कांद्यामुळे सत्ता जाते आणि डोळ्यात पाणी येते १९९८ साली भाजपमुळं सगळ्या राजकीय पक्षांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनीच कांद्याचा धसका घेतला. त्याकाळात एका रात्रीत उद्ध्वस्त झालेले अनेक शेतकरी आणि त्याच रात्रीत माडीवर माडी चढवणारे अनेक दलालं आज देशभरात आहेत. गेल्यावर्षी कांद्यामुळं देश कसा व्याकुळ झाला ते आपल्याला माध्यमांमुळे पाहायला मिळालंय. या खरीपात कांद्याचं उत्पादन कमी होऊन गेल्यावर्षीची परिस्थिीती रिपीट होईल की काय अशी चिंता असलेल्या सरकारनं त्यामुळेच आपल्या स्वभावाच्या विरुध्द जात तडकाफडकी निर्णय घेतले. आधी कांद्याचं किमान निर्यात मूल्य वाढवलं आणि नंतर लगेच कांद्यावर निर्यातबंदीही आणली. शरद पवारांचा फारसा दोष नसताना प्रथेप्रमाणे त्यांच्यावर खापर फोडूनही झालंय. आता आपण कांदा का रडवतो या प्रश्नाचा जरा खोलात वगैरे जाऊन विचार करुया.
सर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी या दोन ध्रुवांना रडवण्याचं घाऊक कंत्राट कांद्यालाच मिळालंय याबाबत माझ्या मनात फार कमी शंका आहे. वर्षातून किमान एकदा तरी किंमती वाढल्या की सर्वसामान्य ग्राहकांच्या आणि भाव पडले की शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेच म्हणून समजा. कांद्याचे भाव वाढले तरी किंवा पडले तरी रिजनल, नॅशनल, आंतरनॅशनल मीडियाची ब्रेकींग न्यूज तयार असते. कांदा का रडवतो या प्रश्नाचं उत्तर भल्याभल्यांना कळलेलं नाहीय असं म्हणतात, आपण पडलो सामान्य त्यामुळे ज्यांना याचं खरं उत्तर माहिती आहे अशा लोकांमध्ये आम्ही (तृतीय पुरुष एकवचन) मोडतो… हे जस्ट फॉर द रेकॉर्ड बरं का…
खरं तर यात कांद्याचा काही दोष नाहीय हे लहानपणी आम्हाला(तृ.पु.ए.) पुस्तकातून- नोट्समधून वाचावं लागलं होतं, काहीवेळा त्याचा जोड्या लावण्यात-रिकाम्या जागा भरण्यात वापर करावा लागला होता त्यामुळे ते लक्षात राहिलं. हे सिक्रेट तुमच्याशी म्हणजे ज्यांना अजुन माहिती नाहीय अशा सुज्ञ/जिज्ञासू वाचकांशी शेअर करताना आम्हाला(पुन्हा तृतीय पुरुष एकवचन) अत्यंत आनंद वगैरे होत आहे, ऐका…
कांदा जमिनीत वाढतो तिथून तो आजुबाजुचं बरंचसं गंधक शोषून घेतो त्याचं रुपांतर सल्फोक्साईड वगैरे मध्ये होतं. कांद्यामध्ये अलिल प्रोपिल डायसल्फाईड (Allyl propyl disulphide) हे गंधकयुक्त रसायन किंवा enzyme तयार होतं, कांदा कापला की त्यात अनेक बदल होतं त्याची वाफ हवेत मिसळत थेट वर म्हणजे तुमच्या तोंडाच्या- डोळ्याच्या दिशेने येते, त्यामुळेच कांदा कापताना डोळे चुरचूर करतात किंवा डोळ्यात पाणी येतं, या अलील प्रोपिल डायसल्फाइडमुळेच कांद्याला उग्र वासही मिळतो. थोडक्यात पिकवणाऱ्याच्या आणि खाणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आणायची देणगी कांद्याला निसर्गानेच दिली आहे.
कांद्यामुळे डोळ्यात पाणी येणार नाही यासाठी तज्ञांनी(असं म्हणल्याशिवाय तुम्ही थोडंच ऐकाल?) सांगितलेल्या काही टिप्ससुद्धा मी इथे खास सूज्ञ/जिज्ञासू आणि स्वयंपाकघरात हातभार लावावा लागणाऱ्या वाचकांसाठी देत आहे.
