पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो, महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आपली इथे भेट झाली नाही. काही कारणांमुळे अजुनही थोडा वेळ तुमच्याकडून मागून घेत आहे; तोवर मी स्टार माझासाठी लिहिलेला एक ब्लॉग देत आहे. २००८ मधील मुंबई हल्ल्याच्यावेळी हा ब्लॉग लिहीला होता, त्यावेळची परिस्थिती कणभरही बदलली नाही हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईलच.
– – – –
गेले काही ब्लॉग आपली बऱ्यापैकी ओळख झालीय तेव्हा आपल्याच माणसांपासून काय लपवायचं? तुम्ही कोणाला सांगणार नाही अशी खात्रीय मला म्हणून फक्त तुम्हालाच सांगतोय,
(जानेवारी २००९)
पाकिस्तान घाबरले…
३०-४० मोस्ट वाँटेड अतिरेकी भारताच्या ताब्यात…
भारताची मुत्सदेगिरी-शिष्टाई फळाला आली…
मनजींच्या प्रेमळ दटावणीनं हाफीज सईद, सय्यद सलाहुद्दीन, परमजीतसिंग पंजावर वगैरे गहिवरले…
अँटनीनी असा काही दम दिला की मौलाना मसूद, रहमान चाचा चळाचळा कापू लागले…
प्रणबदा-चिद्दंबरम यांचं विद्वत्तापूर्ण भाषण ऐकून झहूर मिस्त्री, मुहम्मद इब्राहीम, गजिंदरसिंग यांची बोबडी वळली…
तर त्याचवेळी अंतुलें-जसवंतसिंग-शिवराज यांचे खडे बोल ऐकून दाऊद इब्राहीम, छोटा शकील, अब्दुल तुंडा, टायगर मेमन आणि परिवाराची पाचावर धारण बसलीय.
कुणी अडवाणींना तर कुणी अमरसिंगांना, कुणी मेणबत्त्यांना तर कुणी कशाला घाबरलं…
पाक सरकार आणि मोस्ट वाँटेड अतिरेक्यांना “अब दुनिया को तोंड कैसे दिखाएंगे” असे गहन आणि नैतिक दोन्ही प्रश्न पडले.
भारतीय दिग्गजांच्या शाब्दिक हल्ल्यात पुरते घायाळ झालेले हे मोस्ट वाँटेड अतिरेकीच स्वत:हून “आम्हाला भारताच्या स्वाधीन करा” अशी विनवणी पाक सरकारकडे करु लागले होते त्यात भारतानं आंतरराष्ट्रीय प्रेशर कसलं वाढवलं होतं…
अमेरिका, इंग्लंड, चीन झालंच तर नेपाळ, म्यानमार, टिम्बकटू
थोडक्यात काय तर जगातला सर्वात मोठ्या रशियापासून ते सर्वात छोटा देश मोनॅको,व्हॅटीकन सिटीपर्यंत सर्व बाजूने पाकिस्तानभोवतीचा फास भारतीय मुत्सद्यांनी असा काही आवळला की पाकनं नाक मुठीत धरलं अन् अतिरेक्यांना दाती तृण धरुन भारतात धाडलं.
(जानेवारी २०२०)
चीन-पाक-बांग्लादेश भारतासोबत गुण्यागोविंदानं नांदतायत. अखेर भारतालाही शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्यात यश मिळालंय. भारतानं अतिरेकी कारवायांचं खापर पाकिस्तानच्या माथी मारणं बंद केलंय. क्राईम रेट खाली आलाय, अर्थात गेल्या अनेक वर्षात गुन्ह्यांची नोंद करण्याची वेळच आली नाहीय. अंडरवर्ल्डचा खात्मा झालाय, अर्थात अंडर आणि ओव्हर वर्ल्ड असा भेदभावच राहीला नाहीय. बॉर्डरवर इकडून तिकडे अन् तिकडून इकडे ये-जा करणारांची वर्दळ वाढलीय. कुठल्याशा ३०-४० पक्षांचं धर्मनिरपेक्ष सांझा सरकार दिल्लीत आहे.
सर्व मोस्ट वाँटेड निर्दोष, निष्कलंक आहेत हे पुराव्याअभावी कधीच सिद्ध झालंय, आता हे सर्व हिंदुस्थानची इमानेइतबारे सेवा करतायत.
इम्पोर्ट-एक्स्पोर्टचा मोठा व्यापारी दाउद इब्राहीम रत्नागिरीच्या समुद्र किनारी असलेल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये परिवारासोबत मजा करतोय, नागपाडा, डोंगरी पासून ते दुबई. यू.ए.ई.पर्यंत त्याचं जाळं पसरलेलं आहे, सागरी मार्गाचा वापर कसा करावा यावर गेस्ट लेक्चर म्हणून त्याला पाकिस्तान वगैरे देशात बऱ्याचदा जावं लागतं.
मौलाना मसूद अजहर आणि हाफीज मोहम्मद सईद हे मोठे शिक्षण महर्षी बनलेयत, त्यांचा जमात संस्थेचा शिष्य परिवार देशभर विखुरलाय, सा-या जगाला ते विश्वशांतीचा संदेश देत असतात.
झकीऊर रेहमान अर्थात चाचा रेहमान यांची खाजगी ट्रेनिंग क्लासची मोठी चेन आहे. इथून कमांडो ट्रेनिंग घेउन थेट लश्करात मोठ्या प्रमाणात भरती चालते. चाचाच्या या भतीज्यांना अफगानिस्तानातही जबरदस्त डिमांड आहे.
मेमन बंधू अपक्ष म्हणून बिनविरोध निवडून आलेयत त्यांच्याकडे बांधकाम विभाग दिलाय. छोटा शकील बॉलीवूडचा ब्रँड अँबेसेडर आहे. परमजीत-गजविंदर-झहूर यांचा विमान कंपन्यातला अनुभव बघता त्यांच्याकडे भारतातल्या सर्व विमान कंपन्यांच्या सेक्युरीटीचं काम सोपवण्यात आलंय.
अजमल आमीर कसाब अंधाधुद गोळीबार कसा करु नये यात स्पेशलाइज्ड शिकवणी देतोय, सीएसटीच्या बाजूला त्याला स्पेशल कोट्यातून शूटिंग रेंज देण्यात आलाय. अफझल गुरुचा वकिली व्यवसाय लातुरात जोमात सुरु आहे, फाशी झालेल्या निष्पाप लोकांच्या केसेस तो घेत असतो असं कळतं…
सर्व जनता सुखी-समाधानी आहे.
पुन्हा जानेवारी २००९ ची सकाळ…
दूरून टिव्हीवरच्या बातम्यांचा आवाज येतोय… मनजी म्हणतायत दहशतवादाचा बिमोड करु, प्रणबदा म्हणतायत सर्व पर्याय खुले आहेत-अमेरिकेनं पाकवर दबाव वाढवावा. अँटनी म्हणतायत फौज हटवणार नाही.चिदंबरम म्हणतायत देशाची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे…
बायको चिंतातूर नजरेनं मला झोपेतून उठवत आहे, सकाळचं लख्खं उजाडलं आहे…
तुम्ही कोणाला सांगणार नाही अशी खात्रीय मला म्हणून फक्त तुम्हालाच सांगितलं
काल मला एक सपान पडलं…
mast raje