उसको छुट्टी न मिली, जिसने सबक याद किया

गेले काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ आहे.

(त्यात नवं काय? असं माझे काही मित्र/सहकारी म्हणतीलच; त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझ्या अस्वस्थतेचं कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचंय.

या पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला त्या संध्याकाळी मी चक्क घरी पोचलेलो होतो. पावसाच्या पहिल्या थेंबांपासून माती ब्रँडचा हलकासा सुवास दरवळत होता, सिमेंटच्या साम्राज्यात इतकी वर्ष काढूनही मातीनं आपला गुण सोडला नव्हता हे विशेष. वीज कार्यालयात कोणी तरी रसिक माणूस असावा त्यानं योग्य वेळ साधली आणि साधारण ८ च्या सुमारास अचानक लाईट गेली. मुंबईत सहसा न एकू येणारी शांतता ऐकू येऊ लागली.

पुढचा जवळपास अर्धा तास बाहेर पहिला पाऊस, मातीचा सुगंध, शांतता आणि अंधार… वातावरण एकदम रोमँटिक का काय म्हणतात तसं होतं. (टीप:- बायको घरातच होती पण दोन्ही लेकरंही घरातच होती, असो) टीव्ही बंद असल्यामुळं बऱ्याच दिवसांनी घरात गाणे लागले आणि ‘चुपके से’ सुरु झालं, साधना सरगमचा आवाज, रहमान – गुलजारचं महाभयानक कॉम्बिनेशन त्या वातावरणातला रोमँटिकपणा खुलवत होता. त्यामुळे असेल कदाचित साथीयामधलं ते ‘चुपके से’ डोक्यात इतकं फिट्टं बसलं की पुढचे तीन-चार दिवस तिथेच घोळत राहिलं. कार्यालयात, प्रवासात वेळ मिळेल तसा मोबाईल-हेडफोनवरुन चुपकेसे सुरुच होतं.

या पार्श्वभूमीवर माणिकनं वेबरुममध्ये बोलावलं, हेडफोन पुढं केला आणि म्हणाला ऐका. यूट्यूबवर कुठलीतरी चांगली क्लिप असेल एवढाच अंदाज आला. हेडफोन कानाला लावला, प्लेचं बटन दाबलं आणि हळुहळू वेगळ्या विश्वात पोचलो, अजुनही मी तिथून बाहेर पडलेलो नाही, लवकर पडायची इच्छाही नाही.

ते होतं पाकिस्तानच्या COKE STUDIO मध्ये आरिफ लोहार आणि मीशा यांनी गायलेलं ‘जुगनी जी’. भाषा पंजाबी होती, त्यातलं फार कळलं नाही तरी संगीताची भाषा कळण्याइतपत कान साथ देतात. आरीफचा दमदार पंजाबी आवाज त्याला मीशाच्या खास आवाजाची (प्लस तिने धरलेल्या तालाची) साथ,  कोरसचं दम गुटकू  आणि ते पंजाबी-वेस्टर्नचं अप्रतिम फ्यूजन. तुम्ही ठेका धरला नाही तरच नवल.

२०१० च्या सीझन ३ मधले तसे सगळेच गाणे चांगले आहेत पण मला त्यातले काही जरा जास्तच आवडले. आता अली हमझा आणि अली नूर या नूरांचं ‘होर वी नीवां हो’ ऐका. हमझा आणि नूरच्या धीरगंभीर; ट्रान्समध्ये नेणाऱ्या आवाजांना वीणेच्या तारांनी ज्या पद्धतीनं जोडलंय त्याला तोड नाही. त्यांच्या आईनेच या गाण्यात वीणा (बहुदा सागर वीणा) वाजवलीय. इलेक्ट्रॉनिक गिटार, ड्रम्सच्या गर्दीतही वीणेच्या तारांचा झंकार थेट ऱ्हदयात उमटला तर तो फ्यूजनचा विजय आहे असं समजा.

मौला, अशी आर्त साद घालत अबिदा परवीन यांनी केलेली सुरुवात असो की ‘मैं हू मशहूर इश्क बाजीमें’ मधले व्हेरिएशन्स, ते ऐकताना जी अवस्था होते त्याचं वर्णन मला तरी करता येणार नाही. त्यातच बेदम शाह वारसीनं म्हटल्याप्रमाणे ‘जहां-बिन हूं, की खुद सारा जहां हूं’ हा प्रश्न आपल्याला अस्वस्थतेकडं घेऊन जातो. सुफी संगीताची ताकत ज्यानं अनुभवलीय त्याला जास्त सांगायची गरज पडणार नाही. ज्यांना अनुभवायची असेल त्यांनी वेळ काढा आणि शांततेत ऐका.