१. कांदा कापण्यापूर्वी २०-२५ मिनिटे तो फ्रिजरमध्ये ठेवला तर त्याचा चुरचुर इफेक्ट कमी होतो.
२. असा कांदा कापताना त्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढून टाकावा, कांद्याचा वरचा भाग कापला तर चालतो पण पातीकडील भाग बिल्कूल कट करु नका म्हणजे सर्वात शेवटी कट करा, कारण या भागातच तुम्हाला रडवणारा घटक सर्वात जास्त असतो.
३. शक्य असेल तर वाहत्या पाण्याखाली काळजीपूर्वक कांदा कापला तरी चु.इ.क.हो.
४. तेज धारवाला चाकू वापरा त्यामुळे हे जे काही चु.इ.वालं रसायन आहे त्याला फार डिस्टर्ब होत नाही, ते आपल्या जागेवरच राहतं आणि चु.इ.क.हो.
५. कांदा कापल्यानंतर फोडी पुन्हा काही वेळानंतर वापरायच्या असतील तर त्या वाटीभर थंड पाण्यात टाकून ठेवाव्यात म्हणजे त्याचा वास किंवा चव बिघडणार नाही.
६. कांद्याचा वरचा पापुद्रा हळुवार काढा, आपल्या (म्हणजे स्वत:च्या) डोक्यावर ठेवा आणि त्याच स्थितीत कांदा कापा, बघा डोळ्यात पाणी येतंय का?
आता सर्वात महत्वाची टिप…
एडिंग्टन नावाच्या एका विदेशी कंपनीनं काही वर्षापूर्वी खास कांदेचष्मा किंवा onion goggles विकसित केला आहे. कांदा कापताना हा गॉगल घातला की त्या वाफा वगैरे डोळ्यात जात नाहीत आणि तुमच्या डोळ्यात कांद्यामुळे पाणीही येत नाही. कांद्यामुळे ज्यांच्या डोळ्यात पाणी वैगेरे येतं अशा शेतकरी आणि ग्राहकांसाठी मी या कांदेचष्म्याची शिफारस करत आहे.
मी सरकारलाही नम्र विनंती करतो की कांदा निर्यात बंदी घातली भाव कोसळले वगैरे कारणाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी यायलंय असं दिसलं की लगेच असे कांदेचष्मे आपण आयात करा आणि शेतकऱ्यांना फुकट किंवा सबसिडीनं वाटा म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी येणार नाही.समजा कांद्याची शंभरी भरली आणि ग्राहकांच्या डोळ्यात पाणी वगैरे यायला लागलं की हाच उपाय करा. पुढे मागे कांदेचष्मे निर्मितीचा उद्योग सुरु करायला एखाद्या विदेशी कंपनीला इकडे बोलवावे, गरज पडली तर त्या कंपनीला फक्त राष्ट्रीय हित लक्षात घेऊन SEZ वगैरेमध्ये जमीन दिली तरी कुणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही असो.
आता कांद्यामुळे डोळ्यात पाणी का येतं याचं खरं कारण तुम्हाला कळलंय. यानंतर जेव्हा केव्हा कांद्यामुळे डोळ्यात पाणी येईल तेव्हा, कुणी कितीही म्हणालं की कांद्याचे भाव वाढले-भाव पडले म्हणून डोळ्यात पाणी आलं वगैरे तरी त्याकडे सरळ दुर्लक्ष करा, याचा बाजारभावाशी काहीही संबंध नाही; त्यामागे विज्ञान आहे; ती अलिल प्रोपिल डायसल्फाइडची कमाल आहे हे लक्षात ठेवा, आपल्या गृहिणीला आणि जवळपासच्या शेतकऱ्यांनाही हे विज्ञान समजून सांगा म्हणजे डोळ्यात पाणी का येतंय याचं खरं कारण त्यांना कळेल आणि त्यांचा मनस्ताप काहीप्रमाणात तरी कमी करण्याचं पुण्य(अर्थात पापपुण्यावर तुमचा विश्वास असेल तरच) तुम्हाला लाभेल.
लय भारी….कांदा झोंबणार बरं का….