कात्रज ते सिंहगड ट्रेकचा थरार

गेल्यावर्षी मी, प्रशांत, माणिक आणि मयुरेशनं कात्रज ते सिंहगड संध्याकाळी ६ ते पहाटे ५ असं जवळपास ११ तासात सर केलं होतं. यंदा आमचा ग्रुप वाढला होता कळसुबाई, भीमाशंकर आणि वासोटा ट्रेकमुळे आत्मविश्वास  वाढलेला मेघराज पाटील, पुण्याहून  मंदार गोंजारी येणार  हे जवळपास नक्की होतं. अभिजीत करंडेचा सस्पेन्स आदल्या रात्रीपर्यंत कायम होता. यशस्वी शिष्टाई, सहकाऱ्यांची थोडी साथ आणि बॉसचा मोठेपणा कामाला आला आणि अभिजितचा मार्गही मोकळा झाला. सचिन ढवण येणार असं ऐकत होतो पण फार सिरियसली घेतलं नव्हतं, तो ही ऐनवेळी आला. थोडक्यात आम्ही ८ जण असणार होतो.

प्रशांत, माणिकची पॉवर नॅप

बुटाची ZZ संपवून मी ३-३.३० ला पुणे कार्यालयात पोचलो. प्रशांत आणि माणिकची स्टुडिओत वामकुक्षी सुरु होती. स्टार प्रवाहवाल्यांनी मस्त जेवणाचा बेत केला होता त्याची सुस्ती दिसत होती. निकालासाठी आलेला प्रणव पोळेकरही तिथे होता, तो माझ्यासाठी थेट ताट घेऊन आला. कोणाला आणि कशालाच नाही म्हणायला आपल्याला कधीच जमत नाही, खायच्या बाबतीतही तेच. थोडी भूक लागली होतीच त्यात भाकरी, मस्त रस्सा भाजी आणि कांदा होता, नाही म्हणनं अवघड गेलं. रानातल्यासारखं मस्त तिखट आणि चविष्ठ जेवण होतं, तुटून पडलो.

मधल्या काळात अभिजीतशी फोन सुरु होताच. संध्याकाळी ६ ला फ्लॅगॉफ होता. हे तिघं अजूनही मुंबईहून पोचले नव्हते. स्टोरीसाठी बाहेर गेलेले मयुरेश आणि मंदारही अजून आले नव्हते. कात्रज बोगद्याला पोहचू आणि यांची वाट पाहू असं ठरलं आणि साडेचार पावणेपाचला मी, प्रशांत आणि माणिकनं निघायचा निर्णय घेतला. वाहनसौख्य नव्हतं. मिळेल त्या बस किंवा ऑटोनं जायचं ठरलं. एका ऑटोवाल्याला विचारलं तर त्यानं पीएमटीनं जा स्वस्तात पोचाल असा मोलाचा सल्ला दिला. आधीच उशीर झाला होता त्यामुळे आम्ही ऑटो घेतला त्यानं कात्रज डेपोपर्यंत गेलो. तिथून वर जायला टमटम, जीप होत्या. आमच्या सारखीच उशीर झालेली कॉलेजची बरीच मुलंमुलीही तिथे होती. त्यातल्या एका ग्रुपनं एक टमटम अति पॅक झाली होती.

ट्रकमधून ट्रेककडे

आम्ही एका  ट्रकला हात केला, त्यानं होकार दिल्यावर आत चढलो. घाटातून ट्रक चालवतानाही ड्रायव्हर बालाजी आमच्याशी निवांत गप्पा मारत होता. त्या ट्रकचा आरसा-रिअर मिरर थोडा वेगळा वाटत होता. आहे तेच दाखवत होता पण त्याचा आवाका मोठा आणि ठळक वाटला. त्यातून आम्ही मोबाईल कॅमेऱ्यानं फोटो काढायचा प्रयत्न केला.

२०-२५ मिनिटात बोगद्याच्या पायथ्याशी उतरलो. डोंगरावर पोचलो हिरवगार गवत आणि तरुणाईचा उत्साह डोळ्यात भरणारा होता. गेल्यावर्षीपेक्षा जास्त गर्दी होती.

