घरी निघताना पारावर एक चहाची मैफल ठरलेलीच. आज शैलू परांजपेंची कंपनी लाभली, गप्पांचा ओघ सुरु झाला, आम्ही घडाळ्याकडं पाहायचं सोडून दिलं. म्हटलं नेहेमीप्रमाणेच मिळेल ती गाडी पकडायची. तसंही वेळेचं आणि आपलं गणित फार कमी वेळा जमलंय.
अपेक्षेप्रमाणे उशीर झाला, स्टेशनवर पोचलो, गर्दी वगैरे होतीच. आवडीच्या प्लेलिस्टमधली गाणी सुरु झाली होती. गाडी आली, नेहेमीप्रमाणेच शेवटच्या अर्ध्या डब्यात मी कोंबला गेलो. आजुबाजू-मागेपुढे जिथे जागा मिळेल तिथे कोणीतरी कोणालातरी आपुलकीनं भिडलेले होते. या मुंबापुरीत कोणाला एकटं – मोकळं वगैरे वाटू नये; म्हणून काळजी घ्यायची सुरुवात बहुदा लोकलमध्येच होत असावी.
गाडीनं वेग पकडला, बाहेर पावसानं… कानात गाण्यानं… आणि डोक्यात विचारांनीही…
दारातून जेमतेम आत, डावीकडे घुसायच्या तिथे, दोन्ही हात उंच करुन, डावा पाय उचलला गेल्यानं दिडपायावर माझं लोकलासन सुरु होतं. माझ्या मागचा माणूस पाठीनंच मला मागे ढकलत होता, माझी पाठ माझी नाहीचंय असं स्वत:ला समजावत मी कानातल्या जसराजजींवर लक्ष केंद्रीत करायचा प्रयत्न करत होतो. पण लोकलचाच प्रवास तो, एकवेळ भजनांचा आवाज येणार नाही पण भांडणाचा आवाज नाही असं कसं होईल?
टेकून उभा असलेल्या माणसाच्या बाजुला नसलेल्या जागेत घुसखोरी करायचा माझ्या मागच्या प्राजीचा प्रयत्न सुरु होता, पैलेही आज मुड खराब है वगैरे वाकयुद्धाला सुरुवात झाली होती. (मला अगदी परवाच माझं झालेलं छोटंसं भांडण आठवलं) आधीचा उभा असलेला माणूस त्याची काहीच चूक नसल्यानं त्वेषानं आपली पोष्ट लढवत होता. प्राजीपुढे तो कितपत टिकेल अशी शंकाही होती. थोड्याच वेळात प्रोटोकॉल पाळत माभैन वगैरे निघाली आणि मग हातापाई सुरु झाली.
आधीच गाडीत स्वत:ची बोटं हलवायला जागा नाही, यांची फ्रिस्टाईल कशी रंगणार? लहान मुलं भांडतात तशी रेटारेटी सुरु झाली होती. एव्हाना प्राजीनं त्या माणसाला त्याच्या जागेवरुन मागे आतल्या जागेत रेटलं होतं, मला त्या माणसाबद्दल सहानुभूती वाटत होती, पण मी मुळच्या (नाक खुपसण्याच्या) स्वभावाला मुरड घालत कानातल्या गाण्यावर फोकस केलं.
लोकांनी दोघांनाही शिव्या द्यायला सुरुवात केली मग यांची गाडी पुन्हा वाकयुद्धावर आली ते शेवटपर्यंत म्हणजे एक जण उतरेपर्यंत सुरुच होतं. उतरण्याच्या आधी पुन्हा चल दम है तो बाहर निकल, देख लुंगा वगैरे भिडाभिडी सुरु झाली, दोघांचाही भांडायचा मूड पाहून मी डेअरिंग केली, दोघांनाही जांदो भाई, छोड दो भाई वगैरे समजावून सांगत दूर केलं, तेवढंच एक समाधान.
लोकलमधली अशी भांडण म्हणजे ANGER DISPLACEMET किंवा ROAD RAGE चा प्रकार असावा. कुठं तरी काही तरी बिनसलेलं असतं किंवा आत खूप दिवसाचं दाबून ठेवलेलं असतं त्याचा अशा एखाद्या क्षणी स्फोट होतो. कारण अगदी क्षुल्लक असतं; बऱ्याचदा तर तेही नसतं, पण एकदा का ठिणगी पडली की कोण, कसं रिअॅक्ट होईल सांगणं कठीण.
मी गेल्या काही वर्षात अशी कितीतरी भांडणं पाहिली आहेत, (काही भांडणात मेन रोलही निभावलाय) त्यावरुन एक लक्षात आलंय, कुणीतरी एकानं शांत राहणं, समंजसपणा दाखवणं गरजेचं असतं. ( आणि हे सोप्पं काम नेहेमी समोरच्या व्यक्तीनंच करावं अशी माझी माफक अपेक्षा असते असो) “If you are patient in one moment of anger, you will escape a hundred days of sorrow.” अशी चीनी म्हण आहे ऐकायला चांगली वाटते, वेळेवर लक्षात राहात नाही म्हणून लोचा होतो, असो.
मुंबईतल्या गर्दीची सवय झालेल्या माणसाला असं, धक्का लागला, पाय पडला, ठिकसे खडा रहो, वगैरे कारणांसाठी खरंच भांडायचं असतं असं मला तरी वाटत नाही. राग योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीनं व्यक्त करायला आपल्याला कधीच शिकवलेलं नसतं त्यातून असे प्रकार होत असावेत. तो एक क्षण गेला किंवा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायचं शिकलात की सगळ्यांनाच होणारा मनस्ताप वाचतो… (हा स्वानुभव)
जगण्याच्या प्रश्नांनी आपल्याला मुर्दाड बनवलं नाहीय, आपण अजुनही जिवंत आहोत हे तपासून पाहात असेल का माणूस?