पुढच्यावेळी तयारी करायची, चांगला प्लॅन करायचा, यावेळच्या चुकातून शिकायचं वगैरे वगैरे बरंच काही ठरवलं होतं. एक वर्ष लोटलं त्या ट्रेकला. यंदा K2S २९-३० जुलैला आहे हे प्रशांत कदमनं खरंतर दीड महिन्याभरापूर्वीच सांगितलं होतं तरीही पार्किनसन्स लॉ कामाला आला आणि अँडरसनला खेळताना अभिनव मुकूंदची कमी पळापळ झाली असेल तशी आमची धावपळ सुरु झाली. बुट, बॅटरी, बॅग घेणं बाकी होतं.
गेल्यावर्षी मी माझे क्रिकेटचे बुट नेले होते. जे काही ८-१० डोंगर आहेत ते चढायला, उतरायला म्हणजे घसरायला मला त्याची मोठी मदत झाली. त्या सिंहगड मोहिमेवरच ते बुट कामी आले. वुडलँड होता; तो ८ महिने कुठल्याही डोंगरावर चालू शकेल मात्र पावसाळ्यात तो काही कामाचा नाही हे माहित होतं. पावसाळ्यातल्या ट्रेकचा आनंद लुटायचा असेल तर चांगले बुटं पायात असायलाच पाहिजेत.
माझं शोधकार्य सुरु होतंच. मेलवर, ऑनलाईन जमेल तसं इथल्या-बाहेरच्या मित्रांकडून-जाणकारांकडून माहिती मिळवली होती.
एक माणूस दिवसभरातील किमान ४ तास आपल्या पायांवर उभा असतो, (तुम्ही मुंबईकर असाल तर लोकलमुळे परिमाणं बदलतील) दिवसात आपण किमान ८ ते १० हजार पावलं चालत असतो. शरीरातल्या एकूण हाडांपैकी २५ टक्के हाडं आपल्या पायात असतात. आपल्या शरीराचं जे काही ५०-६० किलो वजन असतं ते जन्मभर पेलण्याचं काम आपले पाय करतात. पण जसं देशात शेतकऱ्याकडे, टीव्ही चॅनल्सवर ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलं जातं तसेच एवढा भार उचलूनही आपण आपल्या पायांकडे दुर्लक्ष करत असतो. ज्यांना Hiking किंवा trekking ची आवड आहे त्यांना असं दुर्लक्ष करणं परवडणारं नसतं.
काही जणांनी Action किंवा Hunter सुचवले पण मी त्याबाबत साशंक होतो. Hi-tec, Quechua, Merrell असे काही पर्याय समोर आले. दर्जा आंतरराष्ट्रीय असल्यामुळे त्यातले तसे परवडणारे कुठलेच नव्हते. नको तिथं पैसा जातोच बऱ्याचदा, मग आपल्याच पायासाठी झाला थोडा खर्च तर काय बिघडलं असा विचार केला. त्यातल्या त्यात मापात बसणारा Quechua (केचुआ) घ्यायचं पक्कं केलं. त्यांचं Forclaz-500 हे मॉडेल भारतात ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध आहे.
थोडेच म्हणजे २ दिवसच बाकी होते. Merrell साठी फिनिक्स मिलमध्ये गेलो तिथे आमची चौकशी पाहून एका ग्राहकांनेच आम्हाला दादरच्या एका दुकानाचा पत्ता-नंबर दिला पण त्यांच्याकडे माझ्या साईजचे बुट नसल्यामुळे निराशा पदरी पडली. लिंकिंग रोडला Wild craft , माटुंगा-वडाळ्याला outdoor travel gear, ग्रांट रोडला ADVENTURE 18 मध्ये चौकशी झाली. वाशी ते सीएसटी आणि बांद्रा ते चर्चगेट; कुठे साईज नाही तर कुठे रंग नाही.
उमेश कुमावतही ट्रेकसाठी चांगले शुज शोधत होता. मी, उमेश आणि गजानन उमाटे ADVENTURE 18 मध्ये गेलो. भाटीया हॉस्पिटलमागच्या गल्लीत मंदीराजवळ हे छोटं दुकान आहे; ट्रेकर्सना लागणारं सगळं साहित्य इथं मिळतं. हिमालयात आपल्या सहचारिणीसह जायला निघालेले एक गुजराती आजोबा दोन पानांची लिस्ट घेऊनच तिथे आले होते, त्यांची तयारी पाहून मला माझीच किव आली. तिथे केचुआ होते पण फक्त निळा-ग्रे रंग होता, काळ्या किंवा ब्राउन रंग पुढच्या आठवड्यात येईल असं त्यांनी सांगितलं. कलरला प्राधान्य द्यायची ती वेळ नव्हती पण नेहेमीप्रमाणेच द्विधा मनस्थितीत आणि आणखी कुठेतरी मिळतील अशी आशा करत काहीच न घेता आम्ही तिथून बाहेर पडलो.
हे सगळं २८ तारखेच्या रात्री सुरु होतं. २९ ला सकाळी पुण्याला निघायचं होतं आणि इथे बुटावरच गाडं अडलं होतं. शेवटी पुण्याच्या wild craft ला मी फोन केला, तिथे अश्विन नावाच्या मुलाने तो उचलला,
म्हणलं भावा मी मुंबईतून बोलतोय, केचुआ आहे का?
तो म्हणाला आहे.
नाही म्हणलं ब्राऊन किंवा काळा आहे का?
तो म्हणाला तुमच्या मापाचा एकच ब्राऊन केचुआ शिल्लक आहे. तुम्ही एवढ्या लांबून येताय म्हणल्यावर मी तो बाजुला ठेवतो.
म्हणलं ओ के.
सकाळी लवकर घराबाहेर पडायचं असं ठरवूनही १२ वाजले, १२.३० ला गाडी मिळाली. माणिक आणि प्रशांत कोयनेनं सकाळीच गेले होते. निघताना अश्विनला पुन्हा फोन करुन बुटाची आठवण करुन दिली. साधारण २- २.३० ला मी थेट स्टेशनला उतरलो, रिक्षानं एमजी रोडला गेलो. आयसीआयसीआय बँकेजवळ wild craft सापडलं.
दुकानात गेल्यावर विचारलं, अश्विन?
अश्विन आला त्याला ओळख करुन दिली, त्यानं काऊंटरच्या आतल्या बाजुला लपवून ठेवलेले शूज काढून दिले.
“आम्ही जास्त पीस मागवत नाही, जे येतात ते लगेच जातात त्यामुळे तुमच्यासाठी हे बाजुला ठेवले.”
म्हणलं धन्यवाद.
शूज परफेक्ट आले, प्रचंड कम्फर्ट… ट्रेकच्या काही दिवस आधी बुट वापरायला हवा, त्याची सवय व्हायला हवी वगैरे माहित होतं, पण हलगर्जीपणा आपलाच असल्यामुळं बोलायची सोय नव्हती. पैसे देऊन केचुआ घेऊन मी पुण्याच्या कार्यालयात पोचलो.
पैसा गेल्याचं दु:ख वाटत होतं पण पुढच्या ट्रेकमध्ये पायाला मिळणाऱ्या आरामासमोर ते हलकं करण्याचा प्रयत्न करत होतो.
हरवलेला बुट किंवा बुटाचा शोध हा एका दर्जेदार चित्रपटाचा विषय होऊ शकतो हे माजिद मजिदीमुळे, Children Of Heavens मूळे माहिती झालं होतं. त्याची अशी प्रचिती येईल असं कधी वाटलं नव्हतं.