प्रसाद पुरंदरेंसुद्धा मयुरेशसह सगळ्यांची वाट पाहात होते. त्यांना, त्यांच्या एन्डुरो टीमला भेटून आम्ही तिघे त्या इंतजारमध्ये सामील झालो. प्रसादनं फ्लॅगऑफही थोडं पुढं ढकललं शेवटी साडेसहापर्यंत थांबून टिम्सना झेंडा दाखवायला सुरुवात झाली. एक एक करत ५-७ बॅचेस डोंगर चढू लागल्या. भारतीपर्यंत आलोत, घाटात आहोत, १० मिनिटात पोचतोय असं सांगणाऱ्या अभिजीत-मयुरेश आणि कंपनीचा अजुनही पत्ता नव्हता.पावने सात वाजत आले होते, अंधार पडू लागला होता. निर्णय घ्यायला थोडं अवघड गेलं पण प्रशांतनं बाकीच्यांसाठी थांबायचं, मी आणि माणिकनं पुढं जायचं, पुढे एखाद्या पॉईंटला वाट पाहायची असं ठरलं आणि कात्रजहून सिंहगडाकडे आमचं पहिलं पाऊल पडलं. या मार्गावरुन आम्ही दुसऱ्यांदा जात होतो त्यामुळे असेल कदाचित आम्ही थोडे निवांत होतो. डोंगरदऱ्या, वाटा, धुकं, अंधार, दगडधोंडे, झाडं ओळखीची वाटत होती.

मुलींच्या जिद्दीला तोड नाही

इथल्या काही टेकड्यांवरुन असंख्य दिव्यांनी  उजळून निघालेलं पुणे इतकं मस्त दिसतं की ते पाहण्यासाठी तरी हा नाईट ट्रेक करावा. साधारण २ टेकड्यांनंतर एक जागा येते. तिथं एकच वाट, एकावेळी एकच माणूस सावकाश पुढे जाऊ शकेल; अतिशय छोटी आणि घसरडी. बंद बाटलीच्या बुचाजवळ बुडबुडे बाहेर पडायची वाट पाहत अडकून पडतात तशी तिथे मुलामुलींची गर्दी होते. काही जणांच्या पार्श्वभागाचा आणि चिखलाचा पहिल्यांदा संपर्क येतो ते हे ठिकाण. बरं,एवढा टप्पा सावकाश पार केला की झालं असं मानू नका कारण त्यानंतर लगेच अतिशय कठीण उतार आहे तिथे ब्रेक फेल गेलेल्या गाडीसारखी आपली अवस्था होती. पाय मेंदूच्या सुचना धुडकावून प्रचंड वेगाने पुढे पुढे जात राहतात, वेळीच ब्रेक बसले तर ठीक…समोर दरी असते. हा ट्रेक सोपा असेल अशा भ्रमात जे असतात त्यांचा पहिल्या थ्रीलशी सामना होतो तो याच ठिकाणी.

“आपालीआपली बॅग घ्यायची”, “ज्यानं त्यानं आपापलं बघायचं” असं गेले आठ दिवस माणिकचं टुमणं सुरु होतं. पाठीवरची बॅग थोडी जड झाली होती इतकंच. दोन दोन  पाण्याच्या बाटल्या, बिस्किटं, चॉकलेट, खजूर वगैरेची नंतर नंतर खूप गरज पडते. खायच्या अर्ध्या वस्तू माझ्या बॅगेत होत्या तर अर्ध्या प्रशांतकडे राहिल्या होत्या. यावर्षीही मी बॅटरी घ्यायचं विसरलं होतो त्यामुळे परप्रकाशात ठेचकाळत पुढं जाणं सुरु होतं. तरीही ज्या वेगाने आणि आरामात आम्ही पुढे जात होतो त्याचं आम्हालाच कौतुक वाटत होतं. पाऊस असता तर जास्त मजा आली असती. १०.३०–११ वाजले असतील, पहिल्या पीसीचा तंबू लागला. आम्ही थांबलो, बिस्किटं बाहेर काढली; खाणार तेवढ्यात मोठ्ठा आवाज करत अभिजीत, प्रशांत आम्हाला जॉईन झाले. मयुरेश, मेघराज, मंदार, सचिन निवातं येतायत असं त्यांनी सांगितलं. तिथे आम्ही  थोडी पोटपुजा उरकली. चौघं जण एकत्र आल्यामुळं थोडा उत्साह आला होता, त्या भरातच पुढचा डोंगर पार पडला.

