अपवाद नसेल.

कर्मकांडाचा भाग सोडला तर मी हा टूर एन्जॉय केला. या जगातून पाप तर नक्कीच कमी होणार नाहीय, पाप आहे म्हणजे पापी लोकंही आहेत; त्यांची संख्याही बरीच असावी, in fact  ते मेजॉरिटीत असल्याचं अनेक जण शपथेवर सांगतील आणि जोवर या जगात पापी लोक आहेत तसंच देव मानणारी(श्रद्धाळू आणि अंधश्रद्धाळू) लोकं आहेत तोवर फुल टू स्कोप असणारा धंदा म्हणजे धार्मिक पर्यटन. पाप-पुण्य वगैरे संकल्पनेवर तुमचा विश्वास नसेल तर पुरोगामी महाराष्ट्रातही तुम्ही अल्पमतात आहात यावर विश्वास असू द्या.

4 thoughts on “तुझ्या गावात नाही का तीरथं?

  1. लेख अतिशय सुंदर झालाय. अभिनंदन…. National Council of Applied Economic Research (NCAER) च्या आकडेवारीने तुकडोजीबाबांच्या अवतरणाने ब्लॉग अधिकच समृद्ध झालाय…

  2. ह्या तीर्थस्थानी भाविकांच्या मानसिकतेचा फायदा घेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशी लुट होते कि विचारू नका…. आजकाल पाप जास्त वाढली आहेत आणि त्याची जाणीव पण बहुतेक होतेय… 🙂 म्हणून कि काय आयुष्याच्या उत्तरार्धाची वाट न पाहता लोक शक्य तितक्या लवकर तीर्थस्थानांना भेट देऊ लागले आहेत…..छान आढावा घेतलात …
    >>पाप-पुण्य वगैरे संकल्पनेवर तुमचा विश्वास नसेल तर पुरोगामी महाराष्ट्रातही तुम्ही अल्पमतात आहात यावर विश्वास असू द्या. +१

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s