माझा या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठींबा आहे, जनलोकपालमधले कच्चे दुवे माहिती असुनही…
याला अनेक कारणं आहेत…
बऱ्याच वर्षांनी; माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच, चांगल्या कामासाठी देशभरात एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालेलं पाहतोय. देशातली तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलीय. जात-धर्म-भाषा-प्रांत-राजकीय पक्ष अशी बंधनं झुगारुन देशाच्या सर्व भागात लोक लाखोंच्या संख्येनं अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सामिल झाल्याचं चित्र दिसतंय. अण्णा हजारेंनी ५ महिन्यांच्या आत ही किमया दुसऱ्यांदा करुन दाखवली.
याची बीजं एप्रिलमध्येच रोवली गेली होती. जनलोकपालसाठी अण्णा दिल्लीत पोचले तेव्हा; महाराष्ट्रातला ७४ वर्षाचा एक भगतसिंग-सुखदेव-राजगुरुंना मानणारा गांधीवादी म्हातारा अधनंमधनं उपोषण करतो, त्याचा इगो सांभाळला, गोड गोड बोलून काही आश्वासनं दिली की लिंबूपाण्याचा पेला ओठाजवळ नेतो उपोषण सोडतो, अशी अण्णांबद्दलची माहीती दिल्ली दरबारी असलेल्या मराठी मंत्र्यांनी श्रेष्ठींना पुरवली असेल कदाचित किंवा हमारा कौन क्या उखाड लेगा अशी इतकी दशकं अंगात मुरलेली मुजोरी असेल, सरकार गाफील राहिलं आणि अण्णा हजारे हे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलं. कोणी स्वप्नातही विचार केला नसेल इतका पाठींबा अण्णांना मिळाला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला एक चेहरा मिळाला. त्यातून धडा घेण्याऐवजी केंद्र सरकारनं मधले ४ महिने वाया घातले आणि वेळ हातातनं गेल्यावर मनिष तिवारी सारखी लोकं अण्णांच्या अंगावर सोडली; मग आंदोलनाला जाणाऱ्या अण्णांना अटक करुन थेट तिहार जेलमध्ये पाठवलं, या प्रकारांमुळं सरकारविरोधी आग भडकायला आणि अण्णांबद्दल सहानुभुती वाढायलाच मदतच झाली.
अशाप्रकारचा देशव्यापी इम्पॅक्ट असणारी ४ जनआंदोलन मला आठवली. त्यातली दोन आंदोलनं मी फक्त ऐकलीयत तर दोन आंदोलनं मी पाहिलीयत/अनुभवलीयत.
मी ‘ऐकलेली’ दोन आंदोलनं म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचं गांधीजींचं आंदोलन, दुसरं आणीबाणीच्या काळातलं जयप्रकाश नारायण/जेपींचं आंदोलन. या दोन्ही आंदोलनांबाबत पुस्तकातून, त्यावेळच्या काही लोकांकडून ‘त्यांनी ज्या अँगलनं पाहिलं’ तसंच आणि तेवढंच माझ्यापर्यंत थोडफार पोचलं. पहिली क्रांती मला कळण्यात रिचर्ड अटनबॅरोचा ‘गांधी’ आणि श्याम बेनेगलच्या ‘भारत एक खोज’चा वाटा त्यातल्या त्यात मोठा. तरीही या दोन्ही आंदोलनाशी रिलेट करणं मला खूप अवघड जातं. माझ्या कितीतरी नंतर जन्मलेल्या; आत्ता अण्णांच्या आंदोलनात दिसणाऱ्या तरुणांची स्थिती यापेक्षा वेगळी नसेल.
मी ‘अनुभवलेली’ दोन आंदोलनं म्हणजे मंडल आणि कमंडल. रामजन्मभूमीसाठी देश (म्हणजे देशातला ‘हिंदू’, फारफार तर तथाकथित कट्टर हिंदू म्हणूयात) एकत्र आणण्यात, धर्माच्या नावावर देशभरात हिंदू-मुस्लिम अशी भेग पाडण्यात भाजप-विहिंप वगैरेंना यश मिळालं होतं. ती भेग वाढून त्याची दरी कधी बनली ते कळलंच नाही. त्यावेळी या दरीत देशाची शांतता पडली ती बाहेर येण्यासाठी अजुनही धडपडतेय; दरी किती खोल असेल याचा अंदाज यावरुन यायला हवा. या आंदोलनातही देशभरात लोकं-तरुणाई रस्त्यावर आली होती पण ती आपला धर्माभिमान(?) आणि दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या प्रचंड द्वेषापोटी एकत्र आली होती. जितक्या वेगात लोकं एकत्र आली त्य़ापेक्षा जास्त वेगानं विखुरल्या गेली, ती अजुनही एकत्र आली नाहीयत.
दुसरा अनुभव ८९-९० च्या काळातला. आरक्षणाचा निर्णय देशाच्या भविष्याला कलाटणी देणारा. मंडल आयोगाच्या शिफारशीमुळे म्हणजे राखीव जागांमुळे पिढ्यानं पिढ्या समाजरचनेत खालच्या भागात दाबून ठेवलेल्या घटकांना वर यायची- पुढं जायची कवाडं किलकिली झाली. त्याच्या समर्थनात आणि विरोधात त्यावेळीही देशभरात लोकं-तरुणाई रस्त्यावर आली होती पण त्या एकत्र येण्यातही ‘दुसऱ्या’ जातीच्या लोकांबाबत द्वेषाचा अंश होताच. त्यावेळी निर्माण झालेली कटुता अधुनमधुन डोकं वर काढत असतेच.