ट्रेकमध्ये त्यातल्या त्यात नाईट ट्रेकमध्ये ट्रेल किंवा टेल सुटणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तुमच्या समोरचा ग्रुप तुमच्या नजरेच्या किंवा चालण्याच्या टप्प्यातून गेला की वाट चुकण्याची शक्यता वाढते. वाट चुकली तर नवा अनुभव मिळतो हे खरं असलं तरी, वेळ आणि शक्ती वाया जाते, मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यात आणखी एक धोका म्हणजे इथे मेंढरासारखं खाली मान घालून पुढच्याला फॉलो केलं जातं त्यामुळे तुम्ही चुकलात की तुमच्या मागची मेंढरं हमखास चुकली. बॅटरीवाला माणिक समोर होता. बहुदा आमचा एक टर्न चुकला, बराच वेळ समोर कोणी दिसत नव्हते; वाट चुकली आहे हे लक्षात आलं. आमच्या मागे किमान 12-15 मुलंमुली येत होती. तो डोंगराचा पदर होता म्हणजे वर जाण्याऐवजी आम्ही डोंगराला आडवं जात होतो. वाट खूप अरुंद आणि निसरडी होती, 15-20 मिनिट पदरातूनच पुढं जात राहिलो, डोंगरमाथ्यापासून खाली गेलेली एक मोठी वाट आडवी आली. तिथे थोडावेळ थांबलो, उजव्या हाताला वरुन बॅटऱ्या खाली येत होत्या, म्हणजे वळसा घातल्यामुळे अर्धा डोंगर चढणं आणि उतरणं वाचलं होतं. जे स्पर्धक होते त्यांना वर एखादा टीसी पॉईंट तर नव्हता ना याची चिंता लागली पण वरुन येणारांनी त्यांची चिंता दूर केली. ट्रेक काय आणि आयुष्य काय; वाट चुकण्याचा फायदा होतो… कधीकधी.

या टप्प्यात कधीतरी प्रशांत-अभि पुढे निघून गेले होते. एक डोंगर चढून उतरला की पुढे दुसरा डोंगर वाट पाहात उभा हे के टू एसचं वैशिष्ट्य. साधारण 12 वाजता एक पीसी लागला, तिथे NEF चा अजिंक्य आणि फेबमधल्या सायकलवारीत घिसरला आमची मदत करणारा राज पाटील भेटले, आमचे भिडू आत्ताच तिथून गेल्याचं त्यांनी सांगितलं. गुडघ्यांची कुरुकुर सुरु झाली होती पण गेल्यावर्षीपेक्षा कमी त्रास होता, स्प्रे मारल्यानं वेदना सुसह्य होत होत्या. आता एक अवघड डोंगर चढला-उतरला की तळई गार्डन हे चित्र मनात ठेऊनच चढाईला सुरुवात केली. इथे पायवाटेवरच्या मोठ्या खडकांचा, झाडांच्या फांद्यांचा आधार घेतल्याशिवाय, हातात खडे, काटे घुसल्याशिवाय वर जाणं कठीणच.