लहानपणी गझल कशी ऐकायची ते कळण्याच्या आधी आमचा सामना ‘हवा हवा’ सारख्या गाण्यांशी झाला होता. दिल के अरमान अश्रुंसोबत कसे जातात ते सांगणारी सलमा आगा असो की लंबी जुदाई कशी असते ते आवाजातून काळजाला भिडवणारी रेश्मा असो की वादात आलेलं जुनुन असो, पाकिस्तानी संगीत, पाकिस्तानी गायक मला तसे नवे नव्हते. पण कोकच्या या गाण्यांनी ते नातं वेगळ्या उंचीवर नेलं. गेले दोन-तीन वर्ष कोक स्टुडिओतले काही सूर कानावरही पडले पण अनेक कारणांनी त्याकडे म्हणावं तसं लक्ष गेलं नाही. तुमचे आवडते राहत फतेह अली, तेरे बिन लादेन वाला अली जफर, अतिफ अस्लम त्यात गायचे.

हे संगीत ऐकताना देशाच्या सीमा धूसर होतात, खोट्या धर्माभिमानाच्या मजबूत साखळ्यांची पकड सैल होते असं म्हणायला आधार आहे, या गाण्यांना युट्यूबवर-फेसबुकवर जो रिस्पॉन्स मिळतो त्यावर एक नजर टाका.दाद देताना ना देश आड येतो ना धर्म.  मक्तबे इश्क का दस्तूर निराला देखा, उसको छुट्टी न मिली जिसने सबक याद किया हे संगीताच्या बाबतीतही लागू पडतं तर.

जिथे रोज मशीनगन, हेलिकॉप्टर, गोळ्या-बंदुकांचे, बाँब स्फोटाचे, त्यानंतरच्या आर्त किंकाळ्यांचे, बांगड्यां फुटण्याचे, रडण्याचे आवाज वाढत आहेत त्याच देशात असं अस्सल संगीत ज्यांनी जिवंत ठेवलंय; त्यांची संख्या वाढायला हवी. त्यांना शुभेच्छा

ता.क. – गेल्या आठवड्यात कोक स्टुडिओची सुरुवात भारतातही झालीय. शंकर महादेवन, शान, सुनिधी चौहान, केके, असली तगडी नावं आहेत. ज्याच्या फ्यूजनला साऱ्या जगानं मानलं अशा लेसली लेझचं मार्गदर्शन आहे, लेकीन… ‘वो’ बात नही थी, कहीं कुछ कमी सी थी यारो. ती भरुन काढतीलच तरीही…

गेले काही दिवस मी अस्वस्थ आहे.

7 thoughts on “उसको छुट्टी न मिली, जिसने सबक याद किया

  1. एका अप्रतिम गाण्याबद्दल आभारी… जुगनीच्या “दम गुटकू” ने वेड लावले..

    • you tube ला coke studio टाकले की बरीच गाणी येतील त्यातली बरीच गाणी मस्त आहेत. सनम मारवी ही तरुण गायिका आहे तिचा आवाज सॉलिड आहे.मीशाचं चोरी चोरी म्हणजे आपलं यारा सिली सिली मस्त. अली जफर माझ्यासाठी सरप्राईज पँकेज होतं. टीना सानी, झेब-हानिया, अतिफ यांची काही गाणीही चांगली आहेत, आवडतील.

  2. आवडले. ही अशी काळजात उतरत जाणारी गाणी ऐकली की खरेच सगळ्या बेगडी गोष्टी गळून पडतात. अन उरते ती केवळ तल्लिनता – समाधी.

    • खरंय भाग्यश्री,
      रसिक बलमा, सहेला रे, मालवून टाक, जीवलगा राहिले, अशी काही गाणी आहेत जी आजही तोच अनुभव देतात.

  3. Sandip, What you’ve interpreted is very imp! It’s beyond the barriers of man made differences of Caste, creed, religion and overall beyond division between the nations. I think this is one of the art practised so selflessly and devotionally that it has attained the strength to mesmerise the mankind and forget all the barriers of hatredness. Hope more and more people across the border on both the sides enjoy this more and more….

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s