या पार्श्वभूमीवर मी सध्याचं अण्णांचं आंदोलन पाहतो. इथेही राग आहेच पण तो एका विशिष्ट व्यक्ती,गटाबद्दल नाहीय, विशिष्ट जातीधर्माबद्दल नाहीय, विशिष्ट भाषा, भाषिक-राज्याबद्दल नाहीय तर तो आहे व्यवस्थेविरुद्ध/सिस्टिमविरुद्ध, प्रतेयकाला कधी न कधी त्रास देणाऱ्या भ्रष्टाचार या कॉमन डिसीज विरुद्ध आहे.
त्यामुळेच गेल्या काही काळात फक्त राज ठाकरे, शेतकरी आत्महत्या, आदर्शमुळे चर्चेत असलेल्या राज्यातून आलेल्या, पांढरा शुभ्र सदरा, धोतर, गांधी टोपी घालणाऱ्या, इंग्रजी तर दूरच ‘सब एक माळ के मणी है’ अशी हिंदी बोलणाऱ्या अण्णा हजारेंवर देशभरातल्या सामान्य म्हणवल्या जाणाऱ्या लोकांनी यावेळी विश्वास टाकला. जनतेला गृहीत धरणाऱ्या,पर्याय नसल्यामुळे मोठे बनलेल्या राजकारण्यांवर विश्वास टाकण्यापेक्षा अण्णांवर विश्वास टाकणं त्यांना जास्त हिताचं वाटलं असावं.
लोकांना जनलोकपाल मधले बारकावे माहिती नसतीलही कदाचित, पण हा माणूस भ्रष्टाचार मिटवण्यासाठी, आपल्यासाठी, येणाऱ्या पिढ्यांसाठी लढतोय, काही तरी करतोय ही जाणीव लोकांमध्ये, तरुणांमध्ये नक्कीच आहे. जनलोकपालमुळे भ्रष्टाचार संपणार नाही हे लोकांना माहित आहे. तरीही लाखो लोक, तरुणाई रस्त्यावर उतरतात तेव्हा दुष्यंतकुमारच्या एक पत्थर तो तबियत से उछालो यारों चा अर्थ, त्यातली भावना या सामान्य लोकांच्या आत गेली अनेक वर्ष कुठंतरी असते. बदलाची सुरुवात होण्याला ही भावनाच कारण ठरते असं अनुभवी लोक सांगतात.
७४ वर्षांच्या अण्णांनी एक पत्थर मारायचं धाडस दाखवलंय बाकी काम तरुणांनी करायचंय.
सध्या सगळे म्हणतायत तसा मी अण्णा हजारे नाही, तरीही माझा या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठींबा आहे.
Anna ji che andolnat kahi kami pana asel mi mazya mitranchy matashi sahmat ahe pan sadhya ved ashi ahe ki apanach apsat vad na karta anala 100% samarthan deun tyana sarkar var dabav takun janlokpal samat karnyasathi madat karavi ag jya kami hotya tya apan purn karat rahu pan sarvat jaruri ahe sarkarla lagam lavne…..
annaji hum tumhare saath hai.
खरंय …. भष्ट्राचार एवढा वाढलाय कि सर्वसामान्य जनताही त्यास चागलीच वैतागलीय…. आणि त्याचवेळी अण्णानी चळवळ उभी केल्याने त्यास मोठा पांठिबा मिळातोय… एवढी मोठे आंदोलन सुरु आहे पण कोठेही त्यास गालबोट लागलेले नाही …. नाही तर अन्य लोक त्याचे आंदोलनास केवळ प्रसिध्दी मिळावी वा सरकारचे लक्ष जावे म्हणुन कधी कधी आंदोलनात जाणीवपुर्वक हिंसेचा आधार घेतात… .टायर जाळतात दगडफेक करतात अशा लोंकानी आंदोलन कसे हवे हेही अण्णाकडुन शिकण्याची गरज आहे म्हणजे किमान सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार नाही सार्वजनिक खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही… आपला हा लेख.. विचार खुप आवडले .. धन्यवाद
…
अण्णांच्या उद्देशाबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही…पण त्यांचा मार्ग नक्कीच
चुकीचा आहे…याबद्दल मी तुमच्याशी वारंवार बोललेचो आहे…वेगळं उद्रृत करण्याची
गरज नाही…..:)
>>>>>सध्या सगळे म्हणतायत तसा मी अण्णा हजारे नाही, तरीही माझा या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला पाठींबा आहे….
ह्या वाक्याला माझा १०० % पाठिंबा … 🙂
पटण्यासारख लिहलय , नाहीतर सध्या ह्या विषयावर जे काही लिहल जाते ते सांगायला नकोच….
धन्यवाद देवेंद्र, मला या आंदोलनातल्या काही बाबी खूप आवडल्या. लाखो लोक रस्तावर आहेत पण ना टायर जाळले ना बसच्या काचा फुटल्या, हातावर पोट असणाऱ्यांना या आंदोलनामूळे उपाशी मारलं नाही की सामान्य जनतेला फार त्रास झाला नाही.
इस देशकी जनता मालिक है, आमदार-खासदार-अधिकारी सगळे जनतेचे नोकर आहेत असं जिथून सत्तेच्या माजाचा प्रवाह सुरु होऊन खालपर्यंत जातो त्या दिल्लीत जाऊन कोणीतरी सांगतंय हे पाहताना ऐकताना खूप चांगलं वाटलं. राजकारण्यांना त्यांची खरी जागा काही काळापुरती का असेना पहिल्यांदाच कळली असेल.
मलाही ह्याच कारणांसाठी हे आंदोलन भावले आहे… नाहीतर काँगेस सरकार अगदी बेलगाम झाली होती …