हा त्रास worth आहे असं वाटायला लावणारा माझा आवडता टप्पा यानंतर सुरु होतो. जंगलातला 15-20 मिनिटाचा वॉक; किड्यांचे आवाज, वाऱ्याचा अन् त्यामुळे होणारा पानांचा आवाज तुमचा सगळा शीण हलका होतो. गेल्यावर्षी सारखा पावसाचे थेंब पानांवर पडून होणारा आवाज ऐकायला मिळाला असता तर जास्त मजा आली असती असो. सगळ्याचं गोष्टी मनासारख्या झाल्या तर त्यात मजा नाही असं मध्यमवर्गीय छापाचं वाक्य स्वत:ला ऐकवत, शक्य तितकं एन्जॉय करत पुढे जात राहिलो. रात्री सव्वा वाजता सिंहगडचा डांबरी रोड लागला तिथे NEF च्या गाड्या, डॉक्टर्स, अँबुलन्स, पाणी, उकडलेली अंडी अशी व्यवस्था होती. प्रशांत-अभि 10 मिनिटांपूर्वीच तिथून गेल्याचं सांगितलं, त्यांना खालच्या पीसीवर थांबायला सांगा असा निरोप माणिकनं दिला, मार्शल्सच्या वॉकीटॉकीवरुन मेसेज पुढे गेला. मी गुडघ्यांवर स्प्रे मारला त्या स्वयंसेवकानं विचारलं “काय होतंय? म्हणलं काही नाही उतरताना थोडा त्रास होतोय. तो म्हणाला “एवढंच ना मग सावकाश उतरा की घाई कायंय? तो मोलाचा सल्ला लक्षात ठेवत तिथे वेळ न घालवता आम्ही उतरायला लागलो.

हा टप्पा म्हणजे भयानक घसरण, बुड न टेकवता खाली उतरणं महाकठीण काम. या वाटेवर जवळपास सगळेजण चालण्यापेक्षा घसरायला पसंती देतात, जे तसं करत नाहीत ते आधी ढुंगणावर रपकतात मग शहाण्यासारखं घसरायला सुरुवात करतात. बॅटरी नसल्यामुळे मला इथे खूप त्रास झाला. माझ्या मागेपुढे असणारी मुलं मुली बऱ्याचदा घसरली होती पण जिद्दीनं, एकमेकांच्या मदतीनं, टिममेट्सला चिअर करत त्यांचं पुढं जाणं सुरुच होतं. ते टिम स्पिरीट, ती कमिटमेंट पाहून समाधान वाटतं होतं.

सचिन ढवण- मेहनतीचं चीज झालं

एके ठिकाणी उतारावर उजव्या हाताने झाडाला धरायला गेलो, अंदाज चुकला आणि काळजाचा ठोकाही… फक्त हात मागे झाडाला आणि अख्खं शरीर पुढे अधांतरी अशी अवस्था काही क्षण होती. डाव्या हातानं बाजुच्या झाडाचा आधार घ्यायला गेलो, ती फांदी हातात आली पण उजवा हात सुटला, तोल गेला, चिखलामुळे पाय खालपर्यंत घसरले. ‘केचुआ’नं थोडं कंट्रोल आलं खरं पण फुल्लं बॉडी स्ट्रेच घडला, उजवा हात वर नेत दोन्ही हातांनी झाड कसंबसं धरलं आणि महत्प्रयासानं बॉडीची गाडी पुन्हा ट्रॅकवर आणली. एखाद्या अप्रतिम आऊटस्विंगरवर बीट झाल्यानंतर तो बॉल लगेच विसरुन जात द्रविड ज्या शांतपणे पुढच्या बॉलवर कवर ड्राईव्ह मारतो ना तोच शांतपणा आठवत पुढे उतरु लागलो.

लाल लाईट आणि टेंटमधला मंद उजेड लांबून दिसला आणि बरं वाटलं. अंधारात काही टाळकी बसली होती; चान्स घ्यावा म्हणून ‘प्रशांत-अभिजित’ अशी जोरात हाक मारली. ‘या, या’ असा ओळखीचा आवाज कानावर पडला आणि बरं वाटलं. आम्ही वर दिलेल्या मेसेजमुळे त्या पीसीवर प्राजक्तानं या दोघांना अर्ध्या तासापासून थांबवून ठेवलं होतं, चरफडली असतील बिचारे पण थांबले हे काय कमी.आमचंही टिम स्पिरीट असं अधूनमधून दिसत होतं बरं का. थोड्या वेळात माणिकही आला. तिथे १०-१५ मिनिटं विश्रांती मिळाली आणि पुढे निघालो. गडाच्या पायथ्याला पोचण्याआधी एक ओढा येतो यंदा त्याला पाणी कमी- चिखल जास्त होता, तो ओढा ओलांडून पायथ्याला पोचलो. बऱ्याच टीम्स इथे थांबल्या होत्या, इथूनच खूप जण क्विट करतात. माणिकचा मूड बदलत होता पण त्याआधीच थोडावेळ  रिलॅक्स होऊन साधारण अडीच वाजता चौघांनी गड चढायला सुरुवात केली. आम्हाला वाईट वाटू नये म्हणून अधून मधून भुरुभुरु पाऊस पडत होता.

