मला आपल्या पोलिसांचा राग येण्यापेक्षा त्यांच्याबद्दल सहानुभूतीच जास्त वाटत आलीय. त्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी एक अमिताभच्या विजय दिनानाथ चव्हाणनं साधारण २० वर्षांपूर्वी सांगितलंय. अग्नीपथ मधला हा डायलॉग आजही तितकाच लागू होतो.
सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. ज्याच्या शीरावर कायदा सुव्यवस्थेचा भार असतो त्या पोलिसांचा पगार किती आहे?
हुद्दा |
महिना पगार |
पोलिस कॉन्स्टेबल ते सहाय्यक.एस.आय. |
५२०० – २०२०० रुपये |
पी.एस.आय ते पी.आय |
९३०० – ३४८०० रुपये |
सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त |
१५६०० – ३९१०० रुपये |
कोणी म्हणेल हा पगार पुरेसा नाहीय का? पोलिस ज्या परिस्थितीत काम करतात तो ताण आणि पोलिसांकडनं आपल्या ज्या अपेक्षा आहेत ना त्या पाहिल्या तर हा पगार नक्कीच कमी आहे. काही जण पाकिस्तान-सोमालिया-टिंबकटू वगैरेपेक्षा आपण चांगले आहोत असं म्हणतील पण तुलनाच करायची तर आपल्यापेक्षा चांगल्यांशी करावी असं ऐकत आलोय म्हणून इंग्लंड-अमेरिकेकडं पाहुयात.
वॉशिंग्टनमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या पगाराची सुरुवात २० लाखापासून होते. इंग्लंडमध्ये कॉन्स्टेबल जॉईन होताना त्याचा पगार असतो १७ लाख रुपये, दहा वर्षात तो होतो साधारण २६ लाख रुपये, इन्स्पेक्टरची सुरुवात होते ३३ लाखांवर, कमिशनरचा पगार सव्वा कोटी रुपये, त्यात लंडनसाठी वेगळा पे स्केल असतो, त्यांना किमान २-३ लाख जास्त पगार दिला जातो. बरं ही तुलना बाजूला ठेवली तरी पोलिसांच्या कामात जे काही अडथळे आहेत ते दूर होणं, त्यांच्या गरजांकडे राज्यकर्त्यांनी जास्त गांभिर्याने बघणे गरजेचे आहे हे नक्की.
२६-११ हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री घरी परत जात होतो. डब्यात काही माणसं आणि एक वेगळीच शांतता होती. माझ्यासमोरच ३ पोलिस होते, त्यांच्या बुटावरुन आलं नाही तरी त्यांच्यात जे तुटक बोलणं सुरु होतं त्यावरुन लक्षात येत होतं. आपले ३-४ मोठे अधिकारी काही चांगले सहकारी नव्हे आपल्या घरातलंच कोणीतरी गमावल्याचं प्रचंड दु:ख त्यांच्या बोलण्यात होतं. त्यातल्या एकानं राजकारण्यांना-सिस्टिमला दिलेली शिवी मला आजही ऐकू येते.
महाराष्ट्रातील साडे ११ कोटी जनतेच्या रक्षणासाठी फक्त दिड-पावनेदोन लाख पोलिस दिवसरात्र राबत असतात. त्यात मुंबई म्हटलं की पोलिसांवर जास्त ताण. मोर्चे, आंदोलने, निवडणुका, यात्रा, सणावारांचा बंदोबस्त असो की मंत्र्याचा दौरा, गल्लीतली भांडणं असोत गँगवार असो की अतिरेक्यांचा हल्ला. कुठे काहीही झालं तरी पोलिसांचं काम सुरु.
कधी चांगलं काम केलं तर कौतुकाचे बोल अभावानेच. Thankless job…
संख्याबळ कमी त्यामुळे 12 ते 16 तासांची ड्यूटी दररोजचीच, कामाच्या अनियमित वेळा, वेळेवर जेवण मिळण्याची खात्री नाही, मिळेल ते आणि मिळेल तिथं खायचं, पुरेशी विश्रांती नाही, ताण-तणावामुळं हाय ब्लड प्रेशर-डायबिटिजसारखे रोग मागे लागलेले, घराकडं होणारं दुर्लक्ष त्याची वेगळीच खंत मनात घेऊन कसं होणार सदरक्षण आणि खल निग्रहण.
त्यातच गुन्ह्यांच्या प्रमाणामध्ये वाढ होतेय, अतिरेकी हल्ल्याची भिती वाढतेय. काही करप्ट लोकांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात आजही असलेली अविश्वासाची भावना आहे ती घालवण्याचं- पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचं आव्हान आहेच.
मुंबई पोलिस आयुक्ताचा कारभार स्वीकारला त्या दिवशी अरुप पटनायक म्हणाले होते देवाला सोडून पोलिस कुणालाही काहीही करु शकतात. माझा त्यावर विश्वास आहे. त्याची झलक कर्नित शहा अपहरणाच्यावेळी आणि नुकतीच मिसेस मुख्यमंत्र्यांची पर्स चोरीला गेली तेव्हा सर्वांनी पाहिलीय. ठरवलं तर पोलिस कुठल्याही गुन्ह्यांचा एवढ्याच ताकदीनं पाठपुरावा करुन, कमीत कमी वेळेत गुन्हेगाराला शोधू शकतात हेच या दोन हायप्रोफाईल केसमधनं दिसलं.
ठरवलं तर खूप चांगलं काम करण्याची क्षमता आपल्या पोलिसांमध्ये आहे.
पोलिस यंत्रणा अतिसुसज्ज हवी. ती राबवणारा पोलिस फक्त शारिरीकच नाही तर मानसिक पातळीवर अतिकणखर हवा. एके – 47 चा सामना हातातल्या दंडुक्यानं करणं शक्य नाही. मोठ्या कार्पोर्रेट कंपन्या ज्याप्रमाणे आपल्या लोकांची काळजी घेतात, लोकांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांना चांगल्या सुविधा देऊन मग चांगल्या कामाची अपेक्षा ठेवतात त्यावरुन सरकारनं काहीतरी शिकण्यासारखं आहे.
आपण पोलिसांकडे एक माणूस म्हणून फार कमी वेळा बघतो. भुकेल्यापोटी कोणतीही लढाई लढता येत नाही, लढता येईलही पण जिंकता नक्कीच येत नाही हे किमान आपण तरी विसरायला नको.
मला आपल्या पोलिसांचा राग येण्यापेक्षा त्यांच्याबद्दल सहानुभूतीच जास्त वाटत आलीय.
पटलं.
फ़ार लाख मोलाचे बोल आहेत तुमचे, पगार लाखात नसले तरी आर्मी सारखी कॅंटीन ची सोय पोरांसाठी “आर्मी पब्लिक किंवा “के व्ही” सारखे शिक्षण देणारी सोय इतके जरी मिळाले तरी हवालदारं हरखुन जातील आपली!!!!!!!!. सिस्टीम मधे खोट नसते तर सिस्टीम राबवणार लोकांतच ती कमी असते हे पण खरेच आहे म्हणा, बरेच दिवसांनी काहीतरी समविचारी वाचुन बरे वाटले , व्यवस्थेत जाण्याचा प्रयत्न करणारा एक युवक म्हणुन जरी नाही तरी नागरीक म्हणुन तुमचे म्हणणे पटलेच!!!