मेघराज- निर्धार पक्का

आम्ही दोन तीन झोपड्यांमध्ये थोडावेळ थांबत गडावर चढत राहिलो. अर्ध्या वाटेवर एका झोपडीतल्या मावशींकडे लिंबू पाणी पिलं, चुलीवर शेक घेत अंगात थोडी गरमी आणली. इथून प्रशांत आणि अभिजीत पुढे गेले. वेगळ्या वाटा पाहात, मधेमधे बसत, शांततेत आमची आगेकूच सुरु होती. हा गड चढताना त्यातही शेवटचा टप्पा चढताना पण तानाजी आणि त्याचे मावळे माझ्यासोबत आहेत, त्या मोहिमेवरच्या मावळ्यांमधलाच मी एक असा भास मला नेहेमी होतो, ते फिलिंग नेमकं सांगणं अवघड आहे असो.

पहाटे साडे चारला गडावर पोचलो पण टिळकवाड्यापर्यंत जाणं खूप जीवावर आलं, तिथे पोचून NEF च्या कार्यकर्त्यांच्या मधे जागा मिळाली तिथं अंग टाकून दिलं. थेट सकाळी ७ ला जाग आली. सगळ्या टीसीपीसींमध्ये समन्वय राखण्याचं दिप्ती(DPT)चं काम सुरुच होतं. आमचे आणखी चौघे भिडू तळाई गार्डनवरुन निघाल्याची नोंद तिच्यापर्यंत पोचली होती, तिथून पुढे ते आले की नाही कळलं नाही. त्यांनी पायथ्याशी क्विट केलं असेल अशी पुसट शंकाही आली पण मयुरेशचा अनुभव आणि मेघराजचा निर्धार(हटवाद) यांचा विचार करत ती शंका काही काळासाठी बाजूला ढकलली.

थोड्याच वेळात बाकीच्यांना जाग आली. प्रशांतला लवकरात लवकर मुंबईला कार्यालयात पोचणं गरजेचं होतं, लवकर बाहेर पडलो. बाजुच्या झोपडीत गरम भज्यांची ऑर्डर दिली. भजे आली आणि सोबत मयुरेश मग मेघराज, मंदार येताना दिसला, सचिन ढवणही पोचला;  त्याच्या चिकाटीचं कौतूक वाटलं. थोडा वेळ गप्पाटप्पा मग भजे once more, चहा, कुल्लडमधलं मस्त दही, गर्मागरम पीठलं भाकरी असं जे तिथं मिळेल ते साग्रसंगीत खाल्लं आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.

आमची ‘सो कॉल्ड टिम’ या पूर्ण ट्रेकमध्ये एकदाच एकत्र आली…परतीच्या प्रवासाला.

गडाच्या दरवाज्यावर फोटो काढू असं ठरलं पण पुन्हा काही मागे, काही पुढे अशी ताटातूट झाली आणि तो ऐतिहासिक फोटोही राहीलाच. तेवढं सोडलं तर अनुभव मस्त होता,

फक्त थोडासा पाऊस आणि माझा कॅमेरा सोबत असता तर आणखी मजा आली असती.

2 thoughts on “कात्रज ते सिंहगड ट्रेकचा थरार

  1. मेघराज ह्यांच्या ब्लॉगवर वाचल होत ह्या ट्रेकबद्दल… आता हे वाचून K2S करायची इच्छा जास्तच प्रबळ झालीये…

    • शक्यतो रात्री जा, पाऊस असेल तर विचारायलाच नको. तसा दिवसाही घाम काढणाराच आहे पण तू बरेच ट्रेक्स केलेयस म्हणून